पलूस-कडेगाव भाजप की शिंदे सेना
जनप्रवास । सांगली
sangli political news ” सांगली, मिरजेत काँग्रेस, खानापूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा दावा कायम : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत अवघी दोन दिवस शिल्लक राहिली आहेत. आली घटिका पण जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील पेच सुटत नसल्याचे स्पष्ट झाले. सांगली, मिरज, खानापूर-आटपाडी महाविकास आघाडी तर पलूस-कडेगावमध्ये महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम आहे. मिरजेत काँग्रेस व ठाकरे गट शिवसेना तर खानापूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि सेनेत रस्सीखेच सुरुच आहे. पलूस-कडेगावमध्ये भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला, मात्र जागा शिवसेनेकडे असल्याने भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
sangli political news ” सांगली, मिरजेत काँग्रेस, खानापूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा दावा कायम
जिल्ह्यात विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. भाजपचा गड खालसा करण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान वाढल्या आहेत. जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी पाच मतदारसंघात उमेदवारीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवार जाहीर होवून प्रचाराला सुरुवात केली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 22 ऑक्टोंबरपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी (दि. 29) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना अद्यापही जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील अद्याप पेच सुटलेला नाही.
आठ विधानसभा मतदारसंघ असून चार जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.
सध्या राष्ट्रवादीकडे इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ अशा तीन विधानसभेच्या जागा आहेत. खानापूर-आटपाडीची जागा राष्ट्रवादी मिळविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. काँग्रेसने पलूस-कडेगाव, जत आणि सांगली विधानसभेची जागा लढणार आहे. त्यामुळे सेनेला केवळ मिरज मतदारसंघ शिल्लक आहे. मात्र काँग्रेसने मिरजेची जागाही मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप नेते व पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री डॉ. खाडे यांच्याविरोधात शड्डू मारण्याची तयारी केली आहे. या परिस्थितीत ठाकरे गटही मिरजेची जागा सोडायला तयार नसल्याने पेच निर्माण झाला आहे.
सांगलीची जागा काँग्रेसकडे असून या जागेवर लढण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छुक आहेत. या दोघांमध्ये तीन महिन्यांपासून उमेदवारीसाठी चुरस सुरु आहे. पक्षाचे नेते आ. विश्वजीत कदम व खा. विशाल पाटील यांनी दोघांमध्ये तोडगा काढण्यासाठी एकाला विधानसभा तर एका विधानपरिषद देण्याची ग्वाही दिली होती. मात्र दोघांनी विधानसभेवरच दावा केल्याने वाद प्रदेश काँग्रेसकडे गेला आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस उमेदवारीचा पेच कायम असल्याचे स्पष्ट झाले.
खानापूर-आटपाडी मतदारसंघात अजितदादा पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील लढण्याच्या तयारीत आहेत,
मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. सेनाही हा मतदारसंघ सोडायला तयार नसून लढायचे असेल तर मशाल चिन्हावर लढावे, असा आग्रह धरला आहे. पलूस-कडेगाव आणि शिराळा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
पलूस-कडेगावमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत.
काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याविरोधात देशमुख हेच जोरदार लढत देवू शकतात, असे भाजप नेत्यांना वाटते, मात्र हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेकडे राहिला आहे. अशातच देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप हा मतदारसंघ घेणार की देशमुख यांना सेनेच्या तिकीटावर आखाड्यात उतरणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत.
जतमध्ये भूमिपुत्रांचे काय होणार?
जतमध्ये विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांनी भूमिपुत्राला उमेदवारी देण्याची मागणी केली होती, मात्र पक्षाने पडळकर यांच्यावरच विश्वास दाखविला. त्यामुळे भूमिपूत्र कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिराळ्यात महाडीक काय करणार?
शिराळा मतदारसंघात भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. 2019 मध्ये सम्राट महाडीक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मात्र पराभव झाला. गेल्या पाच वर्षात त्यांनी शिराळा मतदारसंघात तयारी केली होती. आता देशमुख यांना उमेदवारी मिळाल्याने महाडीक काय करणार? याबाबतची चर्चा सुरु झाली आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.