rajkiyalive

sangli political news : सांगलीत उध्दव ठाकरे सेनेला घरघर

sangli political news : सांगलीत उध्दव ठाकरे सेनेला घरघर: राजकारणात कोण राव आणि रंक कधी होईल असे आता सांगता येत नाही. तशीच काहीशी परिस्थिती आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली आहे. सत्ता गेली, लया गेली त्यामुळे या पक्षातील स्वतःला निष्ठावंत मावळे म्हणवून घेणारे आता शिवसेनेत (शिंदे गट) हळूहळू सहभागी होत आहेत. आधीच जिल्ह्यात ठाकरे गट मरगळलेल्या अवस्थेत होता. त्यात जिल्हाप्रमुखांसह काही पदाधिकारी, शिवसैनिकांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. जिल्ह्यात ठाकरेंचा पक्ष जवळपास रिकामा झाला.सर्वांची तक्रार एकच. पक्षांकडून बळ मिळत नाही. किमान आता शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांना तरी पक्षांकडून ‘बळ’ मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

sangli political news : सांगलीत उध्दव ठाकरे सेनेला घरघर

शिल्लक शिवसैनिकांना तर बळ मिळणार का? ः संपर्कप्रमुखांसह संघटनात्मक बंदलांची गरज

महाराष्ट्रात शिवसेनेची घौडदौड सुरु असतानाच सांगली जिल्ह्यातील शिवसेना कधी वाढलीच नाही. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे पिक जोमात असल्याने शिवसेनेला वाढीचा ‘बुस्टर’ कधी मिळालाच नाही. सत्तास्थाने नाहीत, पक्षांकडून बळ मिळत नाही. तरीही एकेकाळी ‘शिवसेना’ या चार अक्षरांचा दबदबा जिल्हयात पहायला मिळाला. पण ‘अ‍ॅडजेस्टमेंट’च्या राजकारणात येथील शिवसैनिकांचा कायमच बळी गेला ही वस्तस्थिती आहेच. याला कारणेही भरपूर आहेत. संघटनात्मक अनुभव नसणारे, केवळ बोलबच्चनगिरी करणार्‍यांवर संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख सारख्या मोठ्या पदांची जबाबदारी सोपविणे, सामान्य शिवसैनिकांना डावलणे अशी प्रमुख कारणे ठाकरे गटाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरली आहेत.

राज्यात ज्या ज्या वेळी शिवसेना सत्तेत आली, त्या त्या वेळी जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची नामी संधी येथिल पदाधिकार्‍यांना होती. मात्र ती त्यांनी घालवली. या संघटनात्मक बांधणीचा शून्य अनुभव असलेल्या पदाधिकार्‍यांना या संधीचे सोने करताच आले नाही. ही वस्त्ाुस्थिती आहे. केवळ आपल बस्तान भक्कम करणे, मुंबईच्या वार्‍या करणे, वरिष्ठांच्या मनामध्ये जिल्ह्याची वेगळी प्रमिता निर्माण करण्यातच काहींनी दिवस घालविले. परिणामी पक्ष बांधणी नाजूकच राहिली. शिवसेनेच्या फूटीनंतर काहींनी ठाकरे यांच्याशी निष्ठा असल्याचे सांगत जागा अडवून ठेवली. एकेकाळी गाव तिथे शिवसेना शाखा होती. गावात चार जण का असेनात पण शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक होते. पण आता ना शाखा राहिली आहे, ना फलक ना शिवसैनिक.

sangli-political-news-uddhav-thackeray-sena-faces-a-lot-of-criticism-in-sangli

पण पक्ष संघटन वाढलेच नाही. आता मात्र पक्षाकडून अपेक्षित बळ मिळत नसल्याचे सांगत हेच ठाकरेंचे मावळे शिंदे यांच्या शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. त्यांचा शिंदेच्या शिवसेनेला कितपत फायदा होईल हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल परंतू यामुळे सांगली जिल्ह्यात ठाकरे यांची शिवसेना मात्र जवळपास रिकामी झाली आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील शिवसैनिक आता उरले आहेत. काहींनी मिरजेत शक्तीप्रदर्शन करत ‘अभी जिंदा है..’ हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसाला दाद दिली पाहिजे, परंतू त्यांचा आवाका पाहता ठाकरेंच्या शिवसेेनेच्या वरिष्ठांनी सांगलीत पक्षांवर ही वेळ का आली याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

पक्षांकडून बळ मिळत नाही हा आरोप खरा असेल तर किमान आता शिल्लक राहिलेल्या शिवसैनिकांना तरी पक्षाने बळ द्यावे. त्यांच्या खांद्यावर केवळ शिवसेनेचाच भगवा द्यावा, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.

संघटनात्मक बदलांची गरज

जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेनेला संघटनात्मक बदल करण्याची गरज आहे. आंदोलनापुरते चमकोगिरी करणारे पदाधिकार्‍यांना बाजूला करण्याची आवश्यकता आहे. यासाठी संघटना बांधणीचो अनुभव असणार्‍यांनाच संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख पदांच्या जबाबदार्‍या देण्याची गरज आहे. तळागाळात काम करणार्‍या शिवसैनिकांच्या कामाचे मूल्यमापन करुन पदे वाटावी लागणार आहेत. अन्यथा येणारा काळ ठाकरे यांच्या शिवसनेसाठी यापेक्षाही खडतर असेल हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज भासणार नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज