rajkiyalive

sangli political news एकतर्फी वाटणार्‍या लढतीत काट्याची टक्कर

तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर, शिराळ्यात चुरस, नेते, उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

sangli political news एकतर्फी वाटणार्‍या लढतीत काट्याची टक्कर : विधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीनंतर प्रचार शिगेला पोहोचत असताना सुरुवातीला एकतर्फी वाटणार्‍या लढतीमध्ये वारं फिरल्याचे चित्र आहे. तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि शिराळा मतदारसंघातील लढतीत काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहेत. तासगाव-कवठेमहांकाळला संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील, जतला विक्रमसिंह सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर, खानापुरात सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील, शिराळ्यात मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्यात काट्याची टक्कर होण्याचे संकेत आहेत. या चारही ठिकाणी बड्या नेत्यांच्या सभांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने उमेदवार आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

sangli political news एकतर्फी वाटणार्‍या लढतीत काट्याची टक्कर

लोकसभा निवडणुकीत सांगली पॅटर्नने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. त्यामुळे राज्यभर सांगली जिल्ह्याचे नाव चर्चेत आहे. सांगली जिल्हयात महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. सद्यस्थितीत शरद पवार राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे दोन आमदार आहेत. उर्वरित तीनमध्ये भाजप दोन आणि शिंदे गटाचे स्वर्गीय अनिल बाबर आमदार होते. राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादी यांच्याकडून जोरदार फिल्डींग लावली जात आहे. महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात पुन्हा आघाडीच्या उमेदवारांचा बोलबाला सुरु झाला आहे.

जिल्ह्यातील आठपैकी चार मतदारसंघात बहुतांशी ठिकाणी सुरुवातीला सर्वच लढती एकतर्फी होतील, असे चित्र राहिले. उमेवारांच्या अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडत आहे. पदयात्रा, सभा, बैठका आणि पदाधिकारी, कार्यकर्ते फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. त्यामुळे तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि शिराळा मतदारसंघातील लढतीत काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत.

तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात अजितदादा गटाकडून माजी खासदार संजयकाका पाटील यांना मैदानात उतरल्याने चुरस निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित पाटील रिंगणात उतरणार आहेत. लोकसभेला संजयकाका पाटील यांचा झालेला पराभव आणि विधानसभेला रोहित पाटील यांचा होत असणारा उदय लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला जागा घेतली. भाजपचे माजी खासदार संजयकाका यांना पक्षात घेवून विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहे.

लोकसभा निवडणुकीत संजयकाकांना विरोध केलेले माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी पुन्हा काकांना साथ देत आहेत.

दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा गेली, आता आमदारकी सोडणार नसल्याचा चंग संजयकाकांनी उशिरा बाळगल्याने सर्वच निती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.

शिराळ्यात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्यात लढत होत आहे.

भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सम्राट महाडिक यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी दिली. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या महाडीक नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले. त्यामुळे महाडीक ताकदीने कामाला लागले आहेत. मानसिंगराव नाईक आणि कट्टर विरोधक असलेल्या माजी आमदार शिवाजीराव नाईक हे दोघे एकत्र आले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक वर्षे टोकाचा राजकीय संघर्ष राहिला. दोन्ही नेते एकत्र आल्याने कार्यकर्ते मनापासून एकत्र आलेले नसल्याचे चित्र दिसून येते, त्याचा फायदा देशमुख यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला एकतर्फी वाटणारी निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

खानापूरमध्ये महायुतीमध्ये ही जागा एकनाथ शिंदे सेनेकडे आहे, स्वर्गीय अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना उमेदवार आहेत.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मागील महिन्यात भाजपमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. देशमुख हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते, त्यांनी पक्षाकडेही मागणी केली होती, परंतु पक्षाने वैभव पाटील यांच्यावरच विश्वास दाखविला. सुरुवातीला बाबर यांची गाडी सुसाट असल्याचे दिसून आले, त्यानंतर राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांनीही जोर लावल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.

जत विधानसभा मतदारसंघात प्रारंभी भुमिपुत्र विरुद्ध उपरा असा वाद उफाळून आला आला. काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याविरोधात भाजपकडून आमदार गोपींचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. माजी आ. विलासराव जगताप यांनी पुन्हा पक्षाविरोधात बंड केले आहे. माजी आ. जगताप आणि रवि-पाटील यांची भाजप नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भाजपच्याच तम्मनगौडा रवि-पाटील मैदानात आहेत, मात्र खरी लढत काँग्रेसचे सावंत आणि भाजपचे पडळकर यांच्यात रंगत आहे. त्यामुळे मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

काट्याच्या लढती
तासगाव-कवठेमहांकाळ ः संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील
जत ः विक्रमसिंह सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर
शिराळा ः मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख
खानापूर ः सुहास बाबर विरुद्ध वैभव पाटील

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज