rajkiyalive

SANGLI : राष्ट्रवादीची पडझड; शरद पवार कसे करणार पॅचअप?

SANGLI : राष्ट्रवादीची पडझड; शरद पवार कसे करणार पॅचअप? ‘त्या’ फुटीर माजी नगरसेवकांना कार्यक्रमाचे निमंत्रण

 

 

SANGLI : राष्ट्रवादीची पडझड; शरद पवार कसे करणार पॅचअप?

जनप्रवास । प्रतिनिधी

सांगली: महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, मनपा क्षेत्रात दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे समर्थक अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. त्यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश झाला नसला तरी भविष्यात त्यांचा प्रवेश निश्चित आहे. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी सांगलीच्या दौर्‍यावर येत आहेत. अजितदादांच्या संपर्कात असलेल्या माजी नगरसेवकांना देखील कार्यक्रमाला बोलावले आहे. त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादीतील पडझड रोखण्यासाठी काय कानमंत्र देणार? त्यांचे पॅचअप होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या दीड-दोन वर्षात राज्याच्या राजकारणात झपाट्याने बदल होत चालले आहे.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट विभक्त झाला. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तर काही आमदारांना मंत्रीपदे मिळाली. यांनतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले. शरद पवार व अजित पवार यांनी आपल्या गटाची ताकद वाढविण्यासाठी राज्यात मेळावे, सभा, बैठका सुरू केल्या. नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी देखील झाल्या. राज्यातील या फुटीचा परिणाम सांगली ग्रामीण व शहरी भागात झाला.

 

वैभव पाटील यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर पद्माकर जगदाळे यांना शहर जिल्हाध्यक्ष केले आहे

विट्याचे माजी आमदार सदाशिव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील यांनी आ. जयंत पाटील यांची साथ सोडून अजितदादांना जाहीर पाठिंबा दिला. तर मनपा क्षेत्रातून माजी महापौर इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे आदींनी अजितदादा गटात प्रवेश केला. सध्या या नेत्यांवर मोठी जबाबदारी दादांनी दिली आहे. वैभव पाटील यांना ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तर पद्माकर जगदाळे यांना शहर जिल्हाध्यक्ष केले आहे. तर दुसरीकडे इद्रिस नायकवडी यांना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिले आहे. या तिन्ही नेत्यांनी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

या पदाधिकार्‍यांनी पहिला धक्का काही दिवसांपूर्वी दिला आहे.

माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर 13 माजी नगरसेवक देखील आहेत. हे देखील अजितदादांच्या संपर्कात आहेत. यांनी आ. जयंत पाटील यांची साथ सोडली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आ. जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेच्या निवडणुका किमान वर्षभर लांबणीवर पडल्या आहेत. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. राष्ट्रवादीच्या एका बैठकीत सांगली लोकसभा व विधानसभेची जागा पक्षाने मागितली होती. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा आग्रह धरला गेला होता. पण जागा मागणारेच आता अजितदादा पवार गटात गेले आहेत.

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून राज्यभर काम करत आहेत.

पण त्यांच्या जिल्ह्यात पक्षाला लागलेली गळती ही मोठी जखम आहे. एकेकाळी महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचा दबदबा होता. राष्ट्रवादीची ताकद ज्यांच्या मागे तोच उमेदवार लोकसभा व विधानसभेला निवडून येत होता. 2008 च्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी आ. जयंत पाटील यांनी केलेली महाविकास आघाडीची खेळी यशस्वी झाली होती. पण आता राज्यात राष्ट्रवादीमध्ये दोन गट निर्माण झाल्याने शरद पवार गटाला गळती लागली आहे. भविष्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे शरद पवार गटाला आपले अस्तित्व ठेवावे लागणार आहे.

 

हेही वाचा
SANGLI MAHAPALIKA : अजितदादा गटाने महापालिका क्षेत्रात पाय पसरले…
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
सामना भाजप-काँग्रेसचा, लक्ष्य जयंतरावांच्या भूमिकेकडे
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
वारसा असूनही… न झालेले आमदार...
आम्ही काय बँडवाले आहोत का? लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली?

प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले नाराज माजी नगरसेवकांची मनधरणी करावी लागणार आहे.

अजितदादांच्या गटात प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेले नाराज माजी नगरसेवकांची मनधरणी करावी लागणार आहे. मंगळवारी शरद पवार सांगलीच्या दौर्‍यावर येणार आहेत. येथील स्टेशन चौकात राजारामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला नाराज माजी नगरसेवकांना पक्षाने निमंत्रण दिले आहे. ते कार्यक्रमाला येऊ शकतात. त्यामुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवकांशी शरद पवार चर्चा करून पडझड रोखण्यासाठी प्रयत्न करणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे. माजी नगरसेवकांची नाराजी दूर झाली नाही तर पंधरा दिवसात अजितदादा पवार यांच्या दौर्‍यावेळी यांचा पक्षप्रवेश निश्चित आहे.

‘राजारामबापूं’च्या पुतळ्यासाठी आग्रही असलेले अजितदादा गटात

महापालिका क्षेत्रात राजारामबापू पाटील यांचा पुतळा उभारण्यासाठी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आग्रही होते. त्यांनी अनेक महासभेत पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी विषय मांडला होता. महापौर झाल्यानंतर त्यांनी स्वत: यासाठी पाठपुरावा केला. एक समिती देखील नेमली. त्यांना सभागृहातील नगरसेवक व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी साथ दिली. शासन मंजुरी झाली आणि पूर्णाकृृती पुतळा उभारला गेला, पण या पुतळ्याचा अनावरण सोहळा होण्यापूर्वीच सूर्यवंशी व समितीच्या सदस्यांनी अजितदादा गटाशी सलगी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज