rajkiyalive

SANGLI : विश्वजीत किंगमेकर: भाजपाला नाराजीचा फटका

जनप्रवास । सांगली

SANGLI : विश्वजीत किंगमेकर: भाजपाला नाराजीचा फटका : सांगली लोकसभा मतदारसंघात ‘विशालपर्व’मुळे काँग्रेसला दहा वर्षांनी पुन्हा विजय मिळाला. तर खा. संजयकाका पाटील यांच्या विरोधात असलेल्या नाराजीमुळे भाजपचा अंत झाला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा भाजपकडून हिसकावून घेतला. राजकीय श्रेयवादात अडकलेल्या या निवडणुकीत आ. विश्वजीत कदम हे किंगमेकर ठरले.

SANGLI : विश्वजीत किंगमेकर: भाजपाला नाराजीचा फटका

‘विशालपर्व’ने काँग्रेसचा विजय तर भाजपचा अंत

सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 2014 लोकसभेच्या निवडणुकीतच्या मोदी लाटेत काँग्रेसचे किल्ला ढासळला. संजयकाका पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून पुन्हा खा. संजयकाका पाटील रिंगणात होते.

काँग्रेसची ही जागा स्वाभिमानी विकास आघाडीला देण्यात आली.

त्यामुळे विशाल पाटील यांनी स्वाभिमानी विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढवली. तर वंचित आघाडीकडून आ. गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली. लोकसभेची निवडणूक तिरंगली झाली. यामध्ये खा. संजयकाका पाटील विजयी झाले.

लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद घटत गेली, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसला अधोगती लागली. भाजपला अच्छे दिन सुरू झाले. लोकसभेच्या 2014 व 2019 च्या निवडणुकीत झालेला पराभव दादा घराण्याच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे विशाल पाटील यांनी 2024 ची निवडणूक ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी त्यांनी 2020 पासूनच सुरू केली होती.

मात्र उमेदवारी वाटपावरून पुन्हा महाविकास आघाडीत वाद निर्माण झाला. शिवसेना (उबाठा) गटाने या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची परस्पर उमेदवारी जाहीर झाली. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या दोन सभा देखील झाल्या. अंतिम क्षणी अर्ज दाखल करूपर्यंत काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी संघर्ष केला. मात्र त्यांना यश आले नाही.

आ. विश्वजीत कदमांनी त्यांना पाठबळ दिले.

अखेर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. आ. विश्वजीत कदमांनी त्यांना पाठबळ दिले. तर दुसरीकडे संजयकाका पाटील तिसर्‍यांदा हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज होते. मात्र भाजपमध्ये संजयकाका पाटील यांच्याबद्दल नाराजी होती. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी संजयकाकांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. तरी देखील उमेदवारी मिळाली.

माजी आमदार विलासराव जगपात यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट विशाल पाटील यांच्या प्रचारात उतरले. तर शिवसेना (उबाठा) गटाचे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विशाल पाटील यांना उघड पाठिंबा दिला. तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी छुप्या पध्दतीने विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे विशाल पाटील यांचे पारडे जड झाले.

निवडणुकीच्या पहिल्या दिवसांपासून विशाल पाटील यांच्या प्रचारात काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रीय झाले. भाजपचा नाराज गट देखील विशाल पाटील यांच्या प्रचारात छुपा पध्दतीने दिसून आले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काही स्थानिक नेते, कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांच्याबरोबर होते. आ. विश्वजीत कदमांनी थेट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विशाल पाटील यांच्या प्रचारात राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे विशाल पाटील यांच्या प्रचाराचे वारे सांगलीपासून जतपर्यंत चांगलेच घुमले होते.

प्रचारात संजयकाका पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर टीम सक्रीय केली होती.

मात्र भाजप अंतर्गत असलेली नाराजी त्यांना भोवली आणि विशाल पाटील यांचा लाखाहून अधिक मतांनी विजय झाला. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचा भाजपने हिसकावून घेतलेला गड विशाल पाटील यांनी खेचून आणला. पुन्हा सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा केला. याची सर्व सूत्रे आ. विश्वजीत कदम यांनी हालवली.

काकांना दहा वर्षे डोक्यावर घेतले पण आता खेचले…

सांगली लोकसभेची उमेदवारी ही सतत वसंतदादा घराण्यातच असते. त्यामुळे वसंतदादा घराण्यावर टीका होऊ लागली. दादा घराणे कर्तृत्व काय? हा प्रचार देखील 2014 च्या निवडणुकीत झाला. त्यामध्ये असलेल्या मोदी लाटेमध्ये सांगलीच्या जनतेने संजयकाकांना डोक्यावर घेतले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी केले. 2019 च्या निवडणुकीत देखील काकांना साथ दिली. पण जनतेचा संपर्क कमी झाला, भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात घेतलेली भूमीका संजयकाका पाटील यांना अंगलट आली. जनतेने काकांना दोनवेळा डोक्यावर घेतले. पण या निवडणुकीत खाली खेचले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज