जागतिक बँकेच्या पथकासमोर सादरीकरण
sangli mahapur news : सांगलीच्या महापुरासाठी महापालिकेचा पाचशे कोटीचा आराखडा ” पूरनियंत्रण व पावसाच्या पाण्याचा निचर्यासाठी जागतिक बँकेच्या पथकासमोर शनिवारी महानगरपालिका प्रशासनाने 500 कोटींच्या प्रकल्प उपाययोजनांचे सादरीकरण केले. सुधारित प्रस्ताव दोन आठवड्यात जागतिक बँकेला सादर होणार आहे. शेरीनाल्यातून पूराचे पाणी शहरात येऊ नये म्हणून शेरीनाल्यावर गेट उभारणे, सांगली व मिरजेतील प्रमुख नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व काँक्रिट बांधकाम, शामरावनगर परिसरात साचून राहणारे पाणी नाल्याद्वारे बाहेर काढणे आदी कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.
sangli mahapur news : सांगलीच्या महापुरासाठी महापालिकेचा पाचशे कोटीचा आराखडा
महापालिकेत शनिवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी जागतिक बँकेच्या पथकासमोर प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण केले. जागतिक बँकेच्या पथकात जोलंटा, टीजार्क, अनुप कारंथ, शिना यांचा समावेश होता. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, नगररचना विभागाच्या प्रभारी सहायक संचालक श्रीमती मुल्ला, स्वच्छता विभागाचे अधिकारी डॉ. रवींद्र ताटे तसेच प्रायमो या कन्सल्टंट कंपनीचे अभियंते, अधिकारी उपस्थित होते.
पूर व पावसाचे साचून राहणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महापालिकेला निधी मिळणार आहेे. त्याअनुषंगाने प्रायमो या तांत्रिक कन्सल्टंट कंपनीने महापालिका क्षेत्रात सर्वेक्षण करून 468 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. यामध्ये आणखी 32 कोटींच्या कामांचा समावेश करून 500 कोटींच्या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण जागतिक बँकेच्या पथकासमोर करण्यात आले.
शामरावनगरमधील कालिकानगर व परिसरातील पूर व पावसाचे साचून राहणारे पाणी हरिपूर नाल्यात सोडणे, कोल्हापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला दक्षिणोत्तर भोबे गटार बांधणे, शामरावनगर, गंगोत्रीनगरमध्ये साचून राहणारे पाणी अंकली नाल्यात सोडणे या कामांचा समावेश प्रकल्पात करण्यात आला आहे. शामरावनगर व परिसरात पावसाचे पाणी साचून राहते. अनेक वर्षांचा प्रश्न या प्रकल्पाने सुटणार आहे.
आयुक्त गुप्ता म्हणाले, पूरनियंत्रण तसेच पूर व पावसाचे पाणी साचून राहू नये, यासाठीच्या उपाययोजनांचा 500 कोटींचा सुधारित प्रकल्प आराखडा तयार करण्यात येणार आहे. दोन आठवड्यात तो जागतिक बँकेला सादर होईल. मार्चअखेर निविदा प्रक्रिया होऊन कार्यारंभ आदेश दिला जाईल. महाराष्ट्रात सर्वप्रथम सांगली महापालिकेला पूरनियंत्रण उपाययोजनांतर्गत जागतिक बँकेचा निधी मिळेल.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.