खानापूर, आटपाडी, जत तालुक्यांचा समावेश, 26 जानेवारीला घोषणा शक्य
sangli news : सांगलीतील तीन तालुक्यांचा ‘माणदेश’ नवा जिल्हा : राज्यातील वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेवून सरकारने जिल्ह्यांचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची यादी सोशल मिडीयावर फिरु लागली आहे. सध्या राज्यात 36 जिल्हे असून नव्याने समावेश झाल्यानंतर जिल्ह्यांची संख्या 57 वर पोहोचणार आहे.
sangli news : सांगलीतील तीन तालुक्यांचा ‘माणदेश’ नवा जिल्हा
सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश असलेला ‘माणदेश’ हा नवीन जिल्हा होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि जत तालुक्यांचा समावेश होणार आहे. नवीन जिल्ह्याबाबतची घोषणा 26 जानेवारीला होणार असल्याची चर्चा आहे, मात्र सरकारकडून प्रत्यक्षात घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते.
त्यानंतर वाढती लोकसंख्या आणि गरजा लक्षात घेता जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले. नवीन जिल्ह्यांची भर पडली. तसेच 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी नवीन जिल्ह्यांचे निर्माण होणार अशी चर्चा सुरू होती. राज्यात 26 जानेवारी 2025 रोजी नवीन जिल्ह्यांची घोषणा होणार असून राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्यांचे विभाजन होऊन 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे.
सध्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या 36 आहे.
तर पुणे, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा सहा प्रशासकीय विभागात या जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. यापैकी काही जिल्ह्यांचे प्रशासकीय कार्यक्षेत्र मोठे आहे. प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने जुन्या जिल्ह्यांचे विभाजन करून नव्याने जिल्हा निर्मिती करण्याचा प्रस्ताव सन 2018 मध्ये मुख्य सचिवांच्या समितीने मांडला होता.
नव्याने 22 जिल्हे आणि 49 तालुक्यांची नव्याने निर्मिती करणे असा प्रस्ताव होता.
या अनुषंगाने सरकारने नव्याने 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामधे सांगली, सातारा व सोलापूरमधील काही तालुक्यांचा मिळून माणदेश या नव्या जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील आटपाडी, खानापूर आणि जत या तीन तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कोणतीही सूचना अथवा लेखी आदेश नसल्याचे वरिष्ट अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
सध्या राज्यात शासनाकडून अनेक विविध योजना राबवण्यात येत आहेत.
या योजनांसाठी शासन दरबारातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो. त्यामुळं आत्तातरी नवीन जिल्ह्यांच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा जिल्हा न्यायालयाच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येण्याची शक्यता आहे. सध्या शासनाची इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची तयारी नसल्याने अद्याप तरी नवीन जिल्ह्यांचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे, जाणकारांचे म्हणणे आहे.
नवा जिल्हा, कंसात मूळ जिल्हा
माणदेश (सांगली, सातारा, सोलापूर),
भुसावळ (जळगाव),
उदगीर (लातूर),
आंबेजोगाई (बीड),
मालेगाव (नाशिक),
कळवण (नाशिक),
किनवट (नांदेड),
मिरा भाईंदर (ठाणे),
कल्याण (ठाणे),
खामगाव (बुलढाणा),
बारामती (पुणे),
पुसद (यवतमाळ),
जव्हार (पालघर),
अचलपूर (अमरावती),
साकोली (भंडारा),
मंडणगड (रत्नागिरी),
महाड (रायगड),
शिर्डी (अहिल्यानगर),
संगमनेर (अहिल्यानगर),
श्रीरामपूर (अहिल्यानगर)
अहेरी (गडचिरोली)

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



