rajkiyalive

सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा लाखांची रोकड जप्त

निवडणूक पथकाची कारवाई.

सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा लाखांची रोकड जप्त : सांगली : शहरातील सांगलीवाडी ते इस्लामपूर या मार्गावरील टोलनाक्याजवळ निवडणूक पथकाने एका गाडीतून वाहतूक होणारी साडे दहा लाखांची रोकड पकडली. बुधवारी दुपारी सदरची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कार चालक जोतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.

सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा लाखांची रोकड जप्त

याबाबत अधिक माहिती अशी कि, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत. या नाक्यावर 24 तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. सांगलीवाडी येथे स्थिर सर्व्हेक्षण पथक क्रमांक तीनचे प्रमुख निखिल मांगोरे व आचार संहिता कक्ष प्रमुख विनायक झाडे, सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे, फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलिस कर्मचारी निशांत मागाडे, विकी मोरे, वैशाली हटाळे यांचे पथक बुधवारी सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत होते. वाहनांची तपासणी सुरू असताना कार (क्र. एमएच 09डीएम 1899) अडवून वाहनाची झडती घेतली असता, चालक जोतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात 10 लाख 51 हजार 20 रुपये इतकी रोकड मिळून आली.

या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने आढळले. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रोकड दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आली आहे. चालक गोरे हा पुणे येथून मिरज तालुक्यातील आरग येथे जात होता अशी माहिती मिळाली. निवडणूक आयोगाच्या व आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दहशत माजवण्याचा कोयता आणि तलवार घेऊन फिरणार्‍या तिघांवर कारवाई : तडीपार केलेल्या दोघांचा समावेश.

सांगली : शहरातील विविध परिसरात दहशत माजवण्याचा हेतूने तलवार आणि कोयता घेऊन फिरणार्‍या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोघेजण हे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून तडीपार केलेले संशयित आहेत. हद्दपार केले असतानाही दोघेजण शहरात फिरत होते. सोमवार दि. 15 एप्रिल आणि मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी करण्यात आली. हद्दपार केलेले अभिषेक दीपक कुंटे (वय 23 रा. गवळी गल्ली, सांगली), मोहसीन मुस्ताक ठाकर (वय 25 रा. विजय कॉलनी, सांगली) आणि शुभम राजू पडळकर (वय 22 रा. जगदाळे प्लॉट सांगली) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या तिघांकडून तलवार आणि कोयते पोलिसांनी जप्त केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या लागू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुमित सूर्यवंशी हे सोमवार दि. 15 एप्रिल रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास बायपास रोडवरील नवीन पुलाजवळ पेट्रोलिंग करत होते. यावेळी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला संशयित मोहसीन ठाकर हा संशयितरित्या फिरताना दिसला.

त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्या जवळ एक लोखंडी कोयता मिळाला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन कारवाई करत कोयता जप्त केला. सांगली शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप तानाजी पाटील हे आमराई गार्डन परिसरात सोमवार दि. 15 एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करत होते.

यावेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला संशयित अभिषेक कुटे हा संशयितरित्या फिरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो पूर्व परवानगी शिवाय शहरात आल्याचे उघड झाले. तसेच अदखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ लोखंडी कोयता घेऊन फिरत असल्याचे समोर आले. यावेळी त्याच्याकडून कोयता जप्त करत शहर पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.

दुसरीकडे संजयनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी आकाश गायकवाड हे कारखाना परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना शुभम पडळकर हा मंगळवार दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारखाना चौक ते आरटीओ कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावर संशयित रित्या फिरताना आढळला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडून लोखंडी तलवार मिळाली. यावेळी तलवार जप्त करून त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज