rajkiyalive

sangli political news : सांगलीला डच्चू, पालकमंत्री उपराच

यंदा पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर यांची निराशा

sangli political news : सांगलीला डच्चू, पालकमंत्री उपराच: एकेकाळी राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या सांगली जिल्ह्यातील एकही मंत्रिपद न देता महायुती सरकारने रविवारी धक्का दिला. नव्या महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातील एकालाही संधी मिळाली नाही. भाजपचे आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ आणि आ. गोपीचंद पडळकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र मंत्रिमंडळामध्ये सांगलीला डच्चू देण्यात आल्याने इच्छुक आमदारांसह जिल्हावासियांची निराशा झाली. यंदा 2014 ची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. महायुतीच्या पाच आमदारापैकी एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नसल्याने जिल्ह्याला पुन्हा उपराच पालकमंत्री मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. आता पालकत्व कुणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.

sangli political news : सांगलीला डच्चू, पालकमंत्री उपराच

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला राज्यात भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची सत्ता आली आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन करण्यात पंधरा दिवस गेले. दहा दिवसांपूर्वी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता होती, मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. रविवारी नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. भाजप, शिंदे सेना आणि अजितदादा राष्ट्रवादीच्या आमदारांना संधी मिळाली आहे. तिन्ही पक्षात बड्या नेत्यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली, त्यातच सांगली जिल्ह्यातील एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नसल्याने महायुती सरकारने धक्का दिला.

सांगली जिल्ह्यात महायुतीला चांगले यश मिळाले असून आठपैकी पाच आमदार निवडून आले आहेत. भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक आमदार आहेत. माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार आणि गोपीचंद पडळकर यांच्यापैकी एकाला मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. गतवेळी कामगार मंत्री राहिलेले खाडे हे पुन्हा मंत्री होतील, त्यांना चांगले पद मिळेल, असा विश्वास होता.

आ. गाडगीळ हे तिसर्‍यांदा आमदार झाले आहेत. त्यांना मंत्री पदाची त्यांना संधी मिळाली नाही. आता त्यांचा समावेश नक्की होईल, असा दावा करण्यात आला होता. आ. पडळकर हे विधान परिषदेवर आमदार असताना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. धनगर समाजाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात असल्याने राज्यमंत्री म्हणून वर्णी लागेल, अशी चर्चा रंगली होती.

जिल्ह्यातून तिघे जण मंत्रिपदाच्या शर्यतीत होते, मात्र एकाचाही मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले होते, त्यावेळी पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नव्हते. त्याप्रमाणे 2014 चीच पुनरावृत्ती पुन्हा झाल्याचे स्पष्ट झाले. 2014 मध्ये जिल्ह्यातील एकही मंत्री नसल्याने सुरुवातीला चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी सोलापूर जिल्ह्याचे भाजप नेते सुभाष देशमुख यांना सांगलीचे पालकमंत्री करण्यात आले.

पाच वर्षाचा कार्यकाल संपण्यापूर्वी सहा महिने अगोदर मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना मंत्रिपदी संधी मिळाली होती, त्यामुळे सहा महिने खाडे यांच्याकडे पालकमंत्री पद राहिले. 2024 मध्ये जिल्ह्यातील महायुतीच्या पाच आमदारापैकी एकाचाही मंत्रिमंडळात समावेश नसल्याने पुन्हा उपराच पालकमंत्री मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. आता पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री

महायुती सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपदाची लॉटरी लागलेली नाही. या कारणांनी सांगलीचे पालकमंत्री बाहेरील नेत्यांकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले. 2014 मध्ये भाजप-शिवसेना युती सरकार आल्यानंतर सुरुवातीला चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले होते. येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादांची वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज