sangli political news : विरोधकांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपची बनणार डोकेदुखी : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती उमेदवारांच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरलेले नेते आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सत्तेची चव चाखण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याने या प्रवेशाला महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपकडून जोरदार विरोध होऊ लागला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधकांची भूमीका बजाविणार्यांना महायुतीत कशाला घेता? असा सवाल होऊ लागला आहे. त्यामुळे या नेत्यांचा पक्ष प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार करून घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
sangli political news : विरोधकांचा राष्ट्रवादी प्रवेश भाजपची बनणार डोकेदुखी
सांगली जिल्ह्यात पंधरा वर्षांपूर्वी तत्कालिन काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांना शह देण्यासाठी दुष्काळी फोरमच्या नावाखाली जिल्ह्यातील नेत्यांची फौज एकत्र आली होती. यामध्ये माजी आमदार विलासराव जगपात, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा समावेश होता. यातील अनेक नेते हे राष्ट्रवादीत होते पण त्यांनी वेगळा गट स्थापन केला होता. याच नेत्यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन ताकद देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील व स्व. आर. आर. पाटील हे दिग्गज नेते होते. या नेत्यांविरोधात अजित पवार यांनी दुष्काळी फोरमला बळ दिले नाही. त्यानंतर आता हे नेते विखुरले असून सोयीस्कर राजकारण करू लागले.
नुकताच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यांनीच महायुतीच्या विरोधात काम केले होते.
लोकसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगपात, अजितराव घोरपडे यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार खा. विशाल पाटील यांचा उघड प्रचार केला. तर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. लोकसभा निवडणुकीत खा. विशाल पाटील यांना महायुतीतील अनेकांची साथ मिळाल्याने महायुतीचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांची हॅट्ट्रिक हुकली. याचे खापर माजी आमदार विलासराव जगपात, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यावर फोडले गेले होते. त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका लागल्या. या निवडणुकीत अजितराव घोरपडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. जगपात भाजपमध्ये परतणार होते. पण त्यांनी थेट भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात भूमीका घेतली.
sangli-political-news-oppositions-entry-into-nationalist-politics-will-become-a-headache-for-bjp
माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. पण पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी देखील भाजपचे विद्यमान आमदार सत्यजीत देशमुख यांच्याविरोधात काम केले होते. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात विलासराव जगपात यांनी काम केले होते. हीच नेतेमंडळी आता सत्तेची चव चाखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सत्तेत प्रवेश करण्याचा प्लॅन करत आहेत. मात्र याला आ. सत्यजीत देशमुख, आ. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांसह, भाजपच्या पदाधिकार्यांनी जोरदार विरोध केला असल्याचे चित्र आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याच लोकांना महायुतीच्या नात्याने भाजपला सोबत घ्यावे लागणार आहे.
या नेत्यांचा जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यास आगामी होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याच लोकांना महायुतीच्या नात्याने भाजपला सोबत घ्यावे लागणार आहे. महाविकास आघाडीला साथ देऊन भाजपचे खच्चीकरण करणार्यांना पुन्हा ताकद का द्यायची? असा सवाल भाजपचे लोक करू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाला आता विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षात पक्ष प्रवेश देणार का? याकडे लक्ष लागले आहे.
तर मानसिंगराव नाईकांना देखील विरोध होणार….
शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे पुत्र विराज नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मानसिंगराव नाईक राष्ट्रवादीत प्रवेशावर चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यांना राष्ट्रवादी घेऊ नये म्हणून आ. सत्यजीत देशमुख व सम्राट महाडिक समर्थक विरोध करणार आहेत. महायुतीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करणार्यांना महायुतीत घेऊ नये, अशी मागणी त्यांची असणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



