sangli samrak news : कोट्यवधींचा खर्च तरीही स्मारकांची कामे अपूर्णच : राज्याच्या राजकिय, सामाजिक, क्रिडा, कला, साहित्यासह सांस्कृतीक क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याचे नाव उंचाविणार्या व्यक्तींच्या स्मारकांवर आता पर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे, परंतू स्मारकांची कामे अपूर्णच आहेत. अनेक वर्षापासून ही स्मारके रखडल्याने त्यांचा खर्चही वाढतच आहे. दिवंगत आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख, हिंदकेसरी मारुती माने, नागनाथआण्णा नायकवडी, बालगंधर्व, स्वातंत्र्यसैनिक पांडू मास्तर, साहित्यीक ग, दी. माडगूळकर यांच्या स्मारकांचा यामध्ये समावेश आहे. केवळ कुंडल येथील क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्मारकांची कामे मात्र पूर्ण झाली आहेत.
sangli samrak news : कोट्यवधींचा खर्च तरीही स्मारकांची कामे अपूर्णच
आर. आर., हिंदकेसरी, बालगंधर्व, माडगूळकरांचे स्मारक निधीच्या प्रतिक्षेत ः वाढीव निधींची मागणी ः शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ
तासगाव तालुक्यातील अंजनीचे सुपूत्र असलेल्या दिवंगत आर. आर. पाटील यांनी जिल्हापरिषद सदस्य ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, डान्सबार बंदी यामुळे आबांची राज्यभरात वेगळी छबी निर्माण झाली. त्यांच्या मृत्युनंतर सांगलीत त्यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. आतापर्यंत त्यांच्या स्मारकांवर 9 कोटी 57 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. परंतू स्मारक अपूर्णच आहे. स्मारकांसाठी 13 लाख 15 हजार रुपयांचा निधी शासनाकडून येणे आहे. त्यापूर्वीच आणखी 10 कोटी 60 लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग मिरजकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.
कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाचीही अशीच अवस्था आहे.
स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील कामांवर मंंजूर 4 कोटी 90 लाख रुपयांपैकी 4 कोटी 9 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. उर्वरित 59 लाखा 75 हजारांचा निधी शासनाकडून मिळालेला नाही. असे असताना स्मारकाच्या दुसर्या टप्प्यासाठी तब्बल 14 कोटी 98 रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव 8 ऑगष्ट 2024 रोजी क्रिडा विभागाच्या आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. परंतू या प्रस्तावास अद्याप मान्यता मिळालेली नसल्याने स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारकही अनेक वर्षापासून रखडले आहे. बालगंधर्वांच्या स्मारकांवर आतापर्यंत 3 कोटी 9 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, केवळ 36 लाखांच्या निधीअभावी स्मारकाचे काम अपूर्ण आहे.
येडेनिपाणी (ता. वाळवा) येथे कै. स्वातंत्र्यसैनिक पांडू मास्तर यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे.
यासाठी 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सर्व निधी खर्च करण्यात आला आहे, तरीही स्मारकाच्या दुसर्या टप्प्यातील कामांसाठी आणखी 2 कोटी 72 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करुन तो मंजूरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यालाही आता आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे, परंतू या प्रस्तावास मान्याता मिळालेली नसल्याचे सांगण्यात आले. ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकांसाठी 13 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 11 कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित 1 कोटी 91 लाख रुपयांचा निधी शासनाकडून मिळालेला नाही, त्यामुळे या थोर साहित्यीकांच्या स्मारकाचे काम रखडले आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा विधानपरिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांच्या कोकरुड (ता. शिराळा) येथिल स्मारकासाठी 21 कोटी 01 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्तावास प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. परंतू निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. वाळवा येथील क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या दुसर्या टप्प्यासाठी 10 कोटी 46 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. त्यापैकी 8 कोटी 68 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. अजून 1 कोटी 62 लाख रुपयांचा निधी येणे बाकी आहे. त्यामुळे स्मारक पूर्ण होऊ शकलेले नाही. वर्षानवर्षे या स्मारकांची कामे रखडली आहेत. त्यामुळे निधीचा मोठा अपव्यय होतो आहे. कामांचा खर्चही वाढतो आहे. पण याकडे कोणीही गांभिर्याने पाहण्यास तयार नाही. परिणामी स्मारकांच्या कामांवर पाण्यासारखा पैसा खर्च होऊनही स्मारके अपूर्णच आहेत.
जी. डी. बापू अन् नाना पाटील यांची स्मारके पूर्ण
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड व क्रांतीसिंह नाना पाटील यांची स्मारके मात्र पूर्ण झाली आहेत. बापूंच्या स्मारकासाठी 4 कोटी 95 लाख 86 हजारांचा तर क्रांतीसिंहाच्या स्मारकांसाठी 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. दरम्यान शिराळा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्फूर्तीस्थळ विकसीत करण्यात येणार आहे. त्यास प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. 13 कोटी 46 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



