sangli vidhansabha news : सांगलीत भाजप व काँग्रेसची मते फुटली, निकालाकडे लक्ष : सांगली विधानसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व अपक्षामध्ये टफफाईट झाली. काँग्रेस व अपक्ष उमेदवाराने भाजपबरोबर काँग्रेसच्या मतांवर मोठे डाव टाकले. अनेक ठिकाणी भाजपच्या बालेकिल्ल्यातील मते फोडली आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस व अपक्ष या दोघांनी देखील काँग्रेसची पारंपारिक मते आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ‘फिक्स आमदार’ कोण? हे सांगणे कठीण झाले आहे.
sangli vidhansabha news : सांगलीत भाजप व काँग्रेसची मते फुटली, निकालाकडे लक्ष
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ तिसर्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. तर काँग्रेसकडून पुन्हा शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांना खा. विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. तिरंगी असल्याने निवडणूक चुरशीने झाली. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सरासरी सहा टक्के अधिक मतदान झाले आहे. या वाढलेला टक्के कोणाला तारणार आणि कोणाला मारणार? याची चर्चा आता सुरू झाली आहे. पण तिन्ही उमेदवारांनी पारंपारिक मतदारांवर डाव टाकला असल्याचे चित्र आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील माधवनगर, अंकली, हरिपूर, बामणोली या गावांचा कल भाजपच्या बाजुने अधिक असतो.
तर दुसरीकडे शहरी भागातील कुपवाड, विश्रामबाग परिसर, धामणी रोड, गव्हर्मेंट कॉलनी, नेमीनाथनगर, रतनशीनगर, गावभाग, जामवाडीसह अनेक शहरी भाग देखील भाजपला साथ देतात, असे चित्र गेल्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीत पहायला मिळाले आहे. तर काँग्रेसला इनामधामणी, कर्नाळ, नांद्रे, नावरसवाडी, बुधगाव, कावजी खोतवाडी, बिसूर, पद्माळे या गावांबरोबर शहरी भागातील खणभाग, नळभाग, शंभरफुटी परिसर, संजयनगर, कारखाना परिसर, नवीन वसाहत, सिध्दार्थ परिसर, गवळी गल्ली यासह मुस्लिम व मागासवर्गीय मतदार काँग्रेसची व्होटबँक आहे.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा बालेकिल्ल्यावर भर देत भाजपमधील काही भागांवर डाव टाकला होता.
त्या दृष्टीने अनेक ठिकाणी फिल्डिंग देखील लावल्या होत्या. काही नाराजांवर गळ टाकला होता. अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी देखील हाच पॅटर्न राबविला आहे. पण या दोघांनी काँग्रेसच्या बालेकिल्यावरच जास्त जोर दिल्याचे दिसून आले होते. यामध्ये काँग्रेसला मतविभागणीचा फटका बसेल का? अशी शक्यता देखील वर्तविली जात आहे. शिवाय मतांची आणखी जुळणी भाजपची मते घेण्याचा प्रयत्न दोघांनी केला. यात भाजपची मते फुटतील का? काँग्रेस उमेदवाराला कितपत यश येणार? यावर देखील चर्चा सुरू आहे.
तर भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी बालेकिल्ला असलेले भाग सुरक्षित ठेवण्यासाठी आखणी केली होती.
शिवाय यावेळी लाडकी बहिण व ग्रामीण भागात शेतीसाठी मोफत वीज या योजनेची जाहिरात करून काँग्रेसची मते वळविण्याचा प्रयत्न केला असल्याचे चित्र आहे. हिंदूत्ववादी मतावर देखील त्यांचा भर या निवडणुकीत होता. त्यामुळे या निवडणुकीत आ. सुधीर गाडगीळ यांना सर्व जुळून येणार का? भाजपमधील नाराजांचा परिणाम काय होईल. यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. आ. सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील व जयश्री पाटील यांनी सर्व राजकीय डाव टाकले आहेत. यामध्ये कोणाला यश येणार हे शनिवारी निकालावरूनच समजणार आहे.
2019 च्या निवडणुकीत कशी होती स्थिती?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ व काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या थेट दुरंगी लढत झाली होती. आ. सुधीर गाडगीळ यांना 93 हजार 636 मते पडली होती. त्यांना एकूण मताच्या 50 टक्के मते पडली होती. तर पृथ्वीराज पाटील यांना 86 हजार 697 मते म्हणजे एकूण मतांच्या 46.5 टक्के मते मिळाली होती. आ. गाडगीळ हे 6 हजार 939 मतांनी निवडून आले होते. त्यांना शहरी भागात कुपवाड, गर्व्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग परिसर, गावभाग, गवळी गल्ली परिसरात आ. गाडगीळ यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.
उमेदवार प्रतिनिधींकडून आकड्यांची जुळवाजुळव
सांगली विधानसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. या तिन्ही उमेदवारांचे वेगवेगळ्या मतदार संघात प्राबल्य आहे. त्यामुळे सांगली शहरात अशी परिस्थिती आहे की कोणत्या प्रभागात कोणाचा वरचष्मा असणार? यामुळे बूथनिहाय झालेले मतदान व त्यावर आकड्यांची जुळवाजुळव तिन्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी सुरू केली आहे. तिन्ही उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी विजयाचा दावा केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.