वित्त व लेखा अधिकारी विनायक फासे व त्यांच्या मुलाचा 24 तासात दुर्देवी अंत
विटा/ प्रतिनीधी
sangli news : विट्यात पुत्रविरह सहन न झाल्याने पित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू : वसई विरार महानगरपालिकेचे वित्त व लेखा अधिकारी, विटयाचे सुपुत्र विनायक सुरेश फासे (वय 45) यांचे आज सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनाच्या काही तासापूर्वीच त्यांचा 19 वर्षीय मुलगा सिद्धार्थ विनायक फासे याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. हाता तोंडाशी आलेला मुलगा अनपेक्षितपणे सोडून जाण्याचा धक्का विनायक फासे यांना सहन झाला नाही. केवळ 24 तासात पिता पुत्राचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. ऐन रक्षाबंधनाच्या सणाच्या तोंडावर फासे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाचा डोंगर पाहून शहरवासीयांच्यात हुरहुर निर्माण झाली आहे.
sangli news : विट्यात पुत्रविरह सहन न झाल्याने पित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
विटा शहराचे सुपुत्र विनायक फासे हे वसई विरार महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. शनिवारी कुटुंबासह रत्नागिरी येथे गेले असता समुद्रकिनारी त्यांचा मुलगा सिद्धार्थ हा अचानक आलेल्या लाटामुळे स्वतःला सावरू शकला नाही आणि त्यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झाला. आपल्या मुलाचा असा दुर्दैवी अंत आपल्या डोळ्यासमोर होत असताना आपण त्याचे प्राण वाचवू शकलो नाही ही खंत विनायक फासे यांना लागून राहिली होती.
अखेर सोमवारी पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपला लाडका मुलगा पोटाचा गोळा हा जग सोडून गेला त्याच्याविना राहणे असह्य होत असल्याची भावना विनायक फासे यांच्यात निर्माण झाली आणि अत्यंत दुर्दैवी पणे त्यांचीही प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ हा अत्यंत हुशार व सर्व गुणसंपन्न मुलगा होता. तर विनायक फासे हे अत्यंत मितभाषी व हरहुन्नरी असे अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबावर अचानक असा डोंगर कोसळल्याने शहरवासीयांच्या हळहळ व्यक्त केली जात होती.
फासे पिता पुत्रांचे रक्षाविसर्जन मंगळवारी सकाळी विटा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत आहे. अशाप्रकारे एकाच दिवशी पितापुत्रांचे रक्षाविसर्वजन होण्याचा असा अघटीत प्रसंग पहिल्यांदाच विटा शहरावर आल्याने संपूर्ण शहरवासीय अक्षरशः दुःख व्यक्त करत आहेत. विनायक फासे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी मुलगी, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.