जिल्ह्यात 25 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क चला मतदान करु या.., 2 हजार 482 मतदान केंद्र सज्ज
महाराष्ट्र विधानसभेसाठी रविवार 20 नोव्हेंबर रोजी मतदात होत आहे. सांगली जिल्ह्यात आठ मतदार संघ असून, सर्वाधिक सांगली विधानसभेत मतदार असून, सर्वात कमी इस्लामपूर मतदार संघात आहेत. सांगलीतत 3 लाख 56 हजार 410 मतदार असून, इस्लामपुरात 2 लाख 80 हजार 856 मतदार आहेत.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी गेली दीड महिने विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यात 25 लाख 36 हजार 65 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न मतदानासाठी सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील 2 हजार 482 मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आठ मतदारसंघात 13 हजार 650 अधिकारी, कर्मचारी आहेत. चला मदान करु या…. असे आवाहन प्रशासकीय स्तरावर तसेच खासगी संस्थांनी, आस्थापनांनी आवाहन केले आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. या अनुषंगाने स्वीप मतदार जनजागृती अभियानाच्या अंतर्गत जनजागृती, विद्यार्थी रॅली, बाईक रॅली, तसेच वरिष्ट अधिकारी मतदारांशी संवाद साधण्यात आला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्यासह सर्वच प्रशासकीय अधिकारी थेट मतदारांपर्यंत पोहोचले असून चला मतदान करु या, असा संदेश अधिकार्यांनी दिला आहे.
जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघात 25 लाख 36 हजार 65 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 12 लाख 82 हजार 276 असून, महिला मतदार 12 लाख 53 हजार 639 आहेत. यामध्ये तृतीयपंथीय मतदारांची संख्या 150 आहे. मतदानासाठी 2 हजार 482 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक निवडणूक अधिकारी, दोन सहायक अधिकारी, एक कर्मचारी व एक शिपाई असे पाच कर्मचारी नियुक्त आहेत. जिल्ह्यातील 2 हजार 482 मतदान केंद्रांवर 12 हजार 410 अधिकारी, 1240 कर्मचारी आरक्षित, असा एकूण 13 हजार 650 अधिकारी, कर्मचारी वर्ग नियुक्त केला आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्रावर एक बॅलेट युनिट, एक कंट्रोल युनिट आणि एक व्हीव्हीपॅट देण्यात आले आहे. एकूण 2 हजार 482 मतदान केंद्रांसाठी 2790 बॅलेट युनिट्स, 2482 कंट्रोल युनिट्स आणि 2482 व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर 549 बॅलेट युनिट्स, 482 कंट्रोल युनिट्स आणि 706 व्हीव्हीपॅट राखीव ठेवण्यात आले आहेत.
मतदान माहिती चिठ्ठी वाटप पूर्ण
मतदारांना संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत मतदान माहिती चिठ्ठी (व्होटर स्लिप) वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. ज्या मतदारांना मतदान माहिती चिठ्ठी प्राप्त झालेली नाही. त्यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मतदान माहिती चिड्डी प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.
सांगलीत सर्वाधिक 315 मतदान केंद्र
सांगली विधानसभा मतदारसंघात एकूण 315 मतदान केंद्रे असून 3 लाख 56 हजार 410 इतके मतदार आहेत. मतदारांनी मतदान माहिती चिठ्ठी प्राप्त करून घ्यावी. ज्यांना ही चिठ्ठी मिळाली नाही, त्यांना मतदानादिवशी म्हणजे दि. 20 नोव्हेंबररोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्राबाहेर असलेल्या बीएलओकडून मतदान माहिती चिठ्ठी घेता येणार आहे.
मतदान केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश
जिल्ह्यात विधानसभेसाठी बुधवारी मतदान होत आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. आदेशात म्हटले आहे, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यास मनाई केली आहे.
आठ विधानसभा मतदारसंघातील मतदार
मिरज 171646 172198 32 3,43,876
सांगली 177693 178642 75 3,56,410
इस्लामपूर 141698 139152 6 2,80,856
शिराळा 156140 150869 3 3,07,012
पलूस/कडेगाव 146072 146786 8 2,92,866
खानापूर 177542 173435 19 3,50,996
तासगाव/क. महांकाळ 159076 153606 4 3,12,686
जत 152409 138951 3 2,91,363

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



