rajkiyalive

sangli news : स्थानिक स्वराज्यसाठी भाजप तयारीत, ‘मविआ’ अद्याप पराभवाच्या छायेत

सभासद नोंदणीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे रणशिंग, काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी शांतच

जनप्रवास । अनिल कदम
sangli news : स्थानिक स्वराज्यसाठी भाजप तयारीत, ‘मविआ’ अद्याप पराभवाच्या छायेत : 2024 मध्ये केंद्र आणि राज्यात भाजप महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर भाजप पुन्हा कामाला लागली आहे. आगामी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली. भाजपने सभासद नोंदणीचे काम हाती घेतले. 5 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्यामध्ये जिल्ह्यात सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले, मात्र महाविकास आघाडी अद्याप पराभवाच्या छायेत आहे. विधानसभेला अपयश आल्यानंतर पक्षाची बांधणी करण्याकडे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे आगमी निवडणुकीसाठी भाजपच सुसाट असल्याचे दिसून येते.

sangli news : स्थानिक स्वराज्यसाठी भाजप तयारीत, ‘मविआ’ अद्याप पराभवाच्या छायेत

विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले, त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला. जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले असून आठपैकी पाच आमदार निवडून आले आहेत. भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक आमदार आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ तीन जागा मिळाल्या. चार ठिकाणी विजय मिळवत भाजप जिल्ह्यातील मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाने आपली एकुलती एक जागा कायम राखली.

येत्या काही कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुकास्तरीय नेत्यांची मोट पुन्हा बांधावी लागणार आहे. जिल्हास्तरावरुन सर्व नेत्यांना घेवून जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि सत्यजित देशमुख या चौघांना बालेकिल्ल्यातील संस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न आहेत. विधानसभेला मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठी भाजपने सदस्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपने आता संपूर्ण देशभर सभासद नोंदणीचे काम हाती घेतले आहे. 5 जानेवारी ते 12 जानेवारी या आठवड्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.

2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवली होती.

त्यानंतर झालेल्या सांगली कुपवाड आणि मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपला दणदणीत यश मिळाले, त्याची पुनरावृत्ती करण्याचा भाजपने संकल्प केला आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात बुथवर बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या बरोबरीने सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य आजी-माजी नगरसेवक, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पदाधिकारी या सभासद नोंदणी कार्यात सहभागी होतील.

जिल्ह्यातील भाजपचे चारही आमदार स्वतः एकेका बुथवर सभासद नोंदणीसाठी उपस्थित राहणार आहेत.

प्रत्येक बुथवर किमान दोनशे सदस्य व्हावेत, असे उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने महाविकास आघाडी सुसाट होती, जिल्ह्यात पुन्हा त्याची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा नेत्यांना होती. मात्र आठपैकी अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला. विधानसभेला काँग्रेसने एक तर राष्ट्रवादीने हक्काची एक जागा गमावली. सांगली, मिरजेबरोबरच शिराळा आणि जत विधानसभा भाजपने मिळवली. राष्ट्रवादीने शिराळा गमावली मात्र इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा कायम राखली. काँग्रेसने जत विधानसभा मतदार गमावला तर पलूस-कडेगाव हात राखला.

निवडणुकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीचे थंड आहेत. निवडणूक होवून दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून पक्ष बांधणीसाठी प्रयत्न दिसत नाहीत. आगामी जिल्हा परिषदेसह अन्य निवडणुकीसाठी नेत्यांकडून कोणतीही तयारी नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महाविकास आघाडीमध्ये आलेली मरगळ नेत्यांनी दूर न केल्यास आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहण्याचे संकेत आहेत.

आ. जयंत पाटील, डॉ. विश्वजीत कदम यांची कसरत

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या संस्थांच्या समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम यांना जिल्हा आणि तालुकास्तरीय नेत्यांची मोट पुन्हा बांधावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज