sangli highway news : अंकली ते शिरोली कामास लवकरच सुरूवात, ‘अवंतिका’ची निविदा अंतिम : अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा अंतिम झाली आहे. ‘हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार असून हैद्राबाद येथील श्री अवंतिका कन्ट्रक्शन (आय) लिमिटेड कंपनीची 8.14 टक्के कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे. त्यामुळे निविदेची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन 15 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सांगलीकरांचा कोल्हापुरचा प्रवास सुखदायी होणार आहे.
sangli highway news : अंकली ते शिरोली कामास लवकरच सुरूवात, ‘अवंतिका’ची निविदा अंतिम
गेल्या बारा वर्षांपासून सांगली-कोल्हापूर रस्ता वादात अडकला आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता पूर्वी सुप्रिम कंपनीकडे बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा, या तत्वावर दिला होता. मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70 टक्के काम करून टोल लावण्याची भूमीका घेतल्याने वाद सुरू झाला होता. टोल वसुलीवरून निर्माण झालेला वाद 2015 पासून न्यायालयात आहे. दरम्यान, अनेक ठिकाण असलेल्या अपूर्ण कामांमुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावर होणार्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा, अशी मागणी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर केला होता.

त्यानुसार कोल्हापूर-सांगली हा महामार्ग रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात विलीन केला. कोल्हापूर-सांगली महामार्गाचे काम करणार्या कंपनीला भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ना. नितीन गडकणी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगली-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग-166 वरील अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी 1192 कोटी 84 लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. बारा निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये निविदा रक्कमेपक्षा 8.14 टक्के सर्वात कमी दराची निविदा ही हैद्राबाद येथील श्री अवंतिका कन्ट्रक्शन (आय) लिमिटेड कंपनीची होती. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या निविदेला मान्यता दिली आहे.
दरम्यान, रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम गतीने सुरू असून अंकली ते सोलापूर या मार्गाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली आहे. तर चोकाक ते आंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत काम सुरू झाले आहे. आता अंकली (सांगली) ते कोल्हापूरपर्यंतच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे सांगली ते कोल्हापूर हा प्रवास सुखदायी व जलद होणार आहे.

रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण व्हावे…
अंकली ते शिरोली फाटापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची निविदा अंतिम केली आहे. हे काम लवकर सुरू करावे व दिलेल्या मुदतीत काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी व्यक्त केली. तर सांगली ते अंकली रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात होईल. त्यामुळे सांगली ते कोल्हापूर प्रवास आता जलद होणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



