rajkiyalive

SANGLI LOKSABHA : ..तर 44 वर्षानंतर पहिल्यांदा दादा घराण्याशिवाय निवडणूक

dineshkumar aitawade 9850652056
SANGLI LOKSABHA : ..तर 44 वर्षानंतर पहिल्यांदा दादा घराण्याशिवाय निवडणूक : लोकसभेच निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवारांची लगबग सुरू झाली. गेल्या पाच वर्षापासून तयारीत असलेल्या अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणारच असा विश्वास होता. सांगलीतील तीच स्थिती होती. संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात नावलौकिक असलेल्या दादा घराण्याला कधी नव्हे तेवढे यंदा तिकीटासाठी झगडावे लागले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शिवसेनेने ही जागा ताब्यात घेवून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे 1980 नंतर 44 वर्षानंतर पहिल्यांदाच दादा घराण्याचा उमदेवार लोकसभेचा उमेदवार असणार नाही. याबाबत सांगलीकरांना खंत असणार यात शंका नाही.

SANGLI LOKSABHA : ..तर 44 वर्षानंतर पहिल्यांदा दादा घराण्याशिवाय निवडणूक

चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राज्यस्थानचे राज्यपाल, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस पद सांभाळलेल्या दादा घराण्याला सांगलीत तेही आपल्या घरात तिकीटासाठी झगडावे लागले ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. या अगोदर दादा घराण्यातील वसंतदादा पाटील, श्रीमती शालिनीताई पाटील, प्रकाशबापू पाटील, मदन पाटील, प्रतिक पाटील यांनी लोकसभेचे मैदान गाजवले. यापैकी प्रतिक पाटील यांना केंद्रात मंत्रीपदाची संधीही मिळाली परंतु आता दादा घराण्याला लोकसभेचे दरवाजे बंद झाले आहेत, ही आजची वस्तुस्थिती आहे.

स्व.डॉ.वसंतदादा पाटील यांनी 1880 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची पायरी चढली.

1952 पासून राज्याच्या राजकारणात असलेल्या स्व.डॉ.वसंतदादा पाटील यांनी 1880 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची पायरी चढली. काँग्रेसकडून उमेदवारी त्यांना मिळाली. त्यामध्ये त्यांचा विजय झाला. त्यांना 296189 इतकी मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात जनपा पक्षाचे विश्वासराव रामराव पाटील होते. त्यांना 128544 मते मिळाली. दादा पहिल्यांदाच लोकसभे पोहोचले.

 

1984 मध्ये झालेल्या लोकेसभा निवडणुकीत दादांचे सुपूत्र प्रकाशबापू पाटील यांचा राजकारणात प्रवेश झाला.

त्यांचे पर्दापण मोठ्या दणक्यात झाले. पहिल्याच निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांना 304202 मते मिळाली. यावेळीही त्यांच्या विरोधात जनपा पक्षाचे विश्वासराव रामराव पाटीलच होते. त्यांना 162509 इतकी मते मिळाली.

1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रकाशबापू पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली.

यावेळी त्यांच्या विरोधात भाजपचे अण्णा डांगे उभे होते. तसेच इतर अनेक उमेदवारांनी लोकसभेला अर्ज भरला होता. प्रकाशबापू पाटील 361753 मते घेवून विजयी झाले. भाजपच्या अण्णाा डांगे 153477 मते मिळाली. परंतु हा टर्म पूर्ण होवू शकला नाही. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या राजीनामान्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. परंतु त्यांचे सरकारही टिकू शकले नाही. त्यामुळे 1991 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका लागल्या.

यावेळीही प्रकाशबापू पाटील यांना उमेदवारी मिळाली.

1991 मध्ये निवडणुकीच्या काळात पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. यावेळी कुंडलच्या जी. डी. लाड यांनी कम्युनिस्ट पार्टीकडून उभे राहिले. भाजपकडून प्रकाश बिरजेंना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीतही प्रकाशबापू पाटील यांना 313906 मते पडून ते विजयी झाले. जी. डी. लाड यांना 106226 मते मिळाली तर भाजपच्या प्रकाश बिरजेंना केवळ 49025 मते मिळाली होती.

पाच वर्षानंतर 1995 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रकाशबापू पाटील यांना खासदार असतानाही विधानसभेचे तिकीट मिळाले.

यावेळी त्यांचे पुतणे मदन पाटील हेही विधानसभेचे तिकीट मागत होते. मदन पाटील यांनी बंडखोरी केली. त्यामुळे प्रकाशबापू पाटील आणि मदन पाटील या दोघांचाही पराभव झाला. पुढे 1996 मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. यावेळी विधानसभेला पराभूत झालेल्या उमेदवारांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, असा फतवा काँग्रेसने काढला.त्यामुळे यावेळी प्रकाशबापूंना तिकीट मिळाले नाही. परंतु बापुंनी मदन पाटील यांचे नाव सुचविले. त्यामुळे मदन पाटील यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. यावेळी सांगली लोकसभेच्या रिंगणात 18 उमेदवार होते. काँग्रेसकडून मदन पाटील, भाजपकडून हिंदकेसरी मारूती माने, कम्युनिस्ट पार्टीकडून जी. डी. लाड, अपक्ष पी. एस. घाटगे असे अनेक अपक्ष उमेदवार उभे होते. यावेळी मदन पाटील यांनी 300323 मते मिळवून लोकसभेत प्रवेश केला. मारूती माने यांना 125610 तर जी. डी. लाड यांना 106372 मते मिळाली होती.

या टर्ममध्ये भाजपचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर आले.

वाजपेयी सरकार पडल्याने पुन्हा एकदा 1998 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे पुन्हा एकदा मदन पाटील यांना काँगे्रेसची उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात भाजपने पुन्हा एकदा आण्णा डांगेंना मैदानात उतरवले. यावेळी मदन पाटील यांनी 338900 मते मिळवून दुसर्‍यांना लोकसभा गाठली. आण्णा डांगे यांना 265661 मते मिळाली.

13 महिन्यातच वाजपेयींचे सरकार पडले.

लोकसभेच्या निवडुका लागल्या. महाराष्ट्राती युतीचे शासन होते. त्यांनीही सरकार बरखास्त करून विधानसभेच्या निवडणुका लावल्या. दरम्यान 1999 मध्येच शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादीची स्थापना केली होती. 1999 मध्ये पुन्हा एकदा विधानसभेबरोबर लोकसभेच्या निवडणुका लागल्या. लोकसभेला विद्यमान खासदार असलेल्या मदन पाटील यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले. तर काँग्रेसने प्रकाशबापुंना पुन्हा संधी दिली. भाजपने आण्ण्णा डांगेचे पूत्र चिमन डांगे यांना मैदानात उतवरले. प्रकाशबापुंना 281162 मते मिळाली. मदन पाटील यांना 220602 तर चिमन डांगेंना 97273 मते मिळाली. प्रकाशबापू पाटील विजयी झाले.

पाच वर्षानंतर 2004 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती. त्यामुळे सांगलीची जागा पुन्हा प्रकाशबापुंना मिळाली.

भाजपने म्हैसाळच्या दीपक शिंदे यांना उमेदवारी दिली. समाजवादी पक्षाकडून नागनाथण्णा नायकवडी उभे राहिले. यावेळीही काँग्रेसने बाजी मारली. मोठ्या मताधिक्याने प्रकाशबापू निवडून आले. प्रकाशबापू पाटील यांना 304798 मते मिळाली. तर दीपकआबा शिंदे यांना 222866 मते मिळाली. नागनाथण्णांना 137087 मते मिळाली. परंतु एक वर्षातच प्रकाशबापुंचे निधन झाले. त्यामुळे येथे पोटनिवणूक लागली. काँग्रेसतर्फे प्रकाशबापुंचे चिरंजिव प्रतिक पाटील यांना तिकीट मिळाले. भाजपने पुन्हा एकदा दीपकआबांना मैदानात उतरवले तसेच जिल्ह्यातील नाराज गटांनी सांगलीवाडीचे माजी आमदार दिनकर पाटील यांना पाठिंबा दिला. अटीतटीच्या लढतीत प्रतिक पाटील निवडून आले.

2009 मध्ये पुन्हा एकदा प्रतिक पाटील यांना उमेदवारी मिळाली.

भाजपने यावेळी डाव खेळला. पक्षाचा उमेदवार दिला नाही. परंतु अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडेंना पाठिंबा दिला. यावेळी मैदानात 14 उमेदवार होते. प्रतिक पाटील यांना 378620 मते मिळाली. तर अजितराव घोरपडे यांना 338837 मते मिळाली. केवळ 40 हजाराने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. यावेळी प्रतिक पाटील दुसर्‍यांदा लोकसभेत पोहोचले. यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळाले होते. दादा घराण्याला पहिल्यांदाच प्रतिक पाटील यांच्या रूपाने केंद्रात मंत्रीपद मिळाले होते.

2014 मध्ये देशात मोदी लाटेला सुरूवात झाली.

मोदींना भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. संपूर्ण भारतभर मोदी लाट होती. सांगलीत भाजपनेही जोरदार तयारी केली होती. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या संजयकाका पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. इकडे काँग्रेसने पुन्हा एकदा मंत्री असलेल्या प्रतिक पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी सांगली लोकसभेसाठी 17 उमेदवार उभे होते. काँग्रेसच्या आणि सांगली जिल्ह्याच्या इतिहासात सांगली लोकसभेला काँग्रेसचा कधीच पराभव झाला नव्हता. पहिल्यांदाच काँग्रेसचा पराभव झाला आणि येथून काँग्रेसला उतरती कळा लागली. संजयकाका पाटील यांना 611563 मते मिळाली तर प्रतिक पाटील यांना 372271 मते मिळाली.

2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपने संजयकाकांना उमदेवार दिली.

काँग्रेसकडून प्रकाशबापुंचे दुसरे चिरंजिव विशाल पाटील लोकसभेसाठी इच्छुक होते. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची युती झाली होती. जागा वाटपाच्या राजकारणात सांगलीची जागा राजू शेट्टींच्या वाट्याला गेली. शेट्टींनीही विशाल पाटील यांना स्वाभिमानीच्या तिकीटावर लढायला लावले. पहिल्यांदाच सांगली लोकसभा मतदार संघातून हात हे चिन्ह हद्दपार झाले. यावेळीही काँग्रेसचा पराभव झाला. विशाल पाटील यांना त्यांच्या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. संजयकाका पाटील यांना 508995 तर विशाल पाटील यांना 344643 मते मिळाली. वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना 300234 मते मिळाली. तिरंगी लढत झाल्याने काँग्रेसला फटका बसला.

आता 2024 ची लोकसभा निवडणूक लागली आहे. शिवसेनेने पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कधी नव्हे ते काँग्रेसला पर्यायाने सांगलीच्या दादा घराण्याला तिकीटासाठी झगडावे लागत आहे. तिकीट जर मिळाले नाही तर 1980 नंतर 44 वर्षात पहिल्यांदा दादा घराण्याचा माणूस लोकसभेला असणार नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज