महापालिका निवडणुकीसाठी भाजपची स्वबळाची चाचपणी
sangli political news : चंद्रकांतदादांच्या पालकमंत्रीपदामुळे सत्तेच्या आशा पल्लवीत : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जिल्ह्यात व राज्यात जोरदार कमबॅक केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 2018 च्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेतृत्व केले होते. आता देखील स्वबळावर निवडणूक लढवून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न असणार आहे. त्यासाठी चाचपणी सुरू आहे. चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री झाल्याने भाजपच्या सत्तेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
sangli political news : चंद्रकांतदादांच्या पालकमंत्रीपदामुळे सत्तेच्या आशा पल्लवीत
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अपयश आल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगली फिल्डिंग लावली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात नंबर वन पक्ष भाजप बनला. जिल्ह्यात भाजपचे 2019 च्या निवडणुकीत केवळ दोनचे आमदार होते. या निवडणुकीत महापालिका क्षेत्रातील दोन आमदारांसह जत व शिराळा विधानसभेच्या जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात देखील भाजप नंबर वन पक्ष बनला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यात होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागावे, अशा सूचना पदाधिकार्यांना शिर्डी येथील बैठकीत दिल्या होत्या.
शिवाय स्थानिक जिल्हाध्यक्षांना महायुती करायची की स्बळावर लढायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार देखील दिले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात भाजपने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. 2018 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली होती. त्या विरोधात भाजपने ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. 41 नगरसेवक स्वबळावर निवडून आले होते.
दोन अपक्षांनी देखील पाठिंबा दिला. त्यानंतर अडीच वर्षे सत्ता टिकली.
मात्र अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे काही नगरसेवक गळाला लावून सत्तांतर घडवले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये अद्याप काही माजी नगरसेवकांवर नाराजी आहे. त्यामुळे या घटकांना बरोबर नको, स्वबळावरच निवडणुकीची तयारी करू, असा सूर भाजपच्या काही पदाधिकार्यांचा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक माजी नगरसेवक सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. त्यामुळे महायुती केल्यास या नगरसेवकांना सोबतच घेऊन काम करावे लागणार आहेत. शिवाय महायुती झाल्यास जागा वाटप करतेवेळी अनेक भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही, त्यांना थांबावे लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने स्वबळावर चाचपणी सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) भूमीका काय?
महापालिकेच्या निवडणुका येत्या तीन-चार महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपने महायुती न करता स्वबळाचा हट्ट धरला आहे. राष्ट्रवादीचे शिर्डी येथे अधिवेनशन सुरू आहे. या अविधेशनात युती झाली तर ठिक अन्यथा त्यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते, आ. इद्रिस नायकवडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक विष्णू माने यांची भूमीका महत्वाची असणार आहे.
मनपा 2018 च्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भारतीय जनता पार्टी: 41
काँग्रेस: 20
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी: 15
अपक्ष: 2
- #BJP4Seva:
- #MahayutiVidhansabha2024:

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



