जनप्रवास । सांगली
sangli flood news : जिल्ह्यात 20 हजार एकरावरील पिके पाण्यात : मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील दहा हजार शेतकर्यांचे 20 हजार एकराहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना कोट्यवधीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने नजरअंदाजे नुकसानीचा अहवाल तयार केला असला तरी पिकांत अद्याप पाणी आहे, त्यामुळे त्यामुळे पाणी कमी होवून पंचनामे कधी होणार याकडे शेतकर्यांचे लक्ष आहे.
sangli flood news : जिल्ह्यात 20 हजार एकरावरील पिके पाण्यात
यंदा जुनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु गत आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरुच राहिल्याने धरणातून पाणी सोडले. कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 20 हजार एकराहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमधील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. याचा शेतकरी वर्गाला फार मोठा फटका बसला आहे. शेतकर्यांनी मोठा खर्च करून पिकवलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. 2019 आणि 2021 या वर्षात आलेल्या महापुरात जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली होती.
वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत,
तेथील सुमारे साडेतीन हजार हेक्टवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील सुमारे सातशे हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील साडेसहाशे हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस, केळी, हळद आदी पिकांना बसला आहे. सातत्याने महापुराचा तडाखा आणि अतिवृष्टी यामुळे या नदीकाठच्या शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.
यंदा शेतकर्यांनी आडसाली उसाची लावण मोठ्या प्रमाणात केली आहे.
मात्र संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या आडसाली उसाला बसला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा लावण करावी लागणार आहे. उसाप्रमाणेच आता या भागातील नदीकाठचा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हळद लागवडीकडे वळला आहे. नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने उत्पादकाला मोठा फटका बसला आहे. कृष्णाकाठी देखील अपवाद वगळता शेतीपिकांची हीच अवस्था झाली आहे. दरम्यान, शासनाने या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे करावेत, तसेच त्याची भरपाई तातडीने देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाकडून नजरअंदाजे शेतीचे नुकसान (हेक्टरमध्ये)
तालुका शेतकरी क्षेत्र
शिराळा 5378 2918
वाळवा 1606 760
मिरज 1560 650
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.