rajkiyalive

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून...2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?
अमृत चौगुले
SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का? : परंपरागत काँग्रेसच्या सांगली लोकसभा मतदार संघातून युवानेते विशाल पाटील इच्छुक होते. पण महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठा सेनेला येथील उमेदवारी बहाल करण्यात आली. हायकमांडकडे धडक मारूनही विशाल पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याने काँग्रेस व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत. परिणामी विशाल पाटील यांनी चुलतबंधू माजी मंत्री स्व. मदनभाऊ पाटील यांच्या 2004 च्या विधानसभा निवडणुकीतील बंडाची पुनरावृत्ती करावी. उमेदवारी कापल्याने मिळणारी सहानुभूती आणि भाजपविरोधातील अ‍ॅन्टी इन्कम्बन्सी इनकॅश करीत अपक्ष म्हणून धडक मारावी. त्याद्वारे ‘दरवाजा फोडून’ संसदेत एंट्री करावी, अशी लोकभावना व्यक्त होत आहे. त्यांनीही त्याला प्रथमदर्शनी तयारी दर्शविली आहे. ‘आता नाही तर कधीच नाही’ अशी परिस्थिती असल्याने न थांबता हे ‘विशाल’ धाडस ते दाखविणार का, याची उत्सुकता मतदारसंघात लागून राहिली आहे.

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?

काँग्रेस अन् वसंतदादा समर्थकांवरील अन्यायाचा जनक्षोभ; भाजप अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी इनकॅश करण्याची संधी

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या स्थापनेपासून फक्त 2014 व 2019 वगळता कायमच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या प्रामुख्याने वसंतदादा पाटील घराण्याने या मतदारसंघाचे सर्वाधिक वेळा नेतृत्व केले आहे. यापूर्वी स्व. वसंतदादा पाटील, शालिनीताई पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील आणि प्रतिक पाटील यांनी खासदार म्हणून काम पाहिले आहे. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेत प्रतिक पाटील यांचा पराभव झाला आणि भाजपमधून विद्यमान खासदार संजय पाटील यांना संधी मिळाली. दरम्यान 2019 मध्ये जागावाटपात ही जागा स्वाभिमानी विकास आघाडीला मिळाली. त्यावेळी विशाल पाटील यांनी संजय पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवत दुसर्‍या क्रमांकाची मते मिळविली होती. अर्थात आ. गोपीचंद पडळकर यांच्या वंचित आघाडीमधून उमेदवारीमुळे मतविभागणी होऊन संजय पाटील यांना दुसर्‍यांदा संधी मिळाली, तरी मताधिक्य कमी झाले होते.

यावेळी भाजपमधून संजय पाटील यांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळाली आहे.

त्यांच्याविरोधात विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीतून काँग्रेसच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. परंतु कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची ही उबाठा सेनेला दिल्याचे घोषित करण्यात आले. दोन आठवड्यापूर्वीच सांगली दौर्‍यात उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी आ. डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्ली, मुंबईपर्यंत धडका मारल्या. परंतु अखेर तोडगा न निघता ही जागा चंद्रहार पाटील यांनाच देण्यात आली.

यामुळे आता काँग्रेसमधून प्रचंड नाराजी उफाळून आली आहे.

भाजपच्या पाडावासाठी विशाल पाटील हेच उमेदवार असल्याचा दावा होत आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष मैदानात उतरावे, अशी अपेक्षा काँग्रेसजन, वसंतदादा, मदनभाऊ गटातून व्यक्त होत आहे. काँग्रेसची महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, मार्केट कमिटी, पंचायत समित्यांसह मोठी ताकद आहे. त्याच जोरावर विशाल पाटील यांनी सन 2004 मध्ये स्व. मदनभाऊ पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी नाकारल्याने ज्याप्रमाणरे बंड पुकारले होते त्याप्रमाणे बंड पुकारावे. अपक्ष उभारून ‘दरवाजा फोडून’ टॅगलाईनखाली ताकद दाखवून द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनरेटा सुरू झाला आहे.

भाजपला तुल्यबळ लढत देण्यासाठी विशाल पाटीलच योग्य उमेदवार आहेत.

दुसरीकडे भाजपमधील संजय पाटील यांच्यावर नाराज असलेले माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री शिवसेना नेते अजितराव घोरपडे, स्व. आ. अनिल बाबर गट यांच्यासह अनेक नाराजांचीही विशाल पाटील यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बळ मिळेल. सोबतच संजय पाटील यांचे परंपरागत विरोधक तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांचीही मोठी ताकद मिळू शकेल.

वास्तविक सन 2019 च्या निवडणुकीत विशाल यांनी स्वाभिमानीतून साडेतीन लाख मते मिळविली होती.

अपक्ष म्हणून तेथून सुरुवात आहे. सोबतच वंचितचा पाठिंबा मिळाल्यास पडळकरांना मिळालेल्या 3 लाख मतांपैकी जास्तीत जास्त मते मिळतील. शिवाय मागील निवडणुकीत 5 लाख 8 हजार मते संजयकाका पाटील यांना मिळाली होती. म्हणजेच त्यांच्याविरोधात सुमारे 7 लाखांहून अधिक मतदान झाले होते. आता संजयकाकांविरोधात भाजपमध्ये नाराजी आहे. शिवाय मोदींचाही 2019 च्या तुलनेत करिष्मा कमी असल्याने संजयकाकांना मागील मते टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. परिणामी भाजपमधील नाराजीचा विशाल यांना फायदा होऊ शकतो.

सध्या विशाल मैदानात उतरल्यास तिरंगी लढत असली तरी संजयकाका विरुद्ध विशाल पाटील अशीच दुरंगी चुरशीची लढत होऊ शकते. त्याचा फायदा होऊन 2004 ला मदनभाऊंनी विधानसभेचा दरवजा फोडून केलेल्या एंट्रीची लोकसभेत एंंट्री करून पुनरावृत्ती होऊ शकेल. त्यासाठी मैदानात उतरून धडक मारण्याचे विशाल धाडस दाखवावे, अशी मागणी होत आहे.

अर्थात विशाल पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच लंगोट चाढविले असून, संजय पाटलांनी कवचकुंडले उतरून मैदानात लढावे असे आव्हान दिले होते. परंतु आता विशाल पाटील यांचेच काँग्रेसचे कवचकुंडल उतरले आहे. त्यामुळे ते अपक्ष लढणार का, त्याला डॉ. विश्वजित कदम यांच्यासह पक्षीय नेत्यांची साथ मिळणार का, हे लवकरच कळेल. त्यावर ते मैदानात उतरून धडक मारणार का याचाही फैसला होईल.

सतेज पाटील धाडस दाखवितात ते डॉ. विश्वजित दाखविणार का?

विशाल पाटील यांच्या लढाईची भिस्त डॉ. विश्वजित कदम यांच्यावर आहे. अर्थात महाविकास आघाडीमुळे डॉ. विश्वजित कदम हे अपक्ष लढतीला पाठिंबा देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु सध्याची निवडणूक ही केवळ विशाल पाटील यांच्यासाठीच नव्हे तर डॉ. विश्वजित कदम यांच्यासाठीही जिल्ह्याच्या नेतृत्वासह राज्याच्या नेतृत्वाला बळ देणारी ठरणार आहे. कोल्हापुरात सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असूनही धनंजय महाडिक यांच्याविरोधात जावून महायुतीचे संजय मंडलिक यांना थेट मदत केली. ‘आमचं ठरलंय’ टॅगलाईनखाली त्यांनी महाडिकांचा पाडाव केला होता. त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट मंत्रीपदही मिळाले. आता डॉ. विश्वजित यांनीही तेच धाडस दाखविल्यास विशाल पाटील यांना बळ मिळेलच. शिवाय कुरघोडी करणार्‍यांना चोख प्रत्युत्तर मिळून जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे येईल. राज्यातही त्यांची मान उंचावेल. अर्थात हे धाडस ते दाखविणार का याचा आणि त्यावर विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा फैसला होईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज