rajkiyalive

sangli vidhansabha election news : सांगलीतून पुन्हा सुधीर गाडगीळच: मिरजेतून ना. खाडेंची उमेदवारी कायम

जनप्रवास । सांगली

sangli vidhansabha election news : सांगलीतून पुन्हा सुधीर गाडगीळच: मिरजेतून ना. खाडेंची उमेदवारी कायम : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत मिरजेतून पालकमंत्री सुरेश खाडे यांना चौथ्यांदा तर सांगलीतून आ. सुधीर गाडगीळ यांना तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. पहिल्या यादीतच सांगली जिल्ह्यातील दोन विद्यमान आमदारांना स्थान मिळाले आहे.

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. महायुतीमध्ये अद्याप जागा वाटप अंतिम झाले नाही. काही जागांवर महायुतीमधील पक्षांचे घोडे अडले आहे. यावर चर्चा सुरू आहे. पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राज्यातील 99 उमेदवारांची यादी रविवारी जाहीर केली. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील भाजपच्या दोन उमेदवारांची नावे अपेक्षेप्रमाणे आली आहेत.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे एका निवेदनाव्दारे जाहीर केले होते. त्यांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला होता. निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती. आ. गाडगीळ यांनी यावर फेरविचार करू, असे देखील स्पष्ट केले होते. या काळात भाजपकडून युवा नेते पृथ्वीराज पवार, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, स्वाती शिंदे आदी इच्छुकांनी विधानसभा मतदारसंघात पेरणी सुरू करत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश नेत्यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये देखील आ. सुधीर गाडगीळ यांचेच नाव आले होते. गेल्या दहा वर्षात त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. गेले दोन दिवस कार्यकर्त्यांचे भाजपच्या पहिल्या यादीकडे लक्ष लागले होते. पहिल्या यादीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्यावरच पक्षाने विश्वास दाखवत तिसर्‍यांचा उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आ. सुधीर गाडगीळ समर्थकांनी कार्यालयासमोर जल्लोष केला. पृथ्वीराज पवार व गौतम पवार यांनी दादांचा सत्कार केला.

तर दुसरीकडे पहिल्या यादीमध्ये सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना मिरज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या विरोधात त्यांचे स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांनी उमेदवारी मागितली होती. पण वनखंडे यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. मिरजेतून ना. खाडे एकमेव इच्छूक होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी देखील पक्षाने जाहीर केली आहे. ते चौथ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

पक्ष आदेश मानून निवडणूक लढवणार: सुधीर गाडगीळ

विधानसभा लढविण्याची माझी इच्छा नव्हती, दहा वर्षे होत आहेत. नवीन पिढीला संधी द्यावी, असे पक्षाला देखील सांगितले होते. प्रदेशकडून या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आता इच्छा नसताना पण उमेदवारी दिली आहे. पण भाजपमध्ये पक्ष आदेश मानावा लागतो. माझी उमेदवारी जाहीर केली, पक्ष आदेश मान्य करून कामाला लागलो आहे. मी पुन्हा तिसर्‍यांदा निवडणूक लढवणार आणि हॅट्ट्रिक करणार आहे. शहराच्या विकासासाठी पुन्हा जोमाने करू. भाजपमधील काही इच्छूक आहेत. उमेदवारी मला जाहीर झाल्याने पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांशी मी प्रत्यक्ष जाऊन भेटणार आहे. आम्ही दहा वर्षे चांगले काम करत आहोत, कोणीही नाराज होणार नाही, असा विश्वास आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केला.

चौथ्यांदा विजयी होणार: ना. सुरेश खाडे

भारतीय जनता पार्टीने मिरज विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास साथ करू. चौथ्यांदा ही निवडणूक जिंकू. गेल्या पंधरा वर्षात मिरज विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात विकासकामे केली आहेत. पक्षाची ध्येय धारणे तळागाळापर्यंत पोहोचविली आहेत. तसेच कार्यकर्त्यांना दिलेेले बळ यामुळेच पक्षाने माझ्या नावाचा विचार केला आहे. महायुती सरकारने राबविलेल्या योजनांचा देखील गोरगरिबांना फायदा केला आहे. जनता आता आमच्यावर विश्वास टाकून पुन्हा महायुतीचे सरकार आणण्यास मदत करेल, असा विश्वास डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज