rajkiyalive

सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदान

संजयकाका, विशाल पाटील, चंद्रहार पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, 56 ठिकाणी यंत्रात बिघाड, 4 जुनला मतमोजणी

जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः सांगली लोकसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादावादी वगळता मंगळवारी सरासरी 58 टक्के मतदान शांततेत पार पडले. 120 केंद्रावर रात्री सातनंतरही मतदान सुरुच होते. जिल्ह्यात उष्णतेचा पारा तापल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला असून मतदानाचा टक्का घसरला. जिल्ह्यातील 56 मतदान केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबली, मात्र पर्यायी व्यवस्था करुन मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आली. वडियेरायबाग येथे मतदानाचा व्हिडीओ केल्याने एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील, महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यासह वीस जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

सांगली लोकसभेसाठी 58 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 830 मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाली. दरम्यान भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी चिंचणी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी पद्माळे येथे तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी भाळवणी येथे मतदान केले. सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून येत होता. सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नव मतदारांसह महिला, पुरुषांनी बहुतांशी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा दिसून आल्या.

वृद्ध, दिव्यांगही मतदान केंद्रावर

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय मतदान केंद्रावर वाहनातून त्यांना मतदानासाठी नेण्यात आले. सकाळी साडेअकरापर्यंत मतदानासाठी ठिकठिकाणी गर्दी झाली होती, त्यानंतर तीन वाजेपर्यंत बहुतांश मतदान केंद्र ओस पडली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत 5.81 टक्के मतदानाची नोंद झाली.

दुपारी धिम्या गतीने मतदान

सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचा पारा वाढला होता. त्यामुळे 12 ते 4 या चार तासाच्या कालावधीत धीम्या गतीने मतदान झाले. उन्हामुळे मतदार बाहेर पडले नाहीत. त्यामुळे अनेक केंद्र ओस पडली असल्याचे चित्र पहायला मिळाले. दुपारी एकवाजेपर्यंत केवळ 29.65 टक्के मतदान झाले. त्यानंतर उन्हाचा चटका कायम राहिल्याने तीन वाजेपर्यंत 12 टक्के इतकेच मतदान झाले. यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत 41.30 टक्के मतदानाची नोंद झाली. सायंकाळी मतदानासाठी गर्दी झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 52.56 टक्के मतदान झाले.

शेवटच्या तासात तब्बल 5 टक्के मतदान

दुपारी चारनंतर उन्हाचा पारा खाली आल्याने मतदानाला गती आली. याशिवाय संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जे मतदार राहिले आहेत अशांना मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न झाला अनेक वृद्ध तसेच महिला पुरुषांनाही कार्यकर्ते मतदानासाठी मतदान केंद्रावर घेऊन येत होते त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या त्यामुळे शेवटच्या तासांमध्ये तब्बल 5 टक्के मतदानाची नोंद झाली.

56 ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड

लोकसभा मतदारसंघातील 56 ठिकाणी मतदार यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. सकाळी सात ते पाच वेळेत 8 बॅलेट युनिट, 7 कंट्रोल युनिट, 17 व्हिव्हीपॅट तर मॉक पोलदरम्यान 7 बॅलेट युनिट, 6कंट्रोल युनिट आणि 17 व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली होती, त्यानंतर दुसरे यंत्र जोडून मतदानाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

सहा आदर्श मतदान केंद्र

लोकसभा मतदारसंघात सहा आदर्श मतदार केंद्र होती. या केंद्रांना आकर्षक सजविण्यात आले होते. या केंद्रावर मंडप उभारणी तसेच फुलांनी सजवले होते. मतदान केंद्रातील कर्मचारी मतदारांचे स्वागत करीत होते. मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर तसेच पाळणाघरही होते. त्यामुळे महिला मतदारातून समाधान व्यक्त करण्यात येत होते.
तासगाव, मिरज, सांगलीत चुरस

भाजपचे विद्यमान खासदार व उमेदवार संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील तसेच महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली. सर्वाधिक चुरस तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली, मिरज विधानसभा मतदारसंघात दिसून आली. दुपारच्या सुमारास मात्र चढलेल्या पार्‍याने मतदानाचा उत्साह नक्कीच थोडा कमी झाला. मात्र ऊन कमी झाल्यानंतर मतदारांची पाऊले मतदान केंद्रांकडे वळली.

120 केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान

सायंकाळी 6 वाजता मतदानाचा आकडा 58 टक्क्यांवर पोहोचला. जिल्ह्यातील 120 केंद्रावर मतदान रात्री उशिरापर्यंत सुरुच राहिले. 2019 च्या निवडणुकीत 65.68 टक्के मतदान झाले होते. यंदादेखील अशाच प्रकारचे वातावरण राहते की काय अशी चर्चा होती. मात्र त्या तुलनेत सुमारे जवळपास सात टक्क्यांनी मतदान कमी झाले. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचे स्पष्ट झाले.

वडियेरायबागमध्ये एकावर गुन्हा

वडियेरायबाग येथील केंद्रावर मतदाराने मतदान करतानाच व्हिडीओ व्हायरल केला. तो सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांनी सांगितले.

सोशल मीडियावर सबकुछ व्होटिंग

प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर मतदान केल्यानंतरदेखील अनेक नवमतदारांचा अन् तरुणांचा उत्साह कमी झाला नव्हता. मतदान केल्याची बोटावरील शाईची खूण गर्वाने दाखवत फोटोसेशनलादेखील ऊत आला होता अन् लगेच सोशल मीडियावर शेअर करणेदेखील सुरू होते. मी मतदान केले, प्लीज, डू व्होट अशा पद्धतीच्या मॅसेजची देवाणघेवाण सुरू होती.

मतदानाच्या टक्केवारीचा पल्ला

सकाळी 9 वाजता 5.81%
सकाळी 11 वाजता 16.61 %
दुपारी 1 वाजता 29.65 %
दुपारी 3 वाजता 41.30 %
सायंकाळी 5 वाजता 51.30%
सायंकाळी 6 वाजता 58 %

20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

सांगली लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात होते मात्र खरी लढत भाजपचे संजयकाका पाटील, अपक्ष विशाल पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्यातच आहे. याशिवाय सिकंदर पटवेगार (बहुजन समाज पार्टी), आनंद नलगे (बळीराजा पार्टी), महेश खराडे (स्वाभिमानी पक्ष) या पक्षांचेही भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी
मतदारसंघ टक्के
मिरज 59 %
सांगली 57.50 %
पलूस-कडेगाव 56.45 %
खानापूर-आटपाडी 51.11 %
तासगाव-क.महांकाळ 61.16 %
जत 59.32 %
एकूण 58 %

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज