rajkiyalive

sangli political news : जिल्ह्यातील मतदारसंघांची होणार पुनर्रचना

2026 ची मुदत संपणार: नव्याने होणार्‍या जनगणनेकडे लक्ष

sangli political news : जिल्ह्यातील मतदारसंघांची होणार पुनर्रचना : सांगली जिल्ह्यातील दोन लोकसभा व आठ विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना आता होणार आहे. संसदीय कायद्यानुसार 2026 पर्यंतची मुदत आता संपणार आहे. त्यामुळे 2029 ची लोकसभा व विधानसभेची निवडणूक ही नवीन मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसारच होणार आहे. या शिवाय अनुसूचित जाती, जमाती आरक्षणाबरोबर 33 टक्के महिला आरक्षित मतदारसंघ राहणार आहेत. त्यामुळे नव्याने होणार्‍या मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे वेध राजकीय नेते व कार्यकर्त्यांना लागले आहेत.

sangli political news : जिल्ह्यातील मतदारसंघांची होणार पुनर्रचना

लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची रचना करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर देशस्तरावर न्यायिक परिसिमन आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाचे अध्यक्ष हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात. प्रत्येक राज्याचे राज्य निवडणूक अधिकारी हे या आयोगाचे सदस्य असतात. या आयोगाकडून प्रत्येक राज्यात जाऊन सुनावणी घेतली जाते. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना केली जाते. लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची दर दहा वर्षांनी पुनर्रचना करावी, अशी तरतूद राज्यघटनेमध्ये आहे. त्यासाठी लोकसंख्या हा मुख्य निकष आहे. त्यानुसार 1951, 1961, 1971 च्या जनगणनेनुसार तीन पुनर्रचना आयोग स्थापन केले. त्यांनी अनुक्रमे 1851, 1961, 1973 अशी तीनवेळा मतदारसंघ पुनर्रचना केली.

मात्र 1976 मध्ये 42 वी घटना दुरूस्ती झाली, त्यानुसार 1973 च्या पुनर्रचनेप्रमाणे 2001 पर्यंत मतदारसंघ राहतील, अशी तरतूद होती. त्यानुसार 2002 च्या अर्थात चौथ्या मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने 2001 च्या जनगणनेनुसार पुनर्रचना केली. त्यातील तरतुदीनुसार 2026 पर्यंत 2001 च्या जनगणनेनुसार मतदारसंघाची पुनर्रचना आयोगाने लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची 2009 मध्ये मतदारसंघातर्गत बदल केले. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 2009 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यापूर्वी 2004 ला सांगली जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ होते. यामध्ये शिराळा, वाळवा, भिलवडी-वांगी, सांगली, मिरज, तासगाव, खानापूर-आटपाडी, कवठेमहांकाळ व जत या मतदारसंघाचा समावेश आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात शिराळा व खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघ वगळता भिलवडी-वांगी, सांगली, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ व जत हे सहा विधानसभा मतदारसंघ होते. तर शिराळा व वाळवा हे मतदारसंघ कराड लोकसभा मतदारसंघात तर खानापूर-आटपाडी मतदारसंघ हा पंढरपूर लोकसभा मतदारसंघात होते. 2009 च्या नवीन पुनर्रचनेत सांगली, कराड व पंढपूर लोकसभा मतदारसंघात बदल झाला. तर जिल्ह्यातील कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ रद्द झाला होता. तासगाव-कवठेमहांकाळ हा नव्याने मतदारसंघ निर्माण झाला होता. सांगली जिल्ह्यात सध्या सांगली, मिरज, कवठेमहांकाळ-तासगाव, जत, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, शिराळा, इस्लामपूर हे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. तर यातील शिराळा व इस्लामपूर हे मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडले असून इतर सहा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात आहेत.

शिवाय घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. आता 2026 पर्यंत या मतदारसंघाची रचना अस्तित्वात राहणार आहेत. 2024 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. आता 2026 नंतर मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. पण 2021 ला जनगणनाच झाली नाही. दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. पण कोरोनामुळे 2021 ला जनगणना झाली नाही. आता 2025 ला जनगणना सुरू होणार आहे. जनगणना झाल्यानंतर नव्याने मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे.

2029 च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार होणार आहेत. नवीन पुनर्रचनेत जिल्ह्यात विधानसभेचे मतदारसंघ वाढणार का कमी होणार? कोणाचा मतदारसंघ कोणाच्या मतदारसंघाला जोडणार? याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

महिला आरक्षणाचा मुद्दा…

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. त्यानंतर त्यांची सत्ता आली. महिलांच्या आरक्षणाचा विचार करता, कोणताही पक्ष महिलांना आरक्षण देण्यास विरोध करणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे 2029 च्या लोकसभा व विधानसभा सभागृहांमध्ये महिलांची संख्या 33 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते.

 

सांगली जिल्ह्यात पूर्वी व आता विधानसभा मतदारसंघ

जुने मतदारसंघ (2004) नव्याने झालेली पुनर्रचना (2009)
सांगली सांगली
मिरज मिरज
शिराळा शिराळा
जत जत
खानापूर-आटपाडी खानापूर आटपाडी
वाळवा इस्लामपूर
भिलवडी-वांगी पलूस-कडेगाव
तासगाव तासगाव-कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ ——
सांगली लोकसभेतील विधानसभा मतदारसंघ
जुने मतदारसंघ (2004) नव्याने झालेली पुनर्रचना (2009)
भिलवडी-वांगी पलूस-कडेगाव
सांगली सांगली
मिरज मिरज
तासगाव तासगाव-कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ खानापूर-आटपाडी
जत जत
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज