rajkiyalive

SANGLI LOKSABHA : दादा घराण्यात भासतेय मदनभाउंची उणीव

 

दिनेशकुमार ऐतवडे
SANGLI LOKSABHA : दादा घराण्यात भासतेय मदनभाउंची उणीव : लोकसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी राज्यात सांगलीची चर्चा जोरदार होताना दिसत आहे. कारणही तसेच आहे. सांगलीची जागा आम्हालाच द्या अशी म्हणण्याची वेळ दादा घराण्यावर आली आहे. मुंबईपासून दिल्लीपयर्ंत विशाल पाटलांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आता जर मदन पाटील असते तर सांगलीची ही अवस्था झाली नसती, मदन पाटील थेट उद्धव ठाकरेंना या जागेबाबत बजावले असते अशी चर्चा सांगलीतून ऐकायला मिळत आहे. एकंदरीत खमक्या मदन पाटील यांची उणीव दादा घराण्याला सध्या भासत आहे हे नक्की.

SANGLI LOKSABHA : दादा घराण्यात भासतेय मदनभाउंची उणीव

2004 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकृतीच्या कारणावरून प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी नाकारण्याचा घाट घालण्यात आला होता. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीचा घोळ सुरूच होता. मोहनराव कदम यांना जवळपास उमेदवारी पक्की झाली होती. सांगलीतील काँगे्रस भवनच्या पुढे मांडवही घालण्यात आले होते. परंतु मदन पाटील यांनी थेट दिल्लीश्वरांना बजावले. प्रकाशबापुंनाच तिकीट द्या त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो असे त्यांनी सांगितल्याने प्रकाशबापूंनाच तिकीट मिळाले. आणि मदन पाटील यांना सांगितल्याप्रमाणे त्यांना निवडून आणलेही.

2004 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने मदनभाउंच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले होते. करारी बाण्याच्या मदन भाउंनी जागेवरच राष्ट्रवादी सोडली आणि सांगली विधानसभेला मै हू ना म्हणत अपक्ष उमेदवारी भरली. विधासभेचा दरवाजा फोडून त्यांनी प्रवेश केला. ब्रिटीशांनाही लाजवेल अशी वेषभूषा, करडी नजर, त्यावर काळा गॉगल आणि जागेवर निर्णय घेण्याची क्षमता असलेल्या मदन भाउंनीही दोन वेळा लोकसभा आणि एक वेळा विधासभा गाजवली. काहीकाळ त्यांना राज्यात मंत्रीपदही मिळाले होते.

मदन पाटील आणि प्रकाशबापू यांच्या घराण्यात वाद असला तरी संकटकाळी ते एकत्र येत असत. मदन पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार असतानाही प्रतिक पाटील यांना त्याचा उघड उघड प्रचार केला होता. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाशबापुंनीच मदन पाटील यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे बापुंना मदन पाटलांची आणि मदन पाटलांची बापुंना मोठी मदन व्हायची.

प्रकाशबापुंच्या निधनानंतर मदन पाटील यांच्यावर दादा घराण्याची जबाबदारी आली होती. त्यांनी काही काळ वसंतदादा कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले. सांगली जिल्ह्यात सांगलीपासून जत पर्यंत आणि शिराळ्यापासून मिरज पूर्वभागापर्यंत मदन पाटलांचा वेगळा गट होता. कार्यकर्त्यांना जपणारा नेता अशी त्यांची ओळख होती. प्रतिक पाटील यांना दोन वेळा खासदार होण्यातही मदनभाउंचा सिंहाचा वाटा होता.

1952 पासून अपवाद वगळता काँग्रेसच्या ताब्यात असणारा सांगली लोकसभा मतदार संघ 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात गेला. गेल्या निवडणुकीत तर सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटणीला गेली. संघटनेच्या तिकीटावर विशाल पाटील यांना उभे रहावे लागले. यंदा तर जागा आणि उमेदवारीही काँग्रेसच्या ताब्यातून आणि दादा घराण्याच्या ताब्यातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे सर्वांना आठवण झाली आहे ती मदन भाउंची.
मदन भाउ असते तर त्यांनी मुंबई आणि दिल्ली दरबारी मुजरा घातला नसता. सांगलीत बसूनच विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असती. शिवसेनेला आणि उध्दव ठाकरे यांना सांगलीचा नाद सोडा असे खडसावून सांगितले असते. मुंबईतील नेत्यांना सांगलीकडे धाव घ्यावी लागली नसती. हे मात्र नक्की.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज