rajkiyalive

sangli mnp news : सांगली महापालिकेच्या प्रभाग रचनेला दोन दिवसात सुरूवात

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार समिती गठीत करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून दोन दिवसात प्रारूप प्रभाग रचनेला सुरूवात होणार आहे. मनपा क्षेत्रात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे 78 सदस्य असणार आहेत. शासनाचे चार सदस्यांचे प्रभाग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे चार सदस्यांचे अठरा तर तीन सदस्यांचे दोन प्रभाग होण्याची शक्यता आहे.

sangli mnp news : सांगली महापालिकेच्या प्रभाग रचनेला दोन दिवसात सुरूवात

 समिती गठीतचे काम सुरू,  4 सदस्यीय प्रभाग: 78 नगरसेवकांसाठी होणार 20 प्रभाग?

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य शासन व निवडणूक आयोगाला दिले आहेत. निवडणुकीमध्ये तीन टप्पे येतात. पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना करून आरक्षण ठरवणे, दुसर्‍या टप्प्यात मतदार यादीचे विभाजन तर तिसर्‍या टप्प्यामध्ये निवडणूक असते. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात तातडीने प्रारूप प्रभाग रचना करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याच्या सूचना राज्य शासनाला दिल्या होत्या.

त्यामुळे राज्य शासनाने महापालिकांना प्रारूप प्रभाग रचना सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेकडून जरी प्रभाग रचना केली जात असली तरी याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकार्‍यांना आहेत.

महापालिकेच्या प्रभाग रचनेला उत्तर दिशेकडून सुरूवात करावी लागणार आहे. उत्तरेकडून पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत शेवट हा दक्षिणेत करावा लागणार आहे. रस्ते, नद्या, रेल्वेमार्ग या सारख्या नैसर्गिक सीमा विचारात घेतल्या जातील. कोणत्याही इमारतीचे विभाजन दोन प्रभागात होणार नाही. प्रभाग रचना आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यासाठी पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे.

त्यामध्ये तीन अधिकारी, नगररचनाकार व एका संगणक तज्ञाचा समावेश असणार आहे. समिती गठीत करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत 78 सदस्य होते. ती सदस्यसंख्या कायम राहणार आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 अंतर्गत मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागातून शक्यतो चार, किमान तीन आणि कमाल पाच सदस्य निवडले जातील. अशी तरतूद 2024 च्या अधिनियमामध्ये आहे. त्यामुळे 72 सदस्यांचा 18 प्रभाग आणि 6 सदस्यांचे दोन प्रभाग होण्याची शक्यता आहे. दोन दिवसात प्रभाग रचनेला सुरूवात होणार आहे.

प्रारूप प्रभाग रचना तयार करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली जाणार आहे. त्याची खात्री करून जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. त्यानंतर हरकती, सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.

मनपा स्थापनेपासूनची निवडणुकीतील प्रभाग पध्दत

1998: एक सदस्यीय प्रभाग पध्दत
2003: तीन सदस्यीय प्रभाग पध्दत
2008: एक सदस्यीय प्रभाग पध्दत
2013: दोन सदस्यीय प्रभाग पध्दत
2018: चार सदस्यीय प्रभाग पध्दत
2025: पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धत

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज