पूर नियंत्रण समितीचा निर्णय, उंची वाढविल्याचा सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला फटका
sangli news : अलमट्टी उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार : अलमट्टी धरणाची उंची वाढवून पाणी पातळी 524.256 करण्यात येणार आहे. यासंबंधीची घोषणा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सध्या अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. उंची वाढवण्याच्या निर्णयाचा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार असल्यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
sangli news : अलमट्टी उंची वाढविण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार
सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्राला पूर परिस्थितीचा धोका वाढणार आहे. कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला सांगलीच्या कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने विरोध दर्शवला आहे. सध्या अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला फटका बसत आहे.
जर पुन्हा कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास याची व्याप्ती आणखी वाढून थेट कर्हाडपर्यंत आणि कोल्हापूरच्या शिरोळबरोबर कर्नाटकच्या चिकोडीपर्यंत सगळे बुडण्याचा धोका आहे. कर्नाटक सरकारच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकार याचिका दाखल करणार नसेल तर कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सद्यस्थितीत अलमट्टी धरणाची उंची 519.60 मीटर इतकी आहे. सध्याच्या उंचीमुळे सांगलीपर्यंत बॅकवॉटर पूर येत आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपर्यंत फुग निर्माण होते. 2005, 2019 आणि 2021 मध्ये अलमट्टीचे बॅकवॉटर सांगली-कोल्हापूरच्या पुराला कारणीभूत असल्याचं समोर आलं होतं. आता अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. 524.68 मीटर इतकी उंची करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महापूर कायमचा असेल, असे मत प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केले. यावेळी प्रदीप वायचळ, प्रदीप माने, सतीश रांजणे, सुयोग हावळ, संजय कोरे, डॉ. अभिषेक दिवाण, आशिष कोरे, ओंकार दिवाण, गणपती खराडे, किरण पाटील आदी उपस्थित होते.
सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला फटका
कृष्णा नदीच्या महापुराचा फटका सांगली, सातारा, कोल्हापूर आणि बेळगाव या जिल्ह्याला बसणार आहे. सांगली जिल्ह्यातील पलूसपर्यंतचा बॅक वॉटर, सातारच्या कराडपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या नरसोबावाडीपासून शिरोळ तालुक्यातील अनेक गाव महापुरात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याला देखील अधिकचा फटका बसणार आहे. चिक्कोडीपर्यंत अलमट्टी धरणाच्या पाण्याचे बॅकवॉटर जाण्याचीे भीती सेवानिवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी व्यक्त केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



