rajkiyalive

सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही,

विशाल पाटील यांचा इशारा : सांगलीत जोरदार शक्तीप्रदर्शन

जनप्रवास । सांगली
सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही, वसंतदादा घराण्याचे काँग्रेसवर प्रेम आहे. मी केलेले बंड हे काँग्रेसविरोधात नसून काँग्रेसचेच आहे. शिवाय सांगलीची परंपरा बंडाची आहे. सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही, महाविकास आघाडीने माघार घ्यावी आणि दि. 19 तारखेपूर्वी काँग्रेसचा एबी फॉर्म द्यावा तरच वसंतदादांच्या विचाराची लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील, असा इशारा काँग्रेसचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी दिला. तर बंडखोरीबाबत न्यूनगंड मनात नको. दिल्लीपेक्षा सांगलीत भाजपचे मोठे संकट आहे. त्यामुळे सांगलीतून भाजप संपली पाहिजे, यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.

सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही,

काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटील यांनी अर्ज दाखल केला. तर शक्तीप्रदर्शन करत येथील काँग्रेस कमिटी समोरील चौकात जाहीर सभा घेतली. या सभेत ते बोलत होते. सभेला माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री प्रतीक पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, शैलजा पाटील, पूजा पाटील, मनिषा रोटे आदी उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले, वसंतदादा घराण्याचे काँग्रेसवर प्रचंड प्रेम होते.

काँग्रेस विरोधात जात असताना आमच्या भावना होत नाही. मी देखील 25 वर्षांपासून काँग्रेसचे काम करत आहे. मलाही वाटले आपण जनतेची सेवा करायची, मी देखील अनेकवेळा उमेदवारी मागितली. मला पण काम करण्याची इच्छा होती. 2002 घराणेशाही होईल म्हणून मला थांबविण्यात आले. मग दादा घराण्यात जन्माला आलो माझी काय चूक झाली. 2005 साली प्रकाशबापूंचे निधन झाले. त्यावेळी मला उमेदवारी मिळेल, असे वाटले, पण प्रतिक पाटील यांना उमेदवारी दिली, आणि पुन्हा थांबलो. 2019 ला उमेदवारी मागितली. पण पक्षाने ही जागा स्वाभिमानीला सोडली.

पक्षावर एकतर्फी प्रेम करत असल्याने उभारलो आणि पराभव झाला.

पण पुन्हा पाच वर्षे काम करत राहिलो. कोरोना, महापूर काळात काम केले. त्यावेळी खासदार कुठे होते? कोण तर वाळू सापडते का आणि कोणाला तरी प्लॉट मिळतात का? याकडे बघत होते. पण आम्ही निस्वार्थीपणे जनतेची सेवा केली. सॅनिटायझरची निर्मिती करून मतदारसंघात मोफत वाटले. अवकाळी पाऊस असो किंवा दुष्काळ या काळात काम करत राहिलो. लोकांच्या सुखात व दुखात आम्ही आलो पण आता वातावरण चांगले होऊ लागल्यावर राजकारणात लोक आडवे पडू लागले. डाव टाकू लागले, बैठका होऊ लागल्या. जिल्ह्यातील 38 हजार लोकांना विचारले. विशाल पाटील यांनी काय केले पाहिजे. 37 हजार 992 जणांनी सांगितले, दादा अर्ज भरा तर 36 हजार 810 लोकांनी सांगितले दादा अपक्ष लढा.

काँगे्रेसवर आमचे एकतर्फी प्रेम असल्याचे दिसून आले.

‘कितने करलो सितम, हस हसके सहेगें हम’ अशी आमची परिस्थिती झाली. सांगलीकरांचे चिन्ह नेऊ पाहत आहेत. त्यामुळे हे बंड काँग्रेसचेच आहे. बंडाने अनेकांची सुरूवात होते. बाळासाहेब थोरात आठवेळा निवडून आले पहिल्यांदा अपक्ष आले. मदनभाऊ अपक्ष आले. अजितराव घोरपडे देखील सरकार निवडून आले. दादांनी बंड केला नसता तर असेल कार्यक्रम घेता आले नसते. बंड ही चांगलीची परंपरा आहे. सांगलीच्या रक्तात बंड आहे. यशस्वी करण्याची जबाबदारी तुमची आहे. सर्वांनी साथ द्यावे, असे आवाहन केले.

माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, सांगलीत हेच घडणार माहिती होते.

मुंबईतील माहिती घरात बसून मिळत होती. ‘धोका देने वालोंको मोका नही देना चाहिए’, ‘मौत चलेगी, अपमान नही चलेगा’. ‘दुश्मनी चलेगी लेकीन गद्दारी नही चलेगी’, असे सांगत ते म्हणाले, भाजपने अधिकाराचा गैरवापर करून त्रास दिला आहे. दिल्लीपेक्षा सांगलीत मोठे संकट आहे. त्यामुळे सांगलीतून भाजप पहिल्यांदा संपली पाहिजे. बंडखोरीबाबत न्यनगंड मनात नको, धाडसाने कामाला लागावे, ही लढाई अस्तित्व टिकविण्यसाठी निवडून येणे गरजेचे आहे. दादा घराणे एकत्र आले आहे. ते येणे गरजेचे होते. युध्द प्रत्येकवेळी होत नसते. जिल्ह्यातील सहकारी चळवळ वाचविण्यासाठी विशाल पाटील यांना साथ देणे आवश्यक आहे. पर्यायी पक्ष सांगलीतून निर्माण करू, या निवडणुकीच्या परिश्रमावर पुढचे शंभर वर्षाचे भविष्य आहे. त्यामुळे कामाला लागावे व इतिहास रचावा, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रहार पाटलांचा बळी नको…

चंद्रहार पाटील हा शेतकर्‍याचा मुलगा आहे. आम्ही खासदार-आमदार झालेले चालत नाही का? असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना विशाल पाटील म्हणाले, शेतकरी मुलाने आमदार-खासदार व्हावे, पण शेतकर्‍याच्या मुलाला फसवून त्याचा बळी दिला गेला नसला पाहिले, असे त्यांनी सांगितले. तर संजय राऊत यांनी सांगलीत गोंधळ घातला. सांगली सुसंस्कृत आहे. त्यामुळे त्यांची भाषा ही न शोभणारी आहे. आम्ही संयम राखतो. वसंतदादांनी शिवसेनेला आवाज दिला, तो आवाज त्याच मतदारांच्या विरोधात जात आहे. पण आम्हाला भान आहे. आमची लढाई भाजपच्या विरोधातील आहे. त्यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा विशाल पाटील यांनी दिला.

दादा-बापू वाद संपला आहे…

वसंतदादांनी आम्हाला सांगितले होते, ज्या दिवशी राजारामबापू पाटील वारले त्या दिवशी दादा-बापू वाद संपला. त्यामुळे तुमच्या मनात काही वाद असेल तर तो तुम्ही संपवावा, आमच्या दृष्टीने वाद संपला असल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

बाळासाहेब ते अंजनीपुत्र सर्व जण पाठीशी…

दादा घराण्यावर अन्याय होत असताना अजितराव घोरपडे, विलासराव जगपात, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांनी उमेदवारीला पाठिंबा दिला. राज्याचे बाळासाहेब देखील पाठिशी आहेत. त्याबरोबर जिल्ह्यातील बाळासाहेबांचे कार्यकर्ते देखील उपस्थित राहून पाठिंबा देत आहेत. खानापूर-आटपाडीची ताकद देखील बरोबर आहे. वसंतदादा घर ज्यावेळी अडचणीत असते, तेव्हा अंजनीपुत्र आमच्या पाठीशी उभा राहतो. अनेकांना फोन येत आहेत. पाठिंबा द्या पण मंचावर उपस्थित राहू नका असे सांगितले जात आहे. पण अनेक जण मंचावर उपस्थित आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज