सेना पदाधिकार्यांच्या बैठका, नेत्यांच्या भेटी गाठीवर भर
जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत राऊत प्रचारासाठी की माघारीसाठी? : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत ताणाताणी सुरु असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सांगलीत दाखल झाले. काँग्रेस हक्क सोडायला तयार नाही, तरीही सेनेने प्रचाराला सुरुवात केली. पदाधिकार्यांची बैठक घेवून सूचना दिल्या. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सेनेत एकला चलो रे चे चित्र दिसून आले. मतदारसंघातही काँगे्रसच्या बाजुने वातावरण दिसत असल्याने सेनेची कोंडी होत आहे, त्यामुळे ते माघारीबाबतचा अंदाज घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
SANGLI LOKSABHA : सांगलीत राऊत प्रचारासाठी की माघारीसाठी?
गेल्या पंधरा दिवसांपासून सांगलीसाठी शिवेसना व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे उध्दव ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेत पक्षपवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. यावेळी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेऊन काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीतही सांगलीचा विषय चांगलाच गाजत आहे.
काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरला आहे. जिल्ह्यात शिवेसेनेची ताकद नसताना लोकसभेची उमेदवारी घेत काँग्रेसला डिवचले आहे. ना आमदार, ना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य नाही. कोणतीही ग्रामपंचायत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदाधिकारी आणि सदस्य नसतानाही जागा खेचली आहे. मात्र काँग्रेसचा आक्रमकपणा कायम असल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे. प्रचारयंत्रणा राबविणेही मुश्किल बनत चालल्याने खासदार राऊत यांना सांगलीत यावे लागले.
महाविकास आघाडीत काय चर्चा सुरु आहे, याकडे तुम्ही लक्ष देवू नका. संयमाने वागा. प्रचाराचा वेग वाढवा. काही दिवसांत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आपल्यासोबत उभे असतील. काँग्रेसमधील नाराजी दोन दिवसांत संपेल, असे सांगत आहेत. याशिवाय कवठेमहांकाळचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली. त्यांच्याशी बंद खोली चर्चा केली, परंतु त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. राऊतांच्या दौर्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता.
खासदार राऊत यांनी सांगलीसह मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांचा आढावा घेतला आहे. परंतु म्हणावा तसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात सेनाविरोधात वातावरण असल्याचे दिसून आले. याशिवाय काँग्रेसचाहा बालेकिल्ला असल्याने विशाल पाटील यांच्यासाठी निवडणूक सोयीची असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे खासदार राऊत हे त्याबाबतचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देतील. महाविकास आघाडीत काँग्रेसचा वाढता विरोध पाहता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांना माघार घेण्याबाबतचा विचारही सेनेकडून होवू शकतो, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.