मिरज :
SANGLI NEWS : रहिवासी पुरावा असेल तरच कुत्रे चावल्यावरील इंजेक्शन मिळणार : एखाद्या नागरिकाला कुत्रे चावल्यास त्याचेवर तातडीने उपचार करणे आवश्यक असते. सर्वप्रथम सदर रुग्णास शासकीय रुग्णालयात पाठविले जाते व तेथे त्याला इंजेक्शन दिले जाते. पहिली दोन इंजेक्शन्स शासकीय रुग्णालयात मोफत दिली जातात. कुत्रे चावलेल्या रुग्णास आणखी चार किंवा पाच इंजेक्शन्स देण्याची गरज असते व हि इंजेक्शन्स महापालिका दवाखान्यात मोफत देण्याची सोय आहे. मात्र मनपा प्रशासनाच्या अजब निर्णयामुळे कुत्रे चावलेल्या अनेक रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.
SANGLI NEWS : रहिवासी पुरावा असेल तरच कुत्रे चावल्यावरील इंजेक्शन मिळणार
मनपा प्रशासनाचा अजब कारभार …… रुग्णांचे हाल ……
मनपा दवाखान्यात गेल्यावर सदर रुग्णाचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला अशा कागदपत्रांची रहिवासी पुरावा म्हणून मागणी केली जाते. रुग्णाकडे यापैकी काही नसेल तर आमदार कार्यालयातून पत्र आणण्यास सांगितले जाते. जोपर्यंत हि कागदपत्रे अथवा पत्र दिले जात नाही तोपर्यंत रुग्णास इंजेक्शन दिले जात नाही व रुग्णाची हेळसांड होते.
सोमवारी सकाळी अकरा वाजता एक महिला आपल्या दोन-तीन वर्षाच्या बालकास घेऊन ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयात आली व मुलाला कुत्रे चावले असून मनपा दवाखान्यात कागदपत्रे अथवा आमदार साहेबांचे पत्र मागत असल्याचे सांगितले.
भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांनी याबाबत संपूर्ण माहिती घेतली व सदर महिलेस ना. सुरेशभाऊ खाडे यांचे पत्रही दिले.
तसेच वाटवे स्वतः मनपा दवाखान्यात त्या महिलेसोबत गेले. व तातडीने त्या मुलास इंजेक्शन देण्याची सोय केली. तसेच तेथील वैद्यकीय अधिकार्यांना रुग्णांची अशी अडवणूक होत असल्याबाबत जाब विचारला.
याबाबत मोहन वाटवे यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्यांना फोनवरून विचारले असता मनपा प्रशासनाच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव झाला असल्याने त्याची अंमलबजावणी करणे आमच्यावर बंधनकारक असल्याचे सांगितले गेले.
त्यावर ज्या व्यक्तीस कुत्र्याने चावा घेतला आहे, ती व्यक्ती परगावातील, परराज्यातील असेल, त्याच्याकडे त्यावेळी कागदपत्रे नसतील, लोकप्रतिनिधी त्यावेळी पत्र देण्यास उपलब्ध नसतील तर अशा रुग्णास उपचार न करता त्याच्या जीवाशी खेळणार का ? असा संतप्त सवाल मोहन वाटवे यांनी यावेळी केला. तसेच हा ठराव चुकीचा असून तातडीने रद्द करण्यात यावा अशी मागणी केली. याबाबत पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे याना सांगून तसे आदेश मनपा प्रशासनाला देण्याबाबत विनंती करणार असल्याचे मोहन वाटवे यांनी सांगितले.
मनपा प्रशासनाने मनपा क्षेत्रातील सर्व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने विशेष मोहीम राबवून करण्याची गरज आहे.
मात्र त्याकडे मनपा प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही. किमान मनपा प्रशासनाने तिन्ही शहरात ठिकठिकाणी फलक लावून भटक्या कुत्र्यांनी केवळ मनपा क्षेत्रातील रहिवाशालाच चावा घ्यावा अन्यथा मनपा प्रशासन जबाबदार राहणार नाही असा संदेश कुत्र्यांना द्यावा असा टोला वाटवे यांनी मनपा प्रशासनास लगावला.
मनपा महासभेत झालेल्या ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करणारे अधिकारी दुजाभाव करीत असल्याचे वाटवे यांनी सांगितले. कुत्र्यांच्या इंजेक्शन बाबत मनपा महासभेच्या ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करणारे अधिकारी बेकायदेशीर फलकांबाबत मात्र शेपूट घालत असल्याचे दिसून येत आहे. मनपा कार्यालयापासून दोनशे मीटर अंतरात कोठेही फलकलावंता येणार नाही असा ठराव देखील महासभेत झाला आहे.
मात्र याच अंर्त शेकडो फलक विनापरवाना लावले जात असताना मनपातील अधिकारी कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. या ठरावाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची हिम्मत अधिकार्यांनी दाखवावी अशी मागणी मोहन वाटवे यांनी केली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.