जनप्रवास । प्रतिनिधी
सांगली ः सांगली शहरासह जिल्ह्यात 24 वे तिर्थंकर भगवान महावीर यांच्या 2623 व्या जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. सर्वत्र भगवान महावीरांचा जयघोष करण्यात आला. सांगलीत सकल जैन समाजाच्यावतीने शोभा यात्रा काढण्यात आली. एकत्रित शोभा यात्रेचे हे 36 वे वर्ष आहे. यामध्ये दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी यासह सर्व पंथाच्या जैन धर्मियांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
SANGLI : शहरात भगवान महावीरांचा जयघोष…
सकल जैन समाजाची भव्य शोभायात्रा
आमराई येथून सकाळी शोभायात्रा सुरु झाली. या शोभा यात्रेत चित्ररथ घोडे, चांदीचे रथ आकर्षक सजावटीनी सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, पंचमेरु याचा समावेश होता. या शोभा यात्रेत मोठ्या संख्येने युवक, महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग मधील विदयार्थ्यांनी सोवळे परिधान करुन भगवान महावीर यांच्या जयघोषात पालखी खांद्यावरुन वाहीली. जैन महिलाश्रमच्या विद्यार्थिनी फेटे बाधुन झांजपथकासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवत होते. जैन मंदिरात सकाळपासून दुग्धाभिषेक, पुजा अर्चा आदी कार्यक्रम झाले.
मिरवणुकीत दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, अध्यक्ष रावसाहेब जि. पाटील, महामंत्री डॉ. अजित पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, प्रशांत पाटील, जैन बोर्डिंगचे अध्यक्ष प्रा. राहूल चौगुले, सचिव अॅड. मदन पाटील, सहसचिव सदिप हिगणे, जैन श्वेताबर देहरासर मदिर उपाध्यक्ष जतीन शहा, सेक्रेटरी रोहन मेहता, तेरापंथी जैन समाजाचे राजेंद्र घोडावत, शांतिनाथ नंदगांवे, प्रमोद पाटील, जैन सोशल ग्रुपचे सुशांत शाह, संकेश्वर पार्श्वनाथ ट्रस्ट जयेश जैन, अभय जैन, तेजपाल शहा, श्रीमती कळत्रेआक्का जैन महिलाश्रमचे चेअरमन श्रीमती अनिता पाटील, सेक्रेटरी श्रीमती छाया कुंभोजकर, महिला परिषद पदाधिकारी, शहरातील सर्व जैन मंदिरचे ट्रस्टी, सदस्य उपस्थित होते.
250 जणांचे रक्तदान
जैन कच्छी भवन येथील रक्तदान शिबिरासाठी सिध्दीविनायक रक्तपेढी यानी मदत केली.
तसेच सिव्हील हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, रिमांडहोम येथे अन्नदान, फळवाटप आणि औषध दान करण्यात आले. शहरातील जैन मदिरामध्ये भक्तीसंध्या आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमिझरा पार्श्वनाथ देहरासर ट्रस्ट व जैन सोशल ग्रुप यांनी कच्छी जैन भवन येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 250 हून अधिक जणांनी रक्तदान केले. यामध्ये अनेक श्रावकांनी सहभाग नोंदवला.
सकल जैन समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभा यात्रेमध्ये मिरवणुकीमध्ये खासदार संजयकाका पाटील, विशाल पाटील, दिग्वीजय सुर्यवंशी, पृथ्वीराज पाटील, विशाल चौगुले तसेच सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली.
मिरजेत भगवान महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक उत्साहात
मिरजेत भगवान महावीर जन्म कल्यानक निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जैन समाज बांधव हजारोंच्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघाली. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे मिरवणुकीचा समारोप झाला. भगवान महावीर जयंतीनिमित्त शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे तीन दिवस विविध संस्कृती व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी सकाळी भगवान महावीर जन्म कल्यानक निमित्ताने शहरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीत पालखी, घोडे, हत्ती, रथ, वाद्यपथके, लहान मुलांची लेझीम पथक यांचा समावेश होता. पारंपारिक वेशभूषेत केसरी आणि पांढरे वस्त्र परिधान करुन श्रावक आणि श्रावीकांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला. पाटील हौद, पाठक हॉस्पिटल, हिंदमाता चौक, दत्त चौक, तांदूळ मार्केट, महाराणा प्रताप चौक, किसान चौक, सराफकट्टा, होळी कट्टा या मार्गांवरुन शांतिनाथ दिगंबर जैन मंदिराजवळ मिरवणूकीचा समारोप झाला.
पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
मिरवणूक मार्गावर समाज बांधवांना पद्मावती शांतीसेवा फौंडेशनतर्फे मठ्ठा वाटप तसेच मिरज कॅन्सर फौंडेशन व शौर्य लॅबोरेटरीतर्फे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. दुपारी मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. सायंकाळी जन्मकल्यानक पाळणा कार्यक्रम झाला. यावेळी महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या ठीकाणी तीन दिवस झालेल्या धावने, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, वक्तृत्व, गायन, प्रश्न मंजुशा, चित्रकला, रांगोळी या स्पर्धेत विद्यार्थी विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. मिरवणूक आणि येथे झालेल्या कार्यक्रमांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, काँग्रेसचे नेते विशाल पाटील, खासदार संजयकाका पाटील, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, माजी नगरसेवक निरंजन आवटी, पांडुरंग कोरे, गजेंद्र कुल्लोळी यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. मिरजेतील समस्त जैन समाजातर्फे या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले होते..

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



