rajkiyalive

SANGLI -MIRAJ : विधानसभा उमेदवारीवरून सांगलीत काँग्रेसमध्ये तर मिरजेत भाजपमध्ये संघर्ष

जनप्रवास । सांगली

SANGLI -MIRAJ : विधानसभा उमेदवारीवरून सांगलीत काँग्रेसमध्ये तर मिरजेत भाजपमध्ये संघर्ष : लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, दोन दिवसातच निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच विधानसभेच्या हालचाली इच्छुकांमधून होताना दिसत आहेत. त्या दृष्टीने शक्तीप्रदर्शन सुरू आहे. सांगली विधानसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यात संघर्ष सुरू आहे. तर मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीवरून पालकमंत्री सुरेश खाडे व भाजपचे नेते मोहन वनखंडे यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष होणार आहे.

SANGLI -MIRAJ : विधानसभा उमेदवारीवरून सांगलीत काँग्रेसमध्ये तर मिरजेत भाजपमध्ये संघर्ष

नेते, कार्यकर्त्यांचे सुरू आहे संघर्षयुध्द: तयारीचे शक्तीप्रदर्शन

सांगली लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील व काँग्रसेचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत झाली आहे. शिवसेना (उबाठा) गटाचे चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी घेतल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. या निवडणुकीचा निकाल दोन दिवसात लागणार आहे. तर विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता दाट आहे. त्यासाठी गणशोत्सव झाल्यानंतर म्हणजे सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना आता तीन महिन्याचा अवधी मिळणार असल्याने इच्छूक नेते आतापासूनच तयारीला लागले असून शक्तीप्रदर्शन करत विविध कार्यक्रम घेत आहेत.

सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली होती.

त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी उघड तर काहींनी छुप्या पध्दतीने विशाल पाटील यांचा प्रचार केला आहे. सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून गेल्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे काम सुरूच ठेवले. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते जनतेच्या संपर्कात होते. राज्य व केंद्रातील भाजप सरकारविरोधात त्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत. त्यांच्या या कामाच्या जोरावर पुन्हा ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उभारणार आहेत.

जयश्रीताई भावी आमदार अशा पोस्ट देखील सोशल मिडियावर शेअर केल्या 

पण यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून विधानसभेची एन्ट्री केली आहे. विशाल पाटील यांचा उघडपणे त्यांनी प्रचार केला होता. सांगली विधानसभा मतदारसंघात त्यांनी 250 हून अधिक सभा-बैठका देखील घेतल्या होत्या. त्यांच्याबरोबर मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते देखील सक्रीय झाले होते. त्यामुळे मदनभाऊ प्रेमींनी जयश्रीताई विधानसभेच्या मैदानात, भावी आमदार अशा पोस्ट देखील सोशल मिडियावर शेअर केल्या होत्या. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष होणार आहे. काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम यांना मध्यस्तीची भूमीका घ्यावी लागणार आहे.

सुरेश खाडे व  मोहन वनखंडे यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष होणार

तर दुसरीकडे मिरज विधानसभा मतदारसंघात यावर्षी पालकमंत्री सुरेश खाडे व भाजप अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांच्यात उमेदवारीवरून संघर्ष होणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रूपयांची कामे केली आहेत. या कामांच्या जोरावर पुन्हा ते चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र त्यांना उमेदवारीसाठी पक्षातील लोकांचे आव्हान असणार आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांचे एकेकाळचे विश्वासू असलेले मोहन वनखंडे यांनी यावेळी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.

लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्र बैठका घेत खासदार संजयकाका पाटील यांचा प्रचार केला होता. कोणत्याही परिस्थितीत यावर्षी विधानसभा लढणार असा निर्धार त्यांच्याकडून केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना वाढदिवस झाला. या निमित्त त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मिरज विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात या दोघांमध्ये कोणाला पक्षाची उमेदवारी मिळणार? याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातातच असणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज