rajkiyalive

SANGLI LOKSABHA : सेनेची तिकीटात बाजी, पण मेळ लागेना

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : सेनेची तिकीटात बाजी, पण मेळ लागेना : सांगली ः सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेल्यानंतरही शिवसेनेने तिकीटात बाजी मारत काँग्रेसला नमवले. चंद्रहार पाटील यांचीच उमेदवारी जाहीर करुन उद्धव ठाकरेंनी धक्का दिला. काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, आघाडीचा उमेदवार म्हणून सेनेने बाजी मारली मात्र प्रचार यंत्रणेचा मेळ लावताना दमछाक होवू लागली आहे. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे नाराज विशाल पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे निवडणुकीत सेनेचा केवळ राष्ट्रवादीवर भरोसा राहणार असल्याचे चित्र दिसते.

 

SANGLI LOKSABHA : सेनेची तिकीटात बाजी, पण मेळ लागेना

प्रचार यंत्रणा राबविताना दमछाक

तब्बल महिनाभर सांगलीवरुन महाराष्ट्र आणि दिल्लीत चर्चा झाली. सांगलीत काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले. महाविकास आघाडीची यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच ठाकरे व संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त करीत प्रदेश व केंद्रीय पातळीवरील नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसला उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीचा विषय चांगलाच गाजला. एवढे करुनही महाविकास आघाडीने एकत्रित उमेदवारांची यादी जाहीर करताना सांगलीची उमेदवारी सेनेलाच दिली.

काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला देण्यात आली.

नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अनेक जण राजीमान्याचा देण्याच्या तयारीत आहेत. तसा इशारा त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहे. महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला. सगळी वस्तूस्थिती माहिती असून जाणुनबुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे. ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना व्यक्त होत आहेत.

सांगलीत प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.

काँग्रेसमधील वरिष्ट नेतेही नाराज असून मतदारांत विशाल पाटील यांच्या बाजुने सहानुभूती निर्माण होत आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करतील, अशी चर्चा सुरु आहे. सेनेचे नेतेही काँग्रेसच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली असली तरी प्रचार यंत्रणा राबविताना दमछाक होवू लागली आहे. सेनेला जिल्ह्यात मर्यादा आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांची मदार राहणार आहे.

नाराज काँग्रेस सेनेला किती साथ देईल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते चंद्रहार यांच्यासाठी जोरदार फिल्डींग लावत असले तरी जयंत पाटील यांना यंत्रणा राबविताना कसरत करावी लागेल. आघाडीत बिघाडी झाल्याने चंद्रहार यांनी सुरु केलेल्या सांगलीतील प्रचार कार्यालयात कोणत्याही पक्षाचा नेता फिरकलेला नाही. त्यामुळे सेनेने तिकीट मिळविले असले तरी प्रत्यक्ष रणांगणात फिरताना सेनेचे उमेदवारांसह पदाधिकारी घामघूम होतील, असे चित्र दिसत आहे.

प्रचार कार्यालय सुरु, पण नेते फिरकेनात

महाविकास आघाडीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी निश्चित झाल्याने प्रचार यंत्रणा लावणे महत्वाचे ठरणार आहे. सेनेला जिल्ह्यात मर्यादा असल्याने त्यांची मदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आहे. चंद्रहार यांनी सांगलीत प्रचार कार्यालय सुरु केले, मात्र तेथे आघाडीतील कोणत्याही पक्षाचा नेता फिरकलेला नाही. त्यामुळे सेनेची प्रत्यक्ष निवडणुकीपूर्वीच कोंडी झाल्याचे दिसून येते

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज