rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत

काँग्रेस हायकमांडकडून ग्रीन सिग्नल: उद्या फैसला

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत : सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. शिवसेनेची समजूत काढा न ऐकल्यास मैत्रीपूर्ण लढा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचे वृत्त आहे. याचा फैसला रविवार दि. 31 मार्चच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता संजयकाका पाटील, विशाल पाटील, चंद्रहार पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरुन महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गट , शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी जागांवरुन तणातणी होती. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमटला. त्याबाबत राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजीत कदम आदींशी चर्चा केली.

दोन दिवसांपूर्वी आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्लीत राष्ट्रीय नेतृत्वाशी सांगलीबाबत चर्चा केली होती. त्यावर आज (शुक्रवार) प्राधान्याने खल करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्याशी सांगलीबाबत चर्चा करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या.

सांगलीबाबत ठाकरे माघार घ्यायला तयार नाहीत. संजय राऊत यांची भाषा बदलली आहे, असा निरोप आज राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आला. अशा परिस्थितीत काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करावी का? याबाबत प्रदेश नेत्यांची भूमिका राष्ट्रीय समितीने जाणून घेतली. प्रदेशकडून मैत्रीपूर्ण लढतीला हिरवा कंदील दाखवण्यात आला. सांगलीत विजयाच्या पूर्ण संधी आहेत, तेथे मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत, असे नेत्यांनी सांगितले.

सांगलीबाबत श्रीमती सोनिया गांधी या देखील आग्रही आहेत. सांगली मतदार संघात तडजोड करू नका, अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीचे नेते एकत्र येत आहेत. त्यावेळी हा विषय चर्चेला समोर ठेवला जाईल. उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय घेईल, असे राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील, शिवाय त्यांना हात चिन्ह देखील मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

हातकणंगले, मावळ मिळाले; सांगलीचा हट्ट सोडा

शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापुरची जागा काँग्रेसला दिली आहे, तर हातकणंगले मतदारसंघात माजी खा. राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता.
त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आमचे ‘मशाल’ चिन्हच नसल्याने सांगलीच्या जागेचा हट्ट धरला होता, पण आता पश्चिम महाराष्ट्रातील मावळ व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे ‘मशाल’ चिन्ह असणार आहे. त्यामुळे शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे नेते करत आहेत.

… तर राज्यात 48 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करा : संजय राऊत

काँग्रेसच्या मैत्रीपूर्ण लढतीबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणालेे, काँग्रेसला मैत्रीपूर्ण लढत करायचीच असेल तर करावी, पण ही लढत विरोधकांना मदत ठरू शकते, याचे भान ठेवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर उत्तर प्रदेश, बिहार यांसह महाराष्ट्रातील 48 जागांवर तशी लढत करा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज