shaktipith mahamarg : शक्तिपीठ महामार्गापासून अनेक देवस्थान दूरच 11 जिल्ह्यात संयुक्त मोजणी लवकरच : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातील देवस्थाने जोडणारा म्हणून ओळखला जातो. पण या महामार्गापासून पवनार येथील महात्मा गांधी आश्रम, नांदेड येथील माहुरगड, धाराशीव येथील तुळजाभवानी मंदिर, सांगलीतील औदुंबर व कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर यासह अनेक मंदिरे ही महामार्गापासून 20 ते 25 किलोमिटर अंतर दूर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, महामार्गापासून राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी लवकरच सुरू होणार आहे.
shaktipith mahamarg : शक्तिपीठ महामार्गापासून अनेक देवस्थान दूरच 11 जिल्ह्यात संयुक्त मोजणी लवकरच
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या आणखीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सुमारे 802 किलोमिटर लांबीच्या या द्रूतगती महामार्गाव्दारे 12 जिल्ह्यातील 19 देवस्थाने जोडली जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आराखडा तयार केला आहे. या महामार्गासाठी 86 हजार 300 कोटींचा खर्च येणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा महामार्गाचा आराखडा झाला होता. पण लोकसभेत महायुती सरकारला धक्का बसल्याने त्यांनी महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती सरकार निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शक्तिपीठ महामार्गाला वेग दिला आहे.

सध्या नागपूर-गोवा या प्रवासासाठी 21 तास लागतात. पण या महामार्गामुळे अकरा तासाचा प्रवास होणार आहे. 802 कि.मी. लांबीच्या या महामार्गावर 26 ठिकाणी इंटरचेंजेस असतील. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदूर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे. पण कोल्हापूरकरांचा तीव्र विरोध असल्याने कोल्हापूर वगळता इतर अकरा जिल्ह्यात संयुक्त मोजणी लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने संबंधित विभागाला शुल्क देखील भरले आहे. महामार्गाला शासनाकडून गती येत आहे. पण शेतकर्यांचा या महामार्गाला विरोध होऊ लागला आहे.
shaktipith-mahamarg-many-shrines-far-from-shaktipith-highway-joint-census-in-11-districts-soon
आंदोलने देखील होत आहेत. तरी देखील या महामार्गाचा अट्टाहास का केला जात आहे? अनेक शक्तिपीठ, मंदिर हे महामार्गापासून 20 ते 25 किलोमिटर लांब अंतरावर असल्याचे चित्र आहे. हा महामार्ग महात्मा गांधी आश्रम (पवनार, जि. वर्धा) येथून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आराखड्यामध्ये झडगाव येथून महामार्गाला सुरूवात होणार असल्याचे दिसते. हे अंतर 63 किलोमिटर लांब आहे. तर नांदेड जिल्ह्यातील माहुरगडला देखील शक्तिपीठ महामार्ग जोडला गेला नसल्याचे दिसते. तुळजाभवानी मंदिराला देखील हा महामार्ग जोडला गेला नाही. वास्तविक या ठिकाणाहून नागपूर महामार्ग पूर्वीपासून जोडला गेला आहे. तर सांगली जिल्ह्यातील औदुंबर मंदिर देखील शक्तिपीठ महामार्गापासून खूप लांब दिसत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर देखील शक्तिपीठ महामार्गापासून दूर आहे.
या महामार्गासाठी सुमारे 9 हजार 385 हेक्टर शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेती या पिकाऊ आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. शक्तिपीठ जोडण्यासाठी पूर्वीचा नागपूर-रत्नागिरी महामार्ग आहे. त्या महामार्गापासून ही मंदिरे नजीकच्या अंतरावर आहेत. नव्याने करण्यात येणार्या महामार्गामुळे जर शक्तिपीठ, मंदिराचे अंतर दूरच असेल तर महामार्ग करून काय उपयोग? असा सवाल आता शेतकर्यांतून उपस्थित होत आहे.
शक्तिपीठ महामार्गात ही मंदिरे जोडणार…
वर्धा जिल्हा:- केळझरचा गणपती, कळंब येथील गणपती मंदिर, सेवाग्राम. वाशिम जिल्हा:- पोहरादेवी. नांदेड जिल्हा:- माहुरगड शक्तिपीठ, सचखंड गुरुद्वारा. हिंगोली जिल्हा:- ओढ्या नागनाथ. बीड जिल्हा:- परळी वैजनाथ, आंबाजोगाई शक्तिपीठ. धाराशिव जिल्हा:- तुळजापूर. सोलापूर जिल्हा: पंढरपुरातील विठ्ठल मंदिर, अक्कलकोट. सांगली जिल्हा: औंदुबरचे दत्त मंदिर. कोल्हापूर जिल्हा: नरसोबाचीवाडी, जोतिबा देवस्थान, अंबाबाई मंदिर आणि संत बाळूमामा समाधीस्थळ आदमापूर. सिंधुदुर्ग जिल्हा: कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



