sangli election news : सगळीकडे एकच चर्चा गुलाल कोणाला ?: सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाले. आता मतमोजणीला अवघे काही तास बाकी असताना उमेदवारांच्या समर्थकांच्या ‘आमदार’ कोण यावर पैजा लागू लागल्या आहेत. लेखी अथवा तोंडी पैजा लागल्या आहेत. तर गुलाबी थंडीत गल्ली, पानपट्टी, चौका-चौकात यावेळी गुलाल कुणाला? याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सर्वांनाच निकालाची प्रतिक्षा आहे.
sangli election news : सगळीकडे एकच चर्चा गुलाल कोणाला ?
निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची. निवडणुका झाल्या की मतमोजणी पूर्वी कोण निवडून येईल याच्या विषयी पैजा लागतात. काही जण पैशाच्या स्वरूपात, काही जण फोर व्हीलर, टू व्हीलर या स्वरूपात पैजा लावतात. तर काही बहाद्दर थेट जमिनीचीही पैज कोण निवडून येणार याबाबत लावतात. तश्या पैजा सांगली लोकसभेच्या निवडणुकीत लागल्या होत्या. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी पैजा लागू लागल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात यावेळी विधानसभेसाठी जिल्ह्यात तब्बल आठ टक्के वाढीव मतदान झाले आहे. जिल्ह्यातील सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, जत, इस्लामपूर व शिराळा या आठही मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? याची चर्चा रंगू लागली आहे. मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू आहे. काही तासच बाकी आहेत. कोण विजयी होणार? या चर्चेला ऊत आला आहे. गल्ली बोळासह, पानटपर्या व चौका-चौकात आता चर्चा रंगल्या आहेत. गुलाल उधळणार कोण याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, जत व शिराळा या मतदारसंघात जोरदार चुरस आहे. या ठिकाणी सहजासजी अंदजा व्यक्त करता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघात सर्वाधिक पैजा लागत आहेत. त्या खालोखाल खानापूर-आटपाडी, इस्लामपूर पैजा लागत आहेत. यामध्ये राजकीय कार्यकर्ते व स्थानिक नेत्यांचा समावेश आहे. जेवणावळ्यांपासून पैशापर्यंत अन् वाहनांच्या देखील पैजा लावल्या जात आहेत. अनेकांनी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल येतील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. शिवाय राज्यातील अनेक मतदारसंघावर देखील चर्चा सुरू आहे. काहींनी पैजा देखील लावल्या आहेत.
कोण कुठे घेणार मताधिक्य? यावर देखील पैज
विधानसभेचा आमदार कोण होणार? यावर काही जणांच्या पैजा लागत असल्या तरी गावात किंवा प्रभागात कोण मताधिक्य घेणार? यावर उमेदवार समर्थक पैज लावत आहेत. यावरून प्रभागात किंवा गावात ‘किंगमेकर’ कोण याचा फैसला होणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.