rajkiyalive

SANGLI LOKSABHA : वीस वर्षांनंतर वसंतदादा घराणे पुन्हा एकत्र

विश्वजीत कदमांचा पुढाकार: काँग्रेस कार्यकर्ते सुखावले

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : वीस वर्षांनंतर वसंतदादा घराणे पुन्हा एकत्र : जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व दादा-कदम घराण्याभोवती फिरते, पण गेल्या वीस वर्षांपासून दादा-कदम गटाचा वाद आणि त्यामध्ये दादा गटात असलेले दादा-भाऊ असे दोन गट, त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे प्रचंड नुकसान झाले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीत गटबाजी होत होती. त्यामुळे काँग्रेसला जबरदस्त धक्का सहन करावा लागत होता, मात्र आता लोकसभेच्या निमित्ताने दादा घराणे एकत्र आले. त्यासाठी आ. विश्वजीत कदमांचा पुढाकारदेखील महत्वाचा आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते आता सुखावले आहेत.

SANGLI LOKSABHA : वीस वर्षांनंतर वसंतदादा घराणे पुन्हा एकत्र

जिल्ह्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांचा दबदबा होता. त्यानंतर स्व. प्रकाशबापू पाटील जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर दादा घराण्यात प्रकाशबापू पाटील व विष्णूअण्णा पाटील असे दोन गट झाले. विष्णूअण्णांच्या निधनानंतर स्व.मदनभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादीची धुरा सांभाळली. त्यामुळे निवडणुकीत दादा घराण्यातील वाद उफाळून येत होता.

पण 2004 च्या विधानसभा निवडणुकीत स्व. मदनभाऊ पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली गेली नाही.

त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. मदनभाऊ पाटील व प्रकाशबापू पाटील एकत्र आले. दादा घराण्याची त्यावेळी एकी झाली, सर्वजण कामाला लागले आणि विधानसभेवर अपक्ष म्हणून मदनभाऊ पाटील निवडून आले. त्यानंतर दादा-कदम गटाचा वाद सुरू झाला.

2005 मध्ये प्रकाशबापू पाटील यांचे निधन झाले.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत कदम गटाकडून माजी आमदार मोहनराव कदम यांनी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. उमेदवारी देखील जाहीर होणार होती. पण मदनभाऊ पाटील यांनी दिल्ली दरबारी वजन वापरून माजी मंत्री प्रतिक पाटील यांना उमेदवारी घेतली, आणि परत दादा-कदम गटातील वाद वाढत गेला. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीमध्ये हा वाद प्रत्येकवेळी उफाळून येत होता. त्याचा फटका काँग्रेसला बसला. स्व. मदनभाऊ पाटील यांचे निधन झाल्यानंतर विशाल पाटील राजकारणात सक्रीय झाले. पण त्यांनी देखील भाऊ व कदम गटाला त्रास देण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या राजकारणात त्यांनी स्वतंत्र गटाची मांडणी केली.

2016 मध्ये झालेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत माजी आमदार मोहनराव कदम काँग्रेसकडून मैदानात होते. त्यावेळी देखील विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कदमांना विरोध केला. हा वाद असाच पुढे चालू राहिला. गटबाजीचा त्रास कार्यकर्त्यांना होऊ लागला. त्यामुळे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षापासून लांब गेले. जिल्ह्यात नंबर वन असलेली काँग्रेस रसातळाला गेली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला उमेदवारी देखील मिळाली नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील इच्छूक होते.

पण यावेळी कदम-दादा गटाचा वाद मिटविण्यात आला. त्यासाठी आ. विश्वजीत कदम यांनी सर्वात मोठी जबाबदारी घेतली. विशाल पाटील यांना आ. कदम यांनी उमेदवारीचा शब्द दिला. दादा घराण्यातील दादा-भाऊ गटावर पूर्णविराम देण्यात आला. जयश्रीताईदेखील मन मोठ करून तयार झाल्या. याबरोबर प्रतिक पाटील, शैलजाभाभी पाटील एकत्रित आले. विशाल पाटील यांच्यासह जयश्रीताई पाटील, विक्रम सावंत व पृथ्वीराज पाटील यांनी आ. विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न केले. जागा मिळाली नाही, पण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वांनी ताकद पणाला लावली.

प्रत्येक निवडणुकीत दादा घराण्यातील नेत्यांचे तोंड वेगवेगळ्या दिशेला जात होते.

या निवडणुकीत मात्र सर्वजण एकत्र आले. सांगली विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी जयश्रीताई पाटील यांनी घेतली. त्यांच्यावर देखील अनेकांनी दबाब आणण्याचा प्रयत्न केला. दादा-भाऊ राजकारण कसे होते, ते सांगून कान भरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करून विशाल पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करत राहिल्या 250 हून अधिक बैठका देखील त्यांनी घेतला. स्व.मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्तेदेखील प्रचारात सक्रीय झाले. त्यांना विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील व प्रतिक पाटील यांच्या पत्नी ऐश्वर्या पाटील, शैलजाभाभी पाटील यांनी देखील मदत केली.

प्रतिक पाटील जिल्ह्यातील संपर्क कार्यालयातून विशाल पाटील यांच्या प्रचाराची तयारी करत होते.

तर दुसरीकडे त्यांच्या घरातील महिलांची टीम प्रचारात सक्रीय होती. विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील खानापूर-आटपाडी मतदारसंघात तळ ठोकून होत्या. प्रतिक पाटील यांच्या पत्नी ऐश्वर्या पाटील यांनी मिरजपूर्व भागासह इतर भागात देखील जोरदार प्रचार केला. सर्व दादा कुटुंब वीस वर्षानंतर एकत्र आले. त्यामुळे कार्यकर्ते देखील सुखावले आहेत. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आता एकत्र आली आहे. याचा फायदा आगामी विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत काँग्रेसला निश्चितच होणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज