जागा मिळाली ती पण अपुरी: हस्तांतर रखडले
जनप्रवास । सांगली
SANGLI : मनपा स्थापनेला 26 वर्षे तरीही होईना मध्यवर्ती इमारत : शहरातील विजयनगर चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत झाली. सर्व शासकीय कार्यालये त्या ठिकाणी स्थलांतरीत झाले. मध्यवर्ती न्यायालयाची इमारत देखील झाली. पण 26 वर्षे स्थापन झालेल्या महापालिकेची अद्याप मध्यवर्ती इमारत झाली नाही. सातशे कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेला विजयनगर येथे जागा मिळाली, पण ती देखील अपुरी. कृषी विभागाची जागा हस्तांतर करण्याचा निर्णय झाला, तो प्रस्ताव देखील रखडला आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.
SANGLI : मनपा स्थापनेला 26 वर्षे तरीही होईना मध्यवर्ती इमारत
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेची स्थापना होऊन 26 वर्षे झाली, मात्र अजूनही महापालिकेचे मुख्यालय जुन्या सांगली नगरपालिकेच्या इमारतीमध्येच सुरू आहे. ही इमारत अपुरी आहे. त्यामुळे अर्धा कारभार हा महापालिका शाळा नंबर एक समोरील महापालिकेच्या इमारतीमधून सुरू आहे. मंगलधाम इमारतीमध्ये देखील घरपट्टी, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू विभागासह इतर काही विभागांचा कारभार सुरू आहे. तसेच मालमत्ता विभागाचा कारभार वि. स. खांडेकर वाचनालयाच्या इमारतीमधून सुरू आहे. महापालिका मुख्यालयाची सर्व कार्यालये एकाच छताखाली असणे आवश्यक आहे. मात्र विविध ठिकाणच्या चार-चार इमारतींमधून कारभार सुरू आहे. त्यामुळे नवीन मुख्यालय इमारतीची गरज प्रकर्षाने भासू लागली आहे.
मिरज-सांगली रस्त्यालगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमेला महापालिकेच्या मालकीची जागा आहे.
विजयनगर येथे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे. या परिसरातच महापालिकेचे नवीन मुख्यालय प्रस्तावित आहे. मिरज-सांगली रस्त्यालगत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमेला महापालिकेच्या मालकीची जागा आहे. ही जागा 56 मीटर बाय 188 मीटर आहे. यामध्ये नियोजित मुख्यालय दोन ग्राउंड फ्लोअर व चार मजली प्रस्तावित होते. महापालिकेचे सर्व प्रशासकीय विभाग, पदाधिकार्यांची केबीन, सभागृह, व्हिवर्स गॅलरी, वेटिंग एरिया तसेच कव्हरर्ड पार्किंग, कोर्टयार्ड, कॅन्टिग हे सर्व एकाच छताखाली असणार आहे. इमारत देखणी व प्रशस्त असणार आहे. पण पार्किंगसह इतर सुविधांसाठी आणखी जागेची आवश्यकता भासणार आहे.
मनपाच्या जागेलगतच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची जागा आहे.
मनपा मुख्यालय आयताकृती ऐवजी चौरसाकृती झाल्यास इमारत देखणी व प्रशस्त होणार आहे. यामुळे कृषी विभागाची काही जागा घेऊन मुख्यालय इमारत 100 मीटर बाय 100 मीटर जागेत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव तयार केला आहे. पूर्वी येणारा 33 कोटींचा खर्च आता 40 कोटींच्या घरात गेला आहे. महापालिका व कृषी विभाग यांच्यात काही जागेची अदालाबदल करावी लागणार आहे. तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. तत्कालिन कृषीमंत्री दादा भुसे यांनी 25 मे 2022 रोजी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत भुसे यांनी कृषी विभागाची काही जागा महापालिका मुख्यालयास देण्यास मान्यता दिली. कृषी आयुक्तालयाकडून तशी शिफारसही कृषीमंत्र्यांकडे आली होती.
सातशे कोटींचे वार्षिक बजेट करणार्या महापालिकेला अद्याप इमारत मिळाली नाही.
मनपाने कृषी विभागास 12 मीटर रूंदीचा रस्ता करून देणे, जिल्हा नियोजन समितीमधून कृर्षी भवन बांधून देण्याची अट घातली गेली. मुख्यालय इमारतीचा प्रश्न मार्गी लागला, लवकरच कामाला सुरूवात होईल, असा मानस होता. मात्र कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर काही दिवसांनी राज्यातील विकास महाआघाडीची सत्ता गेली. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. महापालिका व कृषी विभागाच्या काही जागेच्या अदलाबदलीसंदर्भात शासन निर्णय निघेल, अशी शक्यता होती. मात्र ती फोल ठरली. तत्कालिन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीचे इतिवृत्तच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जागेचा प्रश्न प्रलंबित पडला आहे. सातशे कोटींचे वार्षिक बजेट करणार्या महापालिकेला अद्याप इमारत मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांची देखील गैरसोय होत आहे.
पालकमंत्री, आमदारांनी प्रयत्न करावेत…
महापालिका क्षेत्रात दोन आमदार येतात, ते भाजपचे आहेत. त्यातील सुरेश खाडे हे कामगारमंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरआमदार सुधीर गाडगीळ यांचे राज्यस्तरावर चांगले वजन आहे. देशात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी प्रयत्न केले तर महापालिकेच्या इमारतीला कृषी विभागाची वाढीव जागा मिळेल आणि इमारतीचे काम देखील सुरू होईल. पण यासाठी ना. खाडे व आ. गाडगीळ यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.