rajkiyalive

जिल्ह्यातील कारखानदार 3150 वर ठाम

स्वाभिमानीचा प्रस्ताव अमान्य, बैठक निष्फळ, 26 डिसेंबरपर्यंत कारखानदारांचा निर्णय होेणार

जनप्रवास ।  सांगली

जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या तिसर्‍या बैठकीतही पहिल्या उचलीवर तोडगा न निघाल्याने बैठक निष्फळ ठरली. कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 12.50 उतार्‍यास 3250, साडेबारा उतार्‍याच्या आत असणारे 3150 रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखाने 3100 रुपये दर देतील, अशी भूमिका मांडली. 

 

 

बैठकीत ठोस तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंतची निर्णय घेण्याचे आश्वासन कारखानदारांनी दिले. त्यामुळे 26 डिसेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय स्वाभिमानीने घेतला. या मुदतीत तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस दरा संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी बैठक घेतली. या बैठकीला विश्वास कारखान्याचे अध्यक्ष व आ. मानसिंगराव नाईक, क्रांतीचे शरद लाड, वसंतदादाचे विशाल पाटील, राजारामबापूचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्क्ष महेश खराडे, संदीप राजोबा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

 

कोल्हापूर जिल्ह्याचा फॉर्म्युला सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी स्वीकारण्याची मागणी संघटनेने केली होती, परंतु जिल्ह्यातील कारखानदार 3100 रुपये पहिली उचल देण्यावर ठाम होते. मात्र, दुष्काळ पट्ट्यातील कारखानदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेट्टी यांनी कारखानदारांची मागणी अमान्य केली. त्यामुळे या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांना अंतिम प्रस्ताव दिला. या प्रस्तावांमध्ये गतवर्षीचा साखर उतारा साडेबारा टक्केपेक्षा अधिक असल्यास पहिली उचल 3250 रुपये, साडेबारा पेक्षा कमी असल्यास 3150 आणि ज्या कारखान्यांचा साखर उतारा 10 टक्के आहे. त्या कारखान्यांनी 3100 रुपये असा शेवटचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्यानंतर कारखानदारांमध्ये पाऊणतास चर्चा झाली.

हेही वाचा
आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…
..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 
शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ
लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू
आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर
शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव
शेतकरी संघटनांना फुटीचा शाप
हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच
यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

सर्व कारखानदारांची चर्चा झाल्यानंतर कारखानदारांनी 3150 रुपये देण्यास सहमती दर्शवली. साडेबारा टक्के पेक्षा जास्त उतारा 3150 रुपये तर त्यापेक्षा कमी उतारा असलेल्या कारखान्यांनी 3100 देण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु स्वाभिमानीने तो अमान्य केला. मात्र स्वाभिमानीने त्यांच्या मागणीचा रेटा कायम ठेवला. त्यामुळे साखर कारखानदारांनी 26 डिसेंबरपर्यंत आम्ही निर्णय घेऊ, असे आश्वासन बैठकीत दिले. त्यामुळे ऊस दरासाठी आयोजित केलेली तिसरी बैठकी निष्पळ ठरली.

जिल्ह्यातील कारखानदारांनी गतवर्षी तुटलेल्या उसापोटी तीन हजार रुपयांपेक्षा जास्त दर दिला आहे, त्यांनी 50 रुपये व ज्या कारखान्यांनी 3000 च्या आत दिला आहे, त्याच्याकडून शंभर रुपये देण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे, त्याबाबतचा प्रस्ताव साखर सहसंचालकांच्या मान्यतेसाठी देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी सांगितले. बैठकीनंतर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष खराडे यांनी 26 डिसेंबरपर्यंत आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

अंतिम प्रस्ताव मान्य करा अन्यथा आंदोलन – शेट्टी
संघटनेने जिल्ह्यातील कारखान्यांना दिलेला अंतिम प्रस्ताव मान्य करावा, अन्यथा आंदोलन अटळ असल्याचा इशारा माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला. देशात पुढीलवर्षी मोठे संकट आहे. उसाचे क्षेत्र कमी नाही उसाची एकरी उत्पादकता घटली आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कारणीभूत असल्याची टीका शेट्टी यांनी केली. पदानात घट होत असल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांनी असंतुलित खतांचा वापर केल्याने उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे केंद्राने स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

 

तोडगा निघत नसल्याने शेट्टी बैठकीतून बाहेर
जिल्ह्यातील ऊस दरासाठी कारखानदारांशी दोन तास चर्चा करुनही निर्णय झाला नाही, त्यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी कारखानदारांसमोर अंतिम प्रस्ताव सादर केला. कारखानदारांनी आमचा प्रस्ताव मान्य न केल्यास आम्ही आमच्या मार्गाने कुठेही आंदोलन करु असा इशारा देत शेट्टी बैठकीतून बाहेर पडले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज