rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील लोकसभा लढण्यासाठी सज्ज

शरद पवळ, जनप्रवास
SANGLI LOKSABHA : विशाल पाटील लोकसभा लढण्यासाठी सज्ज : गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभेच्या निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांची तयारी सुरू असताना शिवसेनेने आडपाय आणत सांगलीच्या जागेवर हट्ट सांगितला, आणि उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र त्यांनी आता निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. सांगलीचा गड लढू आणि जिंकू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना पत्राव्दारे घातली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे.

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील लोकसभा लढण्यासाठी सज्ज

सांगलीचा गड लढू आणि जिंकू : भावनिक साद

सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पण गेल्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटना व यावर्षी शिवसेना (उबाठा)ने काँग्रेसची गोची केली. विशाल पाटील गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी कामाला लागले आहेत. पण घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (उबाठा) सांगलीच्या जागेवर दावा केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना पक्षात घेऊन त्याच दिवशी उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यामुळे काँग्रेसची मंडळी नाराज झाली. काँग्रेसने या जागेवरील हक्क सोडला नाही. आणि ही जागा सोडणार देखील नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत काँग्रेस व शिवसेनेचा वाद रंगला आहे. आता विशाल पाटील यांनी पक्ष किंवा अपक्ष अशी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही, असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची अस समीकरणच तयार झाले आहे. स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम, स्व. गुलाबराव पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व.आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊकच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचे अतुट नाते तयार झाले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्यावतीने आ. विश्वजित कदम सर्व प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. आपण लढू आणि जिंकू या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात. सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल, याची मला खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पत्रामुळे विशाल पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. त्यांच्या या पत्रामुळे काँग्रेस कार्यकर्ते देखील रिचार्ज झाले आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

शिवसेनेची ‘संसदे’ची ऑफर धुडकावली…

शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सांगलीत येऊन शिवसेनाच सांगली लढणार आहे. विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि त्यासाठी पुढाकार शिवसेना घेणार आहे, असे संकेत राऊत यांनी दिले होते. राऊत यांच्या वक्तव्यामुळे विशाल पाटलांना मविआच्या कोट्यातून संसदेत म्हणजेच राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा झाल्या होत्या. मात्र ही ऑफर विशाल पाटील यांनी धुडकावून लावली असून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज