SANGLI LIKSABHA : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून सांगलीची जागा काँग्रेसला निश्चित झाल्याचे वृत्त आहे. प्रदेश काँग्रेसने लोकसभेसाठी इच्छूक उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरूवार दि. 22 रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीत सांगलीतून विशाल पाटील यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून त्यांचे नाव दिल्लीला पाठवले जाणार असल्याचे वृत्त आहे.
SANGLI LIKSABHA : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब
जनप्रवास । सांगली
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह काही मित्र पक्षांची महाविकास आघाडी आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. काही जागांच्या अडचणी आहेत. त्यावर महाविकास आघाडीचे नेते तोडगा काढत आहेत. पण काँग्रेसने आपल्या हक्काच्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी मतदारसंघनिहाय समन्वयक व निरीक्षक नेमण्यात आले आहेत. काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांची प्राथमिक यादी दि. 22 फेबु्रवारीच्या पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत निश्चित केली जाईल. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्यासह राज्यातील बडे नेते या बैठकीला उपस्थित राहतील.
सांगली लोकसभेसाठी जागा काँग्रेसला निश्चित झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या ठिकाणी विशाल पाटील यांच्या नावावर राज्यस्तरीय समितीकडून गुरूवारी शिक्कामोतर्ब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही यादी दिल्लीत काँग्रेसच्या निवडणूक समितीला दिली जाईल. तेथून उमेदवारांच्या घोषणा होणार आहे. सध्या उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विशाल पाटील लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारसंघात विविध भागात ते जाऊन महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकार्यांच्या भेटी ते घेत आहेत. त्यांच्या पत्नी पूजा पाटील हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने विशाल पाटील यांचा प्रचार करत आहेत.
अशोक चव्हाणांची सूत्रे पृथ्वीराज चव्हाणांकडे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या विविध समित्यांवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. मात्र ते भाजपवाशी झाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीबाबतच्या विविध समित्यांवर आता त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



