जनप्रवास । सांगली
sangli vidhansabha congress news : प्रत्येकवेळी दादा घराण्याचा बळी का?: प्रतिक पाटील जयश्रीताई पाटील लढणारच.. 28 ला शक्तीप्रदर्शनासह अर्ज : पक्ष जीवंत ठेवण्याचे काम नेता नव्हे तर कार्यकर्ते करत असतात. दादा घराण्याने अनेक वर्षे काँग्रेससाठी काम केले आहे. विशाल पाटील खासदार झाल्यानंतर दुसर्या दिवशी त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांचा दावा असताना त्या थांबल्या. आता उमेदवारीला संघर्ष करावा लागत आहे. प्रत्येक निवडणुकीत दादा घराण्याचा बळी का? असा सवाल करत यावेळी जयश्रीताई पाटील यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी केले. तर जयश्रीताई पाटील यांचा अर्ज दि. 28 ला शक्तीप्रदर्शनासह भरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
sangli vidhansabha congress news : प्रत्येकवेळी दादा घराण्याचा बळी का?: प्रतिक पाटील जयश्रीताई पाटील लढणारच.. 28 ला शक्तीप्रदर्शनासह अर्ज
स्व. वसंतदादा पाटील व स्व. मदनभाऊ पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येथील काँग्रेस कमिटीमध्ये पार पडला. या मेळाव्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील बोलत होते. मेळाव्याला जयश्रीताई पाटील, प्रा. सिकंदर जमादार, बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, माजी महापौर किशोर शहा, कांचन कांबळे, सुभाष खोत, माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, पी. एल. रजपूत आदी उपस्थित होते.
प्रतिक पाटील म्हणाले, स्व. मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी मिळणे आवश्यक होते. मात्र पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तरी देखील जयश्रीताई पाटील व दादा घराण्याने त्यांना पाठिंबा दिला. प्रचारात सक्रीय सहभाग घेतला. थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला. गेल्यावेळी आम्ही पाठीशी राहतो, यावेळी त्यांनी रहावे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात एकही महिलेला उमेदवारी मिळालेली नाही. महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी देणे आवश्यक आहे.
आपले विरोधक पृथ्वीराज पाटील नाहीत. तर भाजपचा आपल्याला पराभव करायचा आहे. हक्काचा आमदार झाला पाहिजे. त्यासाठी जयश्रीताई पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन प्रतिक पाटील यांनी केले. शिवाय दादा घराण्याने अनेक संस्थांचे जाळे निर्माण करून तरूणांना काम दिले आहे. स्थानिक आमदारांनी तरूणांसाठी काय केले? शेतकरी बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी स्व.मदनभाऊ पाटील यांनी प्रयत्न केले. बँक ही कर्जदारांनी बुडवली आहे. ते लोक सध्या भाजपमध्ये असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
गेल्यावेळी थांबलो आता लढणारच: जयश्रीताई पाटील
गेल्या विधानसभा निवडणुकीत थांबलो होतो. पण या निवडणुकीत थांबणार नाही. त्यांनी आता थांबावे. मला कार्यकर्त्यांचे बळ मिळत आहे. लढण्यासाठी ऊर्जा निर्माण होत आहे. महिला म्हणून मला संधी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे. माझा लढण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे, असे आवाहन जयश्रीताई पाटील यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, महिला आमदार आजपर्यंत झाल्या नाहीत. महिलांचे प्रश्न अधिक आहेत. ते प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. मदनभाऊंच्या निवडणुकीच्या काळात बचत गटातील महिलांचा संपर्क आला होता. त्यांच्यासाठी काम केले होते. त्यामुळे महिला साथ देतील.
सुभाष खोत म्हणाले, भाजपला हद्दपार करायचे आहे. ही निवडणूक सोप्यात घेऊ नये. जयश्रीताई पाटील यांचा विजय हीच खरी मदनभाऊंना श्रध्दांजली ठरणार आहे. पृथ्वीराज पाटील यांना शहर जिल्हाध्यक्षपद दादा घराण्यामुळेच मिळाले आहे. त्यांना सर्व मदनभाऊ पाटील कार्यकर्त्यांची विनंती आहे की, त्यांनी या निवडणुकीत मन मोठे करून जयश्रीताई पाटील यांच्यासाठी काम करावे. दादा घराण्यासाठी त्यांनी त्याग करावा. बंडखोरी ही दादा घराण्याच्या पाचवीला पुजलेली असल्याचे देखील ते म्हणाले.
संतोष पाटील म्हणाले, सोमवारी जयश्रीताई पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरायचा आहे. सकाळी गणपती मंदिरापासून रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यावरून येथील काँग्रेस कमिटीसमोर रॅली येईल. तेथून पाच जण जाऊन उमेदवारी अर्ज भरतील. त्यानंतर मेळावा होणार आहे. या मेळाव्यातून विजयाची ताकद दाखवून देऊ, असे आवाहन त्यांनी केले. तर अपंग व जेष्ठ मतदारांचे अर्ज भरून द्यावेेत. बूथ कमिट्या सक्षम कराव्यात, असे आवाहन केले.
अजित सूर्यवंशी म्हणाले, 2004 च्या निवडणुकीसारखी ही निवडून लढायची आहे. ‘अब की बार महिला आमदार’ हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. शेवंता वाघमारे यांनी जयश्रीताई पाटील यांनी अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक घडवले आहेत. त्या हुशार आहेत. त्यामुळे आता त्यांना आमदारकीची संधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी काम करू. कय्युम पटवेगार यांनी गेल्या निवडणुकीत दिलेला शब्द पृथ्वीराज पाटील यांनी पाळावा, असे आवाहन केले.
बैठकीला माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी नगरसेवक प्रकाश मुळके, दिलीप पाटील, करण जामदार, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, मृणाल पाटील, दिलीप पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रविण पाटील, अनिल डुबल, अमित पारेकर, विनायक रूपनर, मदनभाऊ युवा मंचचे आनंद लेंगरे, शीतल लोंढे, अजित ढोले आदी उपस्थित होते.
लोकसभेला पृथ्वीराज पाटील कुठे होते?
लोकसभेला विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. ते अपक्ष लढले. त्यावेळी जयश्रीताई पाटील या पहिल्या व्यासपीठावर आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील कुठे होते? असा सवाल प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला.
जयश्रीताईंसाठी आ. विश्वजीत कदम प्रयत्न करतील…
लोकसभा निवडणुकीत खा. विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही. पण निवडून आल्यानंतर लगेच त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आ. विश्वजीत कदम यांनी स्वत: मेहनत करून जयश्रीताईंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करावेत. त्यांच्यासाठी ही गोष्ट अवघड नसल्याचे प्रतिक पाटील यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



