rajkiyalive

(sangli )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात

(sangli loksabha )काँग्रेसच्या गोटात शांतता, भाजप जोमात

जनप्रवास । अनिल कदम

लोकसभा निवडणूक फेबु्रवारीमध्ये जाहीर होईल. या महासंग्रामास आता उणेपुरे पन्नास दिवस बाकी आहेत. सलग दोन महाविजयानंतर भाजपने सांगली लोकसभा मतदार संघात नियोजनबद्ध व नव्याने बांधणी सुरू केली आहे. भाजप जोरदार तयारी केली जात असताना काँग्रेसमध्ये शांतता असल्याचे चित्र आहे. भाजपमध्ये विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीवरुन चुरस सुरु आहे.

काँग्रेसमध्ये उमेदवारी विशाल पाटील यांना निश्चित मानली जात असली तरी त्यांच्याकडून मात्र विशेष तयारी सुरु असल्याचे दिसत नाही. तिरंगी लढतीची चर्चा असली तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होणार आहे. जिल्ह्यात भाजपविरोधी वातातवरण असल्याने त्याचा फायदा काँग्रेसला मिळू शकतो, परंतु त्यादृष्टीने काँग्रेस आक्रमक होत नसल्याने यहाँ पे सब शांती-शांती है…! असे चित्र लोकसभा मतदारसंघात दिसून येते.

 

लोकसभा निवडणूक सर्वच पक्षांच्यादृष्टीने प्रतिष्ठेची ठरणार आहे.

त्यामुळे अनेकांच्या नजरा सांगलीच्या जागेवर आहेत. सध्या मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातील प्रमुख पक्षांत पडलेल्या उभ्या फुटीनंतर राज्यात होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची ताकद सध्या तरी मोठी आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे बळ आमदार अनिल बाबर यांच्यामुळे अधिक आहे. अशा वेळी बेरीज-वजाबाकीची नवी समीकरणे असतील. सन 2014 चा धक्कादायक पराभव आणि 2019 ला जागा सोडण्याची नामुष्की आलेल्या काँग्रेसने पुढची निवडणूक काट्याची होईल, असा प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र त्यादृष्टीने कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीत.

काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढत संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.

आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजप विरोधी असलेल्या पक्षांची एकत्रित मुठ बांधली जात आहे. भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढली. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंह सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह नेते सहभागी झाले. लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी मागितली आहे.

कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र

पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना देखील दिल्या आहेत. परंतु त्यादृष्टीने त्यांच्याकडून जिल्हाभर तयारी सुरु नसल्याचे दिसून येते. निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. मागील काही वर्षात काँग्रेसमधील नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे पहायला मिळाले होते. मात्र काँग्रेसमधील कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे.

हेही आवर्जुन वाचा
ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न…
(loksabha ) हातकणंगलेत दुरंगी की तिरंगी?

भाजपविरोधी वातावरण,  लाभ उठविण्याची संधी काँग्रेसला

काँग्रेसची दृष्टीने वाटचाल दिसत नाही. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील पक्षाच्या माध्यमातून सरकारविरोधात वेळोवेळी आंदोलन करुन लक्ष वेधून घेत आहेत. शहर जिल्हाध्यक्ष पाटील हे विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यासाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्यात येत आहे. लोकसभेसाठी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांच्याकडून शहरी भागातील काही कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. जिल्हा बँकेत बसून लोकांशी संपर्क साधत आहेत,

लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघ

परंतु बँकेत बसून मतांचा गठ्ठा काँग्रेसच्या पारड्यात पडणार नाही, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. लोकसभेसाठी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, तेथील लोकांचे प्रश्न अथवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क वाढविण्याची गरज आहे. मात्र संधी असताना काँग्रेसचे नेते चालढकल करीत असल्याचे चित्र आहे.

माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद ?

दुसरीकडे जिल्ह्यात भाजपकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे, परंतु भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन सातत्याने वाद उफाळून येतात. पक्षविरोधात कारवाया खासदार गटाकडून सुरु आहेत, पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा त्यांच्यावर झाला. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. खा. पाटील यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. खासदार आणि माजी जिल्हाध्यक्षांनी वेगवेगळी चूल मांडत बैठका घेत आहेत. देशमुख संपर्क वाढत असल्याचे चित्र दिसून येते.

निवडणुकीच्या तोंडावर खा. संजयकाका आक्रमक ?

या कारणावरुन निवडणुकीच्या तोंडावर खा. संजयकाका आक्रमक झाले आहेत. सलगरे लॉजिस्टिक पार्कसह रस्त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. रेल्वेच्या प्रश्नांसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच कवलापूर विमानतळप्रश्नी नागरी विमान वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंंधिया यांच्या भेटी घेवून कामाचा सपाटा लावला आहे. सांगली-मिरज रेल्वे पूल पाडण्यासाठी तात्काळ अवजड वाहतूक बंदच्या सूचना रेल्वे प्रशासनाने दिल्या. रेल्वे पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे, तर रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक असताना अचानक नोटीस काढल्याने खासदार चांगलेच भडकले.

हेही आवर्जुन वाचा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ

भाजपमधील मतभेद मिटवून बांधणी करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनांचा प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी धडपडत आहेत. कोयना धरणातून पाणी सोडण्यावरुन खासदारांनी साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कानउघडणी करीत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीत पार्श्वभूमीवर भाजपमधील मतभेद मिटवून बांधणी करण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. काँग्रेसने जनसंवादच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या गोटात शांतता पसरल्याचे चित्र आहे.

भाजपकडून पुन्हा मतविभागणीचा फंडा
काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळेल, असे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर केले आहे. सांगली लोकसभेची दुहेरी लढत होणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल, असे ढोबळ संकेत आहेत. तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ऐनवेळी ‘एमआयएम’ने पत्ता ओपन केला तर आश्चर्य वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. मतांचे ध्रुवीकरण करून काँग्रेसची ताकद कमी करण्यासाठी हा डाव खेळला जाऊ शकतो, अशी चर्चा त्यासाठी काँग्रेसने सावध घेण्याची भूमिका स्वीकारण्याची गरज आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज