बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, 2100 रुपयांची प्रतिक्षाच
sangli local news : सांगली जिल्ह्यातील 5 लाख बहिणींना मिळणार 1500 रुपये : विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात याविषयी प्रचार मोहीम राबविली गेली. सत्तारुढ महायुती सरकारकडून महिलांना सहाव्या हप्त्याच्या एसएमएसला सुरुवात झाली आहे; जिल्ह्यातील 5 लाखांवर बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत. 2100 रुपयांऐवजी 1500 रुपयेच खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थी लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर आहे.
sangli local news : सांगली जिल्ह्यातील 5 लाख बहिणींना मिळणार 1500 रुपये
महायुती सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. जिल्ह्यातील 7 लाख 28 हजार 160 महिलांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी 7 लाख 10 हजार 772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. 5 हजार 580 महिलांचे अर्ज अंशतः अपात्र ठरले आहेत. याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या 923 महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र झाले आहेत. अर्ज मंजूर झालेल्यांचे अनुदान झाले आहे. जिल्ह्यातही आतापर्यंत पाच लाखांवर महिलांच्या खात्यावर सुमारे 140 कोटी रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा झाली आहे.
लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते. आता 25 डिसेंबरपासून चालू महिन्याचा हप्ता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात झाली आहे. एका महिन्यासाठी लागणारी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या महिन्यात दोन टप्प्यात महिलांना पैसे मिळणार आहेत.
काही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये शुक्रवारी जमा झाले आहेत. ज्या काही महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही, त्यांना दुसर्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. एकंदर दोन टप्प्यात लाडक्या बहिणींना लाभ मिळणार असल्याने बँकेच्या एसएमएसकडे पात्र महिलांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यात दिला. त्यामुळे महिलांना महायुती सरकारबद्दल एक विश्वास निर्माण झाला होता; परंतु सत्ताधारी महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी 2100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण न करता 1500 रुपये दिल्याने जिल्ह्यातील महिलांत नाराजीचा सूर आहे.
महिलांच्या पदरात निराशाच
राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेत येण्यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा राहिल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. सत्ता स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता येईल, अशी महिलांची अपेक्षा होती. मात्र पूर्वीप्रमाणेच 1500 रुपये मिळणार असल्याने लाडक्या बहिणींची निराशा झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.