जनप्रवास । सांगली
SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी : राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प राबवून ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टचार करून पैसे कमाविण्याचा उद्योग चुकीचा आहे. गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सुरू आहे. शेतकर्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे आम्हाला नको आहेत. या महामार्गाला विरोध करू, मोजणी अधिकार्यांना हाकलून लावू, प्रसंगी रक्त सांडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.
SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी
रक्त सांडू पण ‘शक्तीपीठ’ला विरोधच
शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीवाडी येथे शक्तीपीठ बाधीत शेतकर्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी खा. राजू शेट्टी बोलत होते. मेळाव्याला माजी मंत्री प्रतिक पाटील, माजी आ. दिनकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, कॉ. उमेश देशमुख, सतीश साखळकर आदी उपस्थित होते.
माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, राज्यात प्रचंड महामार्ग आहेत, या महामार्गाची कनेक्टिव्हिटी देऊन सर्व देवदेवताचे दर्शन घेणे शक्य आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग या रस्त्याला समांतर आहे. या रस्त्यावर वाहतूक तुरळक आहे. टोलवसुली तोट्यात असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी म्हणत आहेत. मग हा महामार्ग कोणासाठी कशासाठी? त्यापेक्षा दुष्काळी प्रकल्प पूर्ण करा, पाणी द्या त्यासाठी जमिनी घ्या आम्ही विरोध करणार नाही. शक्तीपीठला पूर्णपणे ताकदीने विरोध करणार असून जमीन भूसंपदान करू देणार नाही. मोठे महामार्ग बांधताना ठेकेदाराच्या माध्यमातून पैसे कमवता येतात, भ्रष्टाचार करता येतो, त्यामुळे विकासाच्या नावाखाली प्रकल्प हा राबविला जात असेल तर चुकीचा आहे.
काँग्रेसच्या काळातच केंद्रात 2013 ला भूमी अधिग्रहण कायदा करण्यात आला होता,
तो कायदा चांगला होता. पण त्यात केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदल केला. त्यामुळे शेतकर्यांना फारच कमी भरपाई मिळणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आमच्या परवानगीशिवाय कोणाला पाऊल टाकता येत नाही. आला तर चोर्याला जसे हाकलून लावतो तसे हाकलून लावू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, महामार्गाची गरज नसताना शासन जबरदस्ती हे काम करत आहे. या महामार्गाला आमचा विरोध आहे. त्यामुळे एक इंचही जमीन देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी आ. दिनकर पाटील म्हणाले, पूरबाधीत गावाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला आमचा विरोध आहे.
महेश खराडे म्हणाले, ठेकेदाराला जगविण्यासाठी महामार्गाचा घाट घातला जात आहे
कायदे कितीही विरोधी असले तरी बळीराजा संघटित झाला तर तो मोदींना झुकवू शकतो हे देशाने पाहिले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना झुकविणे अवघड नाही. महामार्गाला विरोध करण्यासाठी टोकाचा संघर्ष करू येत्या 26 मार्च रोजी जिल्ह्यातील हरकती प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात येतील. त्याच बरोबर राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकर्यांना घेऊन मंत्रालयावर धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी प्रभाकर तोडकर, शिवाजी मगदूम, माणिक पाटील या शेतकर्यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक एम. एन. कदम यांनी केले. मेळाव्याला यशवंत हरूगडे, रघुनाथ पाटील, भगवान हरूगडे, सुधाकर पाटील, विलास थोरात, उदय पाटील, प्रभाकर तोडकर, गुलाबराव गायकवाड, अतुल झाबरे, अक्षय जाधव, विष्णू पाटील, राजू एडके, विलास पाटील, प्रवीण पाटील, शरद पवार, प्रवीण पाटील, घनश्याम नलवडे, भूषण गुरव, लखन पाटील, अजित धनवडे, हिंदुराव मगदूम आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सतीश साखळकर यांनी मानले.
राज्यातून वज्रमूठ बांधणार, 8 एप्रिलला धरणे….
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातून वज्रमूठ बांधण्याचा निर्णय मेळाव्यात येण्यात आला. 26 मार्चला हरकती सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर आठ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे. वेळप्रसंगी मंत्रालयावर धडक देखील मारण्याचा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



