rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीस तयार: दिल्लीत प्रस्ताव

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीस तयार: दिल्लीत प्रस्ताव : शिवसेना (उबाठा) गटाने सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या प्रदेश व जिल्हा नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अद्याप जागेचा निर्णय झालेला नसताना शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. तो उमेदवार मागे घ्यावा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत, अशी मागणी आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक यांची भेट घेऊन केली. या संदर्भात प्रदेशचे नेते शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीत काँग्रेस मैत्रीपूर्ण लढतीस तयार: दिल्लीत प्रस्ताव

चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीने नाराजी

महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. सांगली हा काँग्रेसचा बोलकिल्ला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी प्रदेश काँग्रेसकडे आक्रमक भूमीका घेतली होती. सांगलीच्या जागेबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसताना शिवसेनेने बुधवारी जाहीर केलेल्या 16 जणांच्या यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यावर जिल्हा व प्रदेशचे काँग्रेस नेते आक्रमक झाले आहेत.

बुधवारी जिल्हा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, उमेदवार विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली गाठली. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व सचिव मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. यावेळी आ. विश्वजीत कदम म्हणाले, सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने सांगली सोडली नाही. शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला. शिवसेनेने पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले व मावळची जागा घेतली मग सांगलीची कशासाठी हवी होती? सांगलीत त्यांची ताकद नसताना जागा कशाला? असा सवाल करत सांगलीतून विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर करावी, आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचे सांगितले. या संदर्भात प्रदेशचे नेते शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील, त्यानंतर निर्णय घेऊ, असे खर्गे यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेने सांगलीतून उमेदवार जाहीर केल्याने प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भान चर्चा करत आहोत, काँग्रेस त्या जागांबाबत आग्रही आहोत.

अजुनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही ‘त्या’ जागांवरून उमेदवार जाहीर करणे योग्य नाही. आघाडीधर्माचे पालन सगळ्यांनीच करायला हवे असे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. शिवसेनने या जागांवर फेरविचार करावा. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही उद्धव ठाकरेंना आघाडीधर्माची आठवण करुन दिली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केले.

त्यांनी आघाडीधर्म पाळला असता तर बरे झाले असते. चर्चा सुरू असताना उमेदवार घोषित केल्याने आघाडीधर्माला गालबोट लागले आहे. त्यांनी यावर पुनर्विचार करावा, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम यांनीही ठाकरेंच्या यादीवर आक्षेप नोंदवत उघड नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस जागा सोडणार नाही: आ. विश्वजीत कदम

सांगलीची जागा काँग्रेसची आहे. आम्ही ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व आमचे आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे. तरी देखील शिवसेनेने परस्पर या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आहे. पण आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत. आणि पक्ष निश्चितच विशाल पाटील यांना उमेदवारी देतील, असा विश्वास आ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज