rajkiyalive

SANGLI LOKSABHA : वंचितच्या सहभागाने भाजपची कोंडी

SANGLI LOKSABHA : वंचितच्या सहभागाने भाजपची कोंडी . भाजपचा सांगली जागेसंदर्भात फॉर्म्युला यावेळी चुकणार.लोकसभा व विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी ‘फॅक्टर’मुळे मोठा फटका बसला. त्यामुळे यावेळी होणार्‍या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीने ‘वंचित’ला बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 25 टक्के म्हणजे तीन लाख मते घेतली होती. त्याचा फायदा भाजपला झाला. आता ‘वंचित’च्या समावेशाने सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे विशाल पाटलांना तारक होणार तर भाजपला मारक होणार आहे.

 

SANGLI LOKSABHA : वंचितच्या सहभागाने भाजपची कोंडी

जनप्रवास । सांगली

वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये लोकसभेच्या 47 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी वंचितला एकही जागा जिंकता आली नव्हती. वंचितची ‘एमआयएम’सोबत युती होती. त्यामुळे वंचितमुळे एमआयएमचे औरंगाबादमधील उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले होते. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला लोकसभा निवडणुकीत 7 ठिकाणी फटका बसला होता. तर प्रकाश आंबेडकर सोलापुरातून उभे राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. सांगलीत वंचित आघाडीचे उमेदवार, विद्यमान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मते मिळवली होती.

मतविभागणीमुळे विशाल पाटील यांचा पराभव झाला होता.

तर भाजपचे संजयकाका पाटील विजयी झाले होते. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत देखीलच हीच परिस्थिती होती. यावेळी राज्यातील सत्तासमीकरणे खूपच बदलली आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीने राज्यातील भाजप विरोधातील असलेले सर्व पक्ष एकत्र करण्याचे काम सुरू केले आहे. 2019 ला काँग्रेस, राष्ट्रवादीला सर्वाधिक धोकादायक ठरलेला पक्ष वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समावून घेतले आहे. वंचितच्या रुपाने महाविकास आघाडीत नवा भिडू आला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडी आल्यास काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या होत्या.

भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीबरोबर माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाली होती. त्यावेळी सांगलीची जागा माजी खासदार शेट्टी यांना सोडण्याचा निर्णय झाला. काँग्रेसमध्ये खळबळ उडाली, पण विशाल पाटील यांना स्वाभिमानीचे उमेदवार घोषित केले. या घडामोडी सुरू असतानाच आ. गोपीचंद पडळकर यांनी भाजप व खा. संजयकाका पाटील यांच्या विरोधात आक्रमकपणे भूमीका मांडत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतली होती. त्यामुळे पारंपारिक काँग्रेसला मतविभागणीचा फटका बसणार हे निश्चित झाले होते, आणि तसे झाले.

भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार मते मिळाली,

तर काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार मते मिळाली. दीड लाख मतांनी खा.संजयकाकांचा विजय झाला. या निवडणुकीत वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी 3 लाख मते घेतली होती. तब्बल पंचवीस टक्के मते यांनी घेतली होती. याचा फटका विशाल पाटील यांना बसला होता. या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या पाठीमागे बहुजन, दलित समाज, मुस्लिम, धनगर समाज पूर्ण ताकदीने पाठीमागे होता. हे मतदार काँग्रेसचे पारंपारिक मतदार आहेत. ही मते वंचितला गेली आणि मतविभागणीचा फटका विशाल पाटील यांना बसला आणि त्यांचा पराभव झाला आहे.

आता वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महाविकास आघाडीत समावेश झाला आहे.

त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांना ताकद मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाचे हात चिन्ह नव्हते. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बॅट या चिन्हावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांची काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे त्यांना हात चिन्ह मिळणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमधील असलेले समाज व पदाधिकार्‍यांची ताकद त्यांच्या पाठीमागे असणार आहेत. याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या मतविभाजनीमुळे फायदा झाला. यावर्षी मत विभाजनी टाळली जाणार आहे. त्यामुळे वंचितचा आघाडीमध्ये समावेश झाल्याने विशाल पाटलांना तारक तर भाजपला मारक असणार आहे.

चंद्रहार पाटील काय भूमीका घेणार?..

लोकसभेसाठी भाजपकडून खा. संजयकाका पाटील तर काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. लोकसभेसाठी इच्छूक असलेले उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दोनवेळा सकारात्मक चर्चा देखील झाली होती. मात्र आता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तर त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. सांगलीची जागा आता काँग्रेस सोडण्याची शक्यता कमी आहे. वंचितला ही जागा सुटणार नाही. तसे झाल्यास चंद्रहार पाटील काय भूमीका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल
उमेदवार पडलेली                       मते                    टक्केवारी
खा.संजयकाका पाटील (भाजप)    5,08,995          43
विशाल पाटील (स्वा.शेतकरी)      3,44,642          29. 12
आ.गोपीचंद पडळकर (वंचि.आ.)  3,00,234          25.37

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज