rajkiyalive

SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी

SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी

SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी ठोकला शड्डू, खासदार संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात

 

SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी

जनप्रवास । अनिल कदम

सांगली : लोकसभा निवडणूक फेबु्रवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सुरुवातीला शांत असणार्‍या काँग्रेसनेही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याने मैदानातून पळ काढणार नसल्याचे स्पष्ट करीत लोकसभेसाठी शड्डू ठोकला. माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात एकवाक्यता असल्याने काँग्रेस एकदिलाने असल्याचे दिसते. सलग दोन महाविजयानंतर भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात नियोजनबद्ध बांधणी केली. परंतु भाजपमध्ये उमेदवारीवरुन चुरस सुरु आहे.

माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही लोकसभेसाठी दावेदारी सांगितली आहे,

त्यामुळे विद्यमान खासदार संजयकाका पाटील गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. यावर भाजप कोणता मार्ग काढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांच्यादृष्टीने महत्वाची असल्याने सांगलीच्या जागेवर दावा केला जात आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. गतवर्षी काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढली. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह नेते सहभागी झाले.

 

पदयात्रेव्दारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांच्याकडून जिल्हाभर तयारी सुरु असल्याचे दिसून येते.
भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून विशाल पाटील यांना आव्हान दिले होते. विशाल पाटील यांनी मैदानातून पळ काढला आहे, त्यांनी मैदानात येवून लढावे, असे ललकारले आहे. त्यानंतर विशाल यांनी आक्रमक भूमिका घेवून खासदारांना प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. सांगलीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालय सुरु करीत कामाला लागल्याचे दाखवून दिले आहे. वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती व विचाराचे आम्ही आहोत, त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही.

लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच.

देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. पण या निवडणुकीत खासदारांचा पराभव निश्चित असल्याचा आरोप करीत प्रतिआव्हान दिले आहे. मागील काही वर्षात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पहायला मिळाले होते. एप्रिल 2023 मध्ये झालेल्या सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय चित्र काहीसे बदलले. त्यानंतर काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे.

 

जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण आहे, परंतु त्याचा लाभ उठविण्याची संधी काँग्रेसला आहे.

त्यादृष्टीने काँग्रेसने वाटचाल सुरु केल्याचे चित्र दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सोबत येईल, शिवाय उद्धव ठाकरे गटाची साथ मिळणार आहे. सांगलीसाठी भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरु आहे. भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन वाद उफाळून येतात. खा. पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेवून निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका देशमुख यांनी मांडली आहे. विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे जिल्हयाच्या विकासाचे केंद्र आहे, त्यादृष्टीने कामे होणे गरजेचे होते, परंतु दोन्ही कामे झाली नसल्याबाबतची खंत व्यक्त करीत अपयशाचे खापर खासदारावर फोडले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष देशमुख वेगवेगळ्या बैठका घेत आहेत.

पक्षाचे जुने-नव्या कार्यकर्त्यांची त्यांच्याकडून भेटी-गाठी सुरु आहेत. देशमुख यांचा संपर्क वाढत असल्याचे चित्र दिसून येते. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. त्यामुळे जगताप गट खासदारविरोधात आक्रमक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याशी यशवंत कारखान्यावरून वाद आहे. परंतु पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याशी खासदारांचे चांगलेच सूर जुळल्याचे दिसून येते. या परिस्थितीत देशमुखांनी लोकसभेवर दावेदारी सांगितल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. देशमुख यांना गतवेळी थांबा, पुढे विचार करु, अशा सूचना 2019 च्या निवडणुकीवेळी देण्यात आल्या होत्या. काँगे्रसमध्ये ऐकीचा नारा दिला जात असताना भाजपमध्ये विद्यमान खासदारांविरोधात उमेदवारी मागण्यात आली.

हेही वाचा

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

खासदांराची उमेदवारी थोपविणे भाजपच्या नेत्यांपुढे आव्हान आहे.

तसे झाल्यास संजयकाकांची नाराजी पक्षाकडून कशी काढली जाणार? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. मागील काही महिने जिल्ह्यातील भाजपची गाडी सुसाट होती, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर खासदार संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे भाजपच्या वरिष्ट नेत्यांना निवडणुकीत पक्षातील मतभेद मिटवून बंड थोपवावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अजितदादा गटाच्या फुटीने काँग्रेससोबत राष्ट्रवादी किती?

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे. जिल्ह्यात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतील अजितदादा गट फुटला. त्याचा परिणाम जिल्ह्यातही होवू लागला. राष्ट्रवादीतील माजी पदाधिकार्‍यांसह सांगली, मिरज महापालिकेच्या माजी नगरसेवकांनी अजितदादा गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजितदादा गटाकडून प्रदेशाध्यक्ष पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न दिसतो, त्यामुळे अजितदादा गटाच्या फुटीमुळे काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस किती राहणार, अशी चर्चा रंगली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज