जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : काँग्रेसची जत पॅटर्नवर चाचपणी सुरू : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपामध्ये जत विधानसभेची जागा राष्ट्रवादीला गेली आणि काँग्रेस पदाधिकार्यांनी राजीनामे देत विरोधी पक्षाचे काम केले. काँग्रेसला डावलले तर काय होते, हे दाखवून दिले होते. तोच पॅटर्न आता सांगली लोकसभा निवडणुकीत राबविण्यासाठी पक्षाच्या काही पदाधिकार्यांकडून चाचपणी करण्यात येत आहे. यामध्ये आमदार वगळता इतर सर्व पदाधिकार्यांनी काँग्रेस पक्षाचे राजीनामे देऊन ‘अपक्ष’ उमेदवार विशाल पाटील यांना बळ देणार आहेत.
SANGLI LOKSABHA : काँग्रेसची जत पॅटर्नवर चाचपणी सुरू
आमदार वगळता पदाधिकारी देणार राजीनामे
राज्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने महाविकास आघाडी केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून राज्यात निवडणुका लढविल्या जात आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तिन्ही पक्षात जागा वाटप देखील झाले आहे. त्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना (उबाठा) गटाला गेली आहे. वास्तविक शिवसेनेची या मतदारसंघात ताकद कमी आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र गेल्या दहा वर्षात मोदी लाटेत या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे. मात्र या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यावर्षी विशाल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली होती. गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देखील दिल्या होत्या.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गणिते बिघडली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा देखील केली होती. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात गणिते बिघडली. ही जागा शिवसेनेला गेली आहे. यामध्ये मोठे षडयंत्र असल्याचा आरोप आता काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, असा उठाव आता काँग्रेस व दादाप्रेमी जोरदारपणे करत आहेत. अपक्ष लढण्यासाठी दबाब वाढत चालला आहे. शुक्रवारी मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आली. तर जिल्हा काँगे्रस भवनवरील काँग्रेस शब्दाला चुना लावला होता. तर शनिवारी जत तालुक्यातील युवकांनी रक्ताने पत्र लिहून विशाल पाटील यांनी अपक्ष लढावे, अशी साद घातली होती.
त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस आक्रमक झाली असून विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.
ते अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले तर जत पॅटर्न राबविण्यावर चाचपणी सुरू आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. या आघाडीच्या जागा वाटपात हा जत विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला होता. वास्तवित या मतदारसंघात काँग्रेसने यापूर्वी भाजपला टक्कर दिली होती. तरी देखील ही जागा राष्ट्रवादीला सोडली गेल्याने काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले होते. यावेळी भाजपकडून प्रकाश शेंडगे निवडणुकीच्या रिंगणात होते. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर राग व्यक्त करत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकार्यांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा काँग्रेसकडे दिले होते. त्यानंतर त्यांनी आघाडी धर्माच्या विरोधात जाऊन प्रचार केला होता.
हेही आवर्जुन वाचा
देशपातळीवर पक्ष फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे : आ. सतेज पाटील
SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांची समर्थकांनी पहिल्याच दिवशी घेतले दोन अर्ज
SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला
तो पॅटर्न लोकसभा निवडणुकीत राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांनी पक्षाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत यांच्याकडे देऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा उघड प्रचार करण्याची रणनिती आखली जात आहे. मात्र यामध्ये आ. विश्वजीत कदम व जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत मात्र उघड प्रचारात सहभागी होणार नाहीत. इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उघड प्रचारात करतील, असे बोलले जाऊ लागले आहे. मात्र याचा अंतिम निर्णय हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर होऊ शकतो. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष लढून जत पॅटर्न राबविणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जि.प.सदस्य, नगरसेवक नसल्याने करवाई टळणार…
सांगली जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये सदस्यांचे सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे माजी पदाधिकार्यांना प्रचार करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. सभागृह अस्तित्वात असते तर पक्षविरोधी भूमीका घेतली म्हणून पद रद्द झाले असते. पण सध्या सभागृहच अस्तित्वात नाही. त्यामुळे हे माजी पदाधिकारी उघड प्रचार करू शकतात. त्यावर पक्षीय कारवाईचा काहीही संबंध येणार नाही.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.