rajkiyalive

SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक ; काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस कमिटीवरील ‘काँग्रेस’ हा शब्द पुसल्याने विशाल पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. शनिवारी काँग्रेसच्या नावाचा नवा डिजीटल फलक विशाल पाटील यांनी कमिटीवर लावला. तर कार्यकर्त्यांनी संयम सोडू नका, पक्षावर आक्रमकपणा दाखवायचा नाही, भाजप विरोधात दाखवू, असा इशारा विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा शिवसेना (उबाठा) गटाला सोडली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. शुक्रवारी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करून काँग्रेस कमिटीवरील काँग्रेस या शब्दाला रंग फासला होता. शनिवारी यावर विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी तातडीने नवीन डिजीटल फलक तयार करून आणला आणि दुपारी काँग्रेस कमिटीसमोर लावला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना विशाल पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते ही नाराजी काँग्रेस पक्षावर काढत आहेत. पण तसे करू नका. आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे. आमच्यावर नाराजी दाखवावी. काँग्रेससाठी वसंतदादा कुटुंबियांसह अनेकांनी त्याग केला आहे. दादा कुटुंबियांचे प्रेम काँग्रेसवर आहे. पुढच्या पिढीचे काय सांगता येत नाही. आम्हाला हे प्रेम कायम ठेवावे लागणार आहे. आमच्या कुटुंबियावर काँग्रेसने प्रेम केले आहे. माझ्या एकट्यावर अन्याय झाला आहे. तरी आमचा संयम सुटलेला नाही.

कार्यकर्त्यांनी संयम सोडू नये. आक्रमकता अशा गोष्टीत दाखवून नये. भाजविरोधात आक्रमकता असली पाहिजे. पक्षांतर्गत आक्रमकता ही शोभणारी नाही. ज्यावेळी भाजपविरोधात लढाई असेल त्यावेळी माझी आक्रमकता दिसेल, असा इशारा विशाल पाटील यांनी दिला. तर रणनितीबद्दल सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सर्वांनी संयम पाळावा, असे आवाहन देखील विशाल पाटील यांनी केले.

‘काँग्रेस’ शब्द पुसल्याचे समर्थन नाही: आ. सावंत, पाटील

सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत, अजूनही प्रयत्न सोडले नाहीत. मात्र काँगे्रस कमिटीवरील काँग्रेस शब्द पुसलेल्या घटनेचे समर्थन करता येणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी या करीता आम्हा सर्वांची भावना आजही आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाचा धक्का आम्हा सर्वांनाच बसलेला आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा आणि काँग्रेसची उमेदवार विशाल पाटील यांना द्यावी असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी वरिष्ठांना दिला आहे. सांगलीची हक्काची जागा काँग्रेस कडेच राहावी या साठी आम्ही सर्वच जिल्हातील नेत्यांनी प्रयत्नाची परकष्टा केली आजही आम्ही प्रयत्न सोडले नाहीत अशा परिस्थितीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.

पण मनात कितीही संतापाची भावना असली तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बोर्डावरील काँग्रेस या शब्दाला रंग फासण्याची कृती कदापी समर्थन करण्यासारखी नाही. गेल्या 75 वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे. काँग्रेस हा शब्द तिथे सन्मानाने मिरवत आला आहे. तो केवळ एका शब्दाचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेसही विचाराचा अपमान ठरेल. त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढळू देऊ नये. देशातून जातीयवादी शक्तीचे उच्चाटन करण्यासाठी बांधील असला पाहिजे. आपल्या लढाईची दिशा निश्चित आहे. त्या लढाईपासून भरकटून चालणार नाही, असे आ. विक्रम सावंत व पृथ्वीराज पाटील यांनी स्पष्ट केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज