rajkiyalive

SANGLI : KOLHAPUR : LOKSABHA : महायुतीत पेच उमदेवारीचा…

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे
SANGLI : KOLHAPUR : LOKSABHA : महायुतीत पेच उमदेवारीचा… येणार्‍या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागणार असून, सर्वच पक्षात उमेदवारी निवडीसाठी जोरदार बैठका सुरू आहेत. भाजपने देशपातळीवर आपल्या 195 उमेदवरांची पहिली यादी जाहीर केली असून, काँग्रेसनेही 35 उमेदवारीची यादी प्रसिध्द केली आहे. असे असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदार संघात मात्र उलटसुलट चर्चेला उत आला आहे.

SANGLI : KOLHAPUR : LOKSABHA : महायुतीत पेच उमदेवारीचा…

संजयकाका पाटील, धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे या मतदार संघांचे विद्यमान खासदार आहेत. परंतु तिघांच्याही उमेदवारीवरून जोरदार गदारोळ उठला आहे. सांगलीची जागा भाजपकडेच असली तरी सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांना जोरदार विरोध होताना दिसत आहे. येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार पृथ्वीराजबाबा देशमुख, दीपक शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

2014 च्या मोदी लाटेत संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेचे तिकीट मिळवले.

तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा त्यांनी त्यावेळी भरघोस मतांनी पराभव केला. काँग्रेसच्या जिव्हारी हा पराभव लागला होता. कारण काँग्रेसच्या स्थापनेपासून सांगलीची जागा कायमच काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाला होता. अगदी आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींचा पराभव झाला परंतु सांगलीतून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे त्यावेळी संजयकाकांचे मोठे कौतुक झाले होते. गेल्या निवडणुकीतही संजयकाकांना उमेदवारी मिळाली आणि त्यांनी दुसर्‍यांदा विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसर्‍या टर्ममध्ये मात्र भाजपमध्ये धूसफूस सुरू झाली आहे. काकांना पक्षातच मोठा विरोध होवू लागला आहे. पृथ्वीराज देशमुख यांनीही जोरदार फिल्डींग लावली आहे. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीसाठी अजूनही जोरदार खल सुरू आहे. विशाल पाटील यांनाही भाजपमध्ये घेवून उमेदवारी बहाल करायची अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे अजूनही काकांच्या उमेदवारीची काही नक्की नाही, असे दिसते.

कोल्हापूर मतदार संघात गतवेळी आमच ठरलयं म्हणून संजय मंडलिक निवडून आले.

त्यांना निवडून आणन्यात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा मोठा हात होता. त्यांच्या जोडीला मंत्री हसन मश्रीफ होते. परंतु याता राजकारणातील काटे उलटे फिरत आहेत. संजय मंडलिक यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटाची साथ धरली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबर राज्यातील 13 खासदार आहेत. त्यापैकी संजय मंडलिकही आहेत. परंतु आता भाजपने शिंदे गटाच्या वाटणीला केवळ 8 ते 9 जागा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कटणार आहे. त्याची भिती सर्वच विद्यमान खासदारांना आहे. कोल्हापूरमधून जर संजय मंडलिक यांचा पत्ता कापला आणि जागा भाजपच्या वाटणीला गेली तर महाडिक कुटुंबीयांमध्ये उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. धनंजय महाडिक यांनी आपण लोकसभेला तयार असल्याचे अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांची उमेदवारी अजून पक्की नाही. शेवटचा पर्याय म्हणून ते भाजपच्या उमेदवारीवरही लढू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवबंधन हातात बांधून त्यांनी एका महिन्यातच खासदारकी मिळवली. त्यांनी राजू शेट्टी यांची हॅट्टीक चुकवली. गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. धैर्यशील माने यांनी उध्दव यांची साथ सोडून मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या उमेदवारीचा त्यांना शब्द दिला आहे. नुकताच मुख्यमंत्र्यांनी माने यांच्या साठी हातकणंगले लोकसभा मतदार संघात तीन ठिकाणी मोठे कार्यक्रम घेतले. या कार्यक्रमात माने यांना बोलायची संधीही दिली. एकंदरीत या तिन्ही कार्यक्रमात मानेंनी लोकसभेचा थोडक्यात प्रचारच सुरू केला आहे. त्यांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे सांगत असले तरी त्यांच्याबाबतही मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. धैर्यशील माने बेपत्ता आहेत, अशा आशयाचे बॅनर घेवून काहींनी मध्ये मोर्चाही काढला होता. आठ हजार कोटींचे विकास कामे केली आहेत, असे ते सांगत असले तरी काम आणि खासदार दाखवा आणि एक हजार मिळवा, असे बक्षीस विरोधकांनी मतदार संघात लावले आहे.

धैर्यशील माने यांच्याबाबत नाराजीचा फटका बसू नये यासाठी येथे भाजप येथे जागा आपल्या ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे.

येथे भाजपकडून राहुल आवाडे, आमदार विनय कोरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. येथे तडजोड झाली आणि मुख्यमंत्री माने यांच्यासाठी हटून बसले तर येथेही ऐनवेळी धैयशील माने भाजपच्या चिन्हावर लढू शकतात.

एकंदरीत सांगली, कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात अजूनही महायुतीमध्ये विद्यमान खासदारांना आपल्या तिकीटाची गॅरंटी नाही. अजुनही त्यांच्यामध्ये धाकधूक आहे. अगदी शेवटच्या घटकापर्यंत काहीही घडू शकते. त्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवून बसले आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज